निसटून गेलेल्या क्षणांकडे सारखे बघत बसण्यात काहीच अर्थ नाही.
डॉ.रोहिणी कोरके
कधी कधी आपल्याला आयुष्यातील काही क्षणांची फार आठवण येते. आपल्याला कधीही, कुठेही, केव्हाही या क्षणांची आठवण झाल्यास आपले मन त्यात गुंतुन जाते. असे वाटते पुन्हा ते क्षण किंवा तो प्रसंग जगता आला तर किती बरे होईल. तसंच एखादी चांगली संधी समोर असताना आपण त्याक्षणी तितका गांभीर्याने त्या गोष्टीचा विचार करत नाही आणि नंतर ती संधी हातातून गेली की आपण त्याच गोष्टींचा विचार करत बसतो. तेंव्हा मी असे केलं असतं तर आज मी असा असतो किंवा असं यश मिळवू शकलो असतो.
आता मला ती गोष्ट किंवा ती व्यक्ती भेटेल की नाही किंवा कधी कधी असंही होतं की एखाद्या व्यक्तीला आपल्याला भेटायचं असतं आपण ठरवतोही आणि नंतर काही क्षुल्लक कारणाने ती भेट रहित होते. नंतर प्रयत्न करूनही आपली भेट होऊ शकत नाही ती व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्वाची असते पण आपण त्यावेळी तिला डावलतो. नंतर मनाला चुटपुट लागून राहते. कदाचित आपला आयुष्यातला एखादा निर्णय घेतानाही आपलं असंच होतं आपण त्याक्षणी त्या गोष्टी तितक्याशा गांभीर्याने घेत नाही आणि नंतर त्या गोष्टीचा पछतावा होत राहतो.
काही व्यक्तीच्या बाबतीत असेही होते की त्यांची प्रिय व्यक्ती त्यांना सोडून गेली की त्यांच्या आठवणीने व्याकुळ होतात. त्यातून बाहेर पडणे त्यांना जमत नाही.त्या कटु आठवणी मनात ठेवून जगणे त्यांना अशक्य होऊन जाते. त्यातून नैराश्य येते त्यांचा जगण्यातला रसच संपून जातो.
अशा प्रसंगातून कसं बाहेर पडायचं ? तर
“सगळं काही संपलय असं वाटत तेव्हा एकच लक्षात ठेवायचं आपण शिल्लक आहोत याचा अर्थ अजून बरंच काही बाकी आहे !” आपल्यासाठी जे काही best असते ते परमेश्वराने त्या त्या वेळी आपल्याला दिलेले असते आपण ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या असत्या तर ईश्वराच्या अस्तित्वाला काही महत्वच उरले नसते. आपण जे काही ठरवतो, वागतो, चुकतो,सावरतो. त्यामध्ये काही प्रमाणात आपण जबाबदार असतो ही गोष्ट खरी असली तरी त्यासाठी ईश्वरी इच्छाही कारणीभूत असते.
‘दैव’ किंवा ‘नशीब’ हा शब्द आपले प्रयत्न सोडून आपल्या जे काही कमी अधिक पदरात पडते त्यासाठीच योग्य आहे. बऱ्याचदा आपण असे म्हणतो की माझे असे योग नव्हते किंवा त्याचे योग चांगले आहेत. याचाच अर्थ आपले प्रयत्न किंवा आपले वर्तन आपल्या वागण्याला ९९ टक्के जबाबदार असले तरी १ टक्का गोष्टी आपल्याही हातात नसतात.
कधी कधी आपल्यालाही लक्षात येत नाही आपण एखादया क्षणी आपण असे का वागतो ? नंतर आपल्याला असे वाटत राहते की आपण असे का वागलो ? त्याचा परिणाम असा कसा झाला? तर यावर एकच उपाय आहे ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांना सोडून दयायला शिकलं पाहिजे.
भूतकाळात जगण्यापेक्षा वर्तमानात जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या चुका आपल्या हातून घडून गेल्या आहेत त्यां चुका पुन्हा घडणार नाहीत असे प्रयत्न करत राहिले पाहिजे. भविष्यकाळाचे नियोजन योग्य पद्धतीने केले पाहिजे.
आपण जास्तीत जास्त Busy राहण्याचा प्रयत्न केला पाहिले जेणे करून आपले भूतकाळात रमणे कमी होईल. राहता राहिला प्रश्न प्रिय व्यक्तीच्या विरहाचा तर याचे उत्तर भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये दिले आहे, आत्मा अमर आहे. जरी एखादी व्यक्ती देहाने आपल्याला सोडून गेली तरी आत्मा अविनाशी आहे.
आपण मनापासून त्या व्यक्तीला स्मरण केले की त्या व्यक्तीचे अस्तित्व कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला जाणवत राहते. तसेच त्या व्यक्तींसोबत व्यतित केलेल्या आनंददायी क्षणांचे स्मरण करत रहावे. म्हणजे आपण आनंदात राहतो आणि ती व्यक्ती आपल्यातच असल्याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणून आपण सर्वांनी निसटून गेलेल्या क्षणांकडे सारखे बघत बसण्यापेक्षा आपल्याला मिळालेले आयुष्य हे ईश्वरी देणगी आहे असे समजून त्याचा पुरेपूर आनंद घ्यावा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



beautiful article👌👌👌👍