Skip to content

नातं तुटलं तरी चालेल पण काही लोकं चूक मान्य का करत नाही?

नातं तुटलं तरी चालेल पण काही लोकं चूक मान्य का करत नाही?


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


आपण सर्वजण छोट्यामोठ्या चुका करत असतो. चुका केल्याशिवाय तर काहीच शिकता येत नाही. चुका करण्यात फार काही वाईट आहे असं नाही, जर त्या हेतुपूर्वक नसतील तर! पण जर चुका करून , त्या आपल्या लक्षात येऊन ही आपण त्या मान्य करत नसू तर? किंवा आपला पार्टनर, आपल्या कुटुंबातील जवळची व्यक्ती, किंवा आपल्या मित्रमैत्रिणींपैकी असं कोणी करत असेल तर?

नातं टिकवण्यासाठी आपण काय काय करत नाही, वेळ पडली तर माघार घेतो, एकमेकांना समजून घेतो, एकमेकांच्या चुका पोटात घालतो आणि जमेल तेवढी काळजी , प्रेम आणि विश्वास देऊन नातं टिकवू पाहतो. पण काही लोकांना तर साधी चूक मान्य करण्यापेक्षा नातं तुटलेलं ही चालत? अर्थात, त्यांची नातं तुटावं अशी इच्छा नसतेच, पण तरीही नात्यापेक्षा जास्त महत्व त्यावेळी दुसऱ्या अनावश्यक गोष्टीला ते देतात आणि त्यामुळे अशी वेळ येते.

आपण चुकीचे आहोत ही भावना नक्कीच अप्रिय असते. पण तरीदेखील काही लोक अगदी सहजपणे चूक मान्य करून, “माफ करा हा माझ्याकडून तसं झालं, परतच्या वेळी असं नाही होणार याची मी दक्षता घेईल” असं किती सहजपणे बोलून जातात. काही लोकांना चूक लक्षात येते, ते कोणाला त्याच फार स्पष्टीकरण देत नाही,

पण तरीदेखील त्या गोष्टी सुधारण्याची त्यांची तयारी असते, आणि महत्वाचं म्हणजे कमीतकमी त्यांना त्यांची चूक तरी मान्य असते. पण काही लोक मात्र असे असतात की, त्यांची चूक आहे, किंवा त्यांच्याकडून चूक झालीये हेच त्यांना शक्य वाटत नाही, आणि खूप प्रयत्न करून आपण ते त्यांना समजावून, पटवून द्यायचा प्रयत्न केलाच आणि त्यांना ते जरी मनातून पटलं तरी ते तसं दाखवायचं, किंवा कबूल करायचं टाळतात.

कधी-कधी तर चांगले भक्कम पुरावे दाखवून सुद्धा ही मंडळी तोंडावर अगदी रगडून खोटं बोलायला ही कमी करीत नाहीत. आणि त्यावेळी आपल्याला चिडचिड तर होतेच पण शिवाय असंही वाटून जात की हे जे पुरावे आहेत ते पाहून सुद्धा हा माणूस असा म्हणतोय, म्हणजे काय मला वेडबीड लागलंय की काय?

तर अशी लोक आपली चूक का मान्य करीत नाहीत याच उत्तर त्यांच्या अहंकाराशी, त्यांच्या आत्म-संवेदनाशी संबंधित आहे. काही लोकांमध्ये इतका नाजूक अहंकार, इतका ठिसूळ स्वाभिमान, अशी कमकुवत “मानसिक स्थिती ” असते की त्यांनी चूक केली किंवा ते चुकीचे होते हे मान्य करणे हे त्यांच्या अहंकाराला सहन होत नाही, किंवा मूलभूतपणे खूप धोक्याचे असते.

ते चुकीचे होते हे स्वीकारणे, ते वास्तव आत्मसात करणे, याने ते मानसिकदृष्ट्या विस्कळीत होतील असे त्यांना वाटते त्यांच्या संरक्षण यंत्रणा असे होण्यापासून टाळण्यासाठी त्यावेळी खोटं बोलून ते नाकारायला किंवा मी चुकीचा कसा नव्हतो हे manipulate करून समजवायला ही कमी करत नाही. त्यांची संरक्षण यंत्रणा त्यांच्या मनातील वस्तुस्थिती बदलून त्यांच्या नाजूक अहंकाराचे संरक्षण करतात.

