Skip to content

नवीन काही सुरू करण्यासाठी इच्छा असायला हवी, मुहूर्त नाही.

नवीन काही सुरू करण्यासाठी इच्छा असायला हवी, मुहूर्त नाही.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


इच्छा असेल तर मार्ग दिसेल..! अगदी शाळेत असल्यापासून आपण हा सुविचार ऐकत आलो आहोत. शाळेतील भिंतीवर , फळ्यावर आणि शिक्षकांच्या ओठी सुद्धा हा सुविचार कायम असायचा. कितीही उलगडून सांगितला तरी त्याचा अर्थ तेव्हा फारसा समजायचा नाही. पण जसजसे आपण मोठे होत गेलो , समजुतदार होत गेलो तसतस आपल्याला ह्या सुविचाराचा अर्थ मात्र उलगडायला लागला.हळुहळू त्याची जाणीवही आपल्याला झाली.पण या मुहूर्ताच्या नादात मात्र ही जाणीव कुठेतरी पुसटशी होताना दिसते.

हल्ली कोणतीही नवीन गोष्ट करायची झाली तर बघितला जातो तो मुहूर्त…! या मुहूर्ताशिवाय हल्ली कोणत्याही गोष्टीच पानही हलत नाही.म्हणजे चांगला मुहूर्त असेल तरच गोष्टी करण्याचा विचार केला जातो. जर चांगला मुहूर्तच नसेल तर योजलेल्या सगळ्या गोष्टी तशाच राहतात. त्यांना मुहूर्ताअभावि तिथेच पूर्णविराम दिला जातो. का…? कशासाठी…? हे सगळं कशासाठी करायच…? हा असला घाट का घालायचा…? याची मुळातच गरजच काय…?

खरतरं.. इच्छा असेल तर मार्ग दिसेल याप्रमाणे जर एखादी गोष्ट करायची खरच इच्छा असेल तर ती करायला आधी मुहूर्त पहायलाच हवा का…? Is it necessary….? सांगा नं…खरच हे गरजेचं आहे का..? आपली इच्छा हाच चांगला मुहूर्त असु शकतो नं…? कारण इच्छा नसेल तर सहसा आपण एखादी गोष्ट करत नाही. किंवा ती गोष्ट करण्याचा साधा विचारही करत नाही. पण जर इच्छा नसून मुहूर्त चांगला असेल तर मात्र आपण तयार नसलेल्या गोष्टीसाठीही अगदी क्षणात तयार होतो. हे असं स्वतःचच / इतरांच वागणं पटतं का हो मनाला….?

आयुष्यात प्रत्येकाची कोणती ना कोणती स्वप्न असतात. कुणाला घर घ्यायच असतं तर कुणाला गाडी घ्यायची असते. कुणाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो तर कुणाला अजून काहीतरी… पण मग या सगळ्यासाठी आपण नेहमी मुहूर्त का पाहतो…? इच्छा असूनही एखाद्या मुहूर्ताअभावि आपण ती गोष्ट पुढे ढकल राहतो.आज मुहूर्त नाही , उद्या नाही, नाही या महिन्यात तर कोणताही चांगला मुहूर्तच नाही.असा आपण “मुहूर्त नाही, मुहूर्त नाही” पाढा वाचत राहतो.आणि प्रत्येक गोष्ट पुढे ढकलत राहतो.

मुहूर्तशास्त्राच मला फारसं काही माहीत नाही पण इतकच कळतं की एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर मनातून इच्छा असायला हवी. कोणताही मुहूर्त हा सक्तीचा किंवा गरजेचा नसावा. नाहीतर अशाने कितीतरी गोष्टी अवकाळी पावसासारख्या लांबणीवर पडतील. आधीच इथे आपल्या आयुष्याचा काही अंदाज लावता येत नाही. कधी काय होईल काही सांगता येत नाही. ‘आयुष्य कितीही नाही म्हंटल तरी क्षणभंगुर आहे’ हे मनाला कळत असूनही आपण एखादी गोष्ट करण्यासाठी योग्य त्या मुहूर्ताची वाट पाहत बसतो.आपलं निम्म आयुष्य तर असं मुहूर्ताची वाट पाहण्यातच जात असेल.

कल करे सो आज कर,
आज करे सो अब ॥
पल में परलय होएगी,
बहुरि करेगा कब ॥

वाह्….! “संत कबीर” यांनी लिहीलेला हा दोहा खरच किती सुंदर आहे. ऊद्या जे कराल ते आज करा आणि आज करणार असाल ते आत्ताच करा…क्षणात एखादा प्रलय आला तर ठरवलेली गोष्ट करणार कधी….? पहा किती किती समर्पक असं जीवनातील एखाद्या गोष्टीच सार या संत कबीरांनी त्यांच्या ओळींमधून स्पष्ट केलं आहे.

प्रत्येक वेळी मुहूर्त पाहत बसला तर कितीतरी गोष्टी अपूर्णच राहतील. म्हणून प्रत्येकवेळी असा मुहूर्ताचा घाट न घालता मनापासून जर एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर ती करून घ्या. आपल्या इच्छेपुढे कोणताही मुहूर्त हा फिका आहे…! इच्छेपेक्षा दुसरा चांगला मुहूर्त असूच शकत नाही.

एक मात्र नक्की… इच्छेला प्रयत्नांची जोड असेल तर ठरवलेल्या गोष्टी पूर्ण व्हायला वेळ लागत नाही. इच्छा आणि प्रयत्नांचे दोन हात हे समीकरण जुळून आलं की चांगला मुहूर्त म्हणजे काय हे विचारायला कुणाच्या मनात किंतु – परंतू ही उरणार नाहीत.

अनेकदा असही होतं की गोष्टी करायला सगळं असतं , अगदी इच्छा सुद्धा असते पण मुहूर्त मात्र नसतो.मग आपण ती गोष्ट पुढे ढकलतो.पण मग अशी वेळ येते की मुहूर्त मात्र चांगला असतो पण हाती मात्र काहीच नसतं.मग अशा या मुहूर्त वगैरे चा काय उपयोग…? त्यामुळे आहे सगळं तर गोष्टी करायला प्राधान्य द्या. उगाचच मुहूर्तामुळे त्या गोष्टींमध्ये वेगवेगळे आडेवेडे घालू नका. इतकच नाही तर उरलेलं जे काही आयुष्य आहे ते या क्षणापासून जगायला सुरुवात करा…कोण जाणे..? पुढे काय होणार आहे….म्हणून आत्ता या क्षणासारखा दुसरा चांगला मुहूर्त नाही…

चला तर मग आयुष्य जगायला सुरुवात करा….मुहूर्ताऐवजी या इच्छाशक्तीला प्राधान्य द्या….!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!