नको त्या अपेक्षा शिथिल केल्या की खरंच खूप हलकं वाटतं.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
अपेक्षा या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात. अपेक्षा ही मानवी स्वभावातील एक सामान्य वृत्ती आहे. जी प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. अपेक्षांवर लक्ष देण्याचं कारणच हे आहे की अपेक्षा या आयुष्यातल्या टेन्शन, स्ट्रेस यांचा मुख्य स्रोत असतात.
आपण अपेक्षा स्वतःकडून ठेवतो त्याचप्रमाणे त्या इतरांकडून ही ठेवल्या जातात. जवळच्या माणसांकडून अपेक्षा करणं हा तर आपण आपला हक्कच मानत असतो. पण ज्यावेळी आपला अपेक्षाभंग होतो तेव्हा खूप त्रास होतो. तेव्हा इतरांकडून ती गोष्ट झाली तर आपल्याला तो माणूस चुकीचा वाटायला लागतो, ‘साधी तर अपेक्षा होती माझी ती ही पूर्ण करता आली नाही’, असं वाटून आपण त्या माणसाला दोषी समजतो.
आणि आपल्या स्वतःकडून आपली एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही तरी मन खच्ची होते. पण त्या अपेक्षा खरंच रास्त होत्या का? त्या realistic होत्या, की मर्यादेपलीकडच्या होत्या याचा विचार मात्र आपण करत नाही. स्वतःकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षा करताना आपण आपली मर्यादा ओलांडता कामा नये. कारण जेव्हा आपला अपेक्षाभंग होत असतो तेव्हा जे मिळालं नाही त्या गोष्टीसाठी आपलं मन दुःखी आणि उदास होत असत.जे आधीच आपल्याकडे नाहीए त्यासाठी का बरं उदास व्हायचं?
काही लोकांना प्रत्येक परिस्थितीत, जीवनातल्या प्रत्येक पावलावर काहीतरी अपेक्षा करण्याची सवय असते. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आयुष्यातली प्रत्येक परिस्थिती, आपण केलेली प्रत्येक गोष्ट यातून काहीतरी मिळावं किंवा काहीतरी व्हावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.
आपला जन्म पावलापावलावर काहीतरी फायदा करून घेण्यासाठी झालेला नाही. त्यामुळे काही गोष्टी करून किंवा काही परिस्थितींमध्ये त्याचा फक्त आनंद घेणं किंवा ती परिस्थिती अनुभवणं एवढंच पुरेसं असत. अपेक्षा कितपत करायच्या , त्या काय स्वरूपाच्या असाव्यात हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असत.
काही लोकं अगदी सहजपणे म्हणतात की, ‘ते त्याने असं केला किंवा अमुक माझा जवळचा आहे त्यामुळे अशी अपेक्षा मला असणं स्वाभाविकच आहे नाही का?’ तर मी असं म्हणेन की त्या स्वाभाविक अपेक्षा असण्यापेक्षा आपणच त्यांना स्वाभाविकतेचा शिक्का देऊन मोकळे होतो.
कोणतीही गोष्ट तशीच असली पाहिजे हे compulsory नाही. त्यामुळे आपल्या अपेक्षा कमी करणं आणि शक्यतो त्या मोजक्या आणि योग्य आहेत का हे बघणं ही आपली जबाबदारी आहे. आपण आनंदी राहणं ही आपली जबाबदारी असते, त्यासाठी इतर कोणी जबाबदार असू शकत नाही.
काही अपेक्षा खरंच अशा ही असतात ज्याने आपण कष्ट करून हव्या त्या ध्येयापर्यंत पोचत असतो. पण जास्त करून अपेक्षा त्रासदायक असतात, अशाप्रकारच्या आपण करत असतो. त्यामुळे या दोन प्रकारच्या अपेक्षांमधला फरक कळून आपण अशा टेन्शन आणि त्रास देणाऱ्या अपेक्षा टाळल्या तर नक्कीच आयुष्य अधिक सोप्प आणि सुखकारक व्हायला मदत होईल.
बऱ्याचवेळा इतरांकडून अपेक्षाभंग होण्यामागचं कारण हे असत की त्या , त्या माणसासाठी एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे गेलेल्या असतात, त्याच्यासाठी त्या पूर्ण करणं अवघड असत. कारण जवळची माणसं मुद्दाम आपल्याला त्रास देण्यासाठी नक्कीच असं वागणार नाहीत. त्यामुळे त्यांचीही बाजू समजण्याचा प्रयत्न करावा. आणि आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय-काय आहे ज्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजतो अशा गोष्टी आठवाव्यात.
बऱ्याच वेळा आपली अशी समजूत असते की या अमुक-तमुक गोष्टीने मला आनंद मिळेल. आणि तिच्यासाठी आपण अपेक्षा ठेवून बसतो. पण ती मिळाल्यावर देखील आनंद होतोच असं नाही. पण त्याच जागी ती गोष्ट जर मिळाली नाही तर दुःख मात्र खूप होते. त्यामुळेच आपल्या अपेक्षा, आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी यांचा नीट विचार करायला हवा. नाहीतर जी गोष्ट खरंतर आपल्याला हवीये की नाही हेच नीट माहित नसताना, ती हवीये या खोट्या विचारापायी आपण कितीतरी क्षण वाया घालवत बसतो, त्या गोष्टीसाठी झुरत बसतो.
त्यामुळे जेव्हा आपण अशा अपेक्षा आपल्या आयुष्यातून काढून टाकू तेव्हा नक्कीच आयुष्य खूप हलकं-फुलकं वाटेल. स्ट्रेस आणि टेन्शन तर कमी होईलच पण जगण्यातल्या छोट्या-छोट्या क्षणांचा आनंद देखील आपण घेऊ शकू.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