ते चुकीचे कसे नव्हते, ह्याचं स्पष्टीकरण तर ते अशा पद्धतीने देतात की, एक क्षण आपण ही विचारात पडतो की, कदाचित नसेल त्यांची काही चूक, आपलाच गैरसमज झाला असेल. पुरावा नसेल तर कोणताही माणूस अशा समजावण्याने स्वतःलाच दोषी समजेल, पण पुराव्यांमुळे आपल्याला कळत की या माणसाची चूक असून हा कबूल न करता, त्याच स्पष्टीकरण का बरं देत बसला असेल?

स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा आपण चुकीचे नव्हतो हे सिद्ध करण्यासाठी ही माणसे समोरच्या माणसालाच अपराधीपणाची भावना आणायला कमी करीत नाहीत. आणि सामान्य माणसे जी अहंकाराच्या आहारी गेलेली नसतील अशी माणसे एवढ्या हट्टीपणाने कधीच माझी चूक नव्हती हे बोलत नाहीत. ती पूर्ण विचार करून, चूक असेल तर मान्य करत असतात. पण अहंकारी माणसे चूक आहे असं दाखवून दिलं असता, चूक होती का नव्हती हा विचार करण्यापेक्षा चूक कशी नव्हती आणि आता हे कसं पटवून दिल पाहिजे, आपला बचाव कसा करता येईल याचा विचार करत बसतात.

खरंतर चूक झाली, ती लक्षात येताच मान्य करून माफी मागणं खूप सोप्प असत. पण या लोकांसाठी ती गोष्ट खूप अवघड नव्हे अशक्यच असल्यासारखी त्यांना वाटते. जे लोक वारंवार अशा प्रकारचे वर्तन दाखवतात ते व्याख्येनुसार, मानसिकदृष्ट्या कमजोर असतात. तथापि, ते मूल्यांकन लोकांसाठी स्वीकारणे सहसा कठीण असते, कारण बाहेरील जगाला ते असे दिसते की जणू ते आत्मविश्वासाने त्यांच्या जमिनीवर उभे आहेत आणि मागे हटत नाहीत,.

परंतु हे ताकदीचे लक्षण नाही, ते दुर्बलतेचे लक्षण आहे. अशा व्यक्ती जे योग्य आहे त्यासाठी उभी राहत नसतात, किंवा त्यासाठी लढत नसतात, स्वतःच्या अहंकाराला कुरवाळण्यासाठी ते या गोष्टी करीत असतात.आपण चुकीचे आहोत हे मान्य करणे अप्रिय आहे, त्याने प्रत्येकाचा अहंकार दुखावला जातो. त्या वास्तविकतेला सामोरे जाण्यासाठी आणि आपल्या चुका स्वीकारण्यासाठी काही प्रमाणात भावनिक शक्ती आणि धैर्य लागते.

जेव्हा आपण चुकीचे आहोत हे कबूल करावे लागते तेव्हा आपल्यापैकी बरेच जण थोडेसे खचून जातात, परंतु आपण त्यावर मात करतो. पण अहंकारी माणसे कबूल ही करत नाहीत, आणि कधी करावं लागलंच तर याने ती फार लवकर खचून जातात.

परंतु जेव्हा लोक ते चुकीचे आहेत हे मान्य करण्यास असमर्थ असतात, जेव्हा ते चुकण्यास सक्षम आहेत ही कल्पनाच सहन करू शकत नाहीत, कारण ते इतके अहंकाराने ग्रस्त आहेत की ते दुःखी होऊन त्यावर मात करू शकत नाहीत — त्यांना त्यांच्या चुका पुराव्या सहित नीट पटवून द्यायचा प्रयत्न आपण सोडायचा नाही. ते त्यांनी मान्य करू वा न करू, आपण त्या गोष्टी नम्रपणे आणि आत्मविश्वासाने स्वतःवर शंका न घेता मांडायला हव्यात.

अशा लोकांना आपण कसा प्रतिसाद देतो हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण एक चूक करू नये ती म्हणजे ते चुकीचे असल्याचे कबूल करण्यास त्यांचे सतत आणि कठोर नकार हे सामर्थ्य किंवा आत्मविश्वासाचे आणि ते बरोबर असल्याच्या खात्रीचे लक्षण आहे, असा समज करून घेऊ नये. कारण ते पूर्णपणे उलट आहे – ते मानसिक कमजोरी आणि नाजूकपणाचे लक्षण आहे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!