Skip to content

“नको तिकडे माया करणारे आई वडील मुलांचं नुकसान करत असतात.”

“नको तिकडे माया करणारे आई वडील मुलांचं नुकसान करत असतात.”


मधुश्री देशपांडे गानू


“चंदा है तू मेरा सूरज है तू,

ओ मेरी आँखो का तारा है तू..”

आणि

“मेरे घर आयी एक नन्ही परी”

अशी गाणी मनाला सुखावतात. आपल्यासारख्याच दिसणार्‍या, आपले रंग, रूप , गुण, दोष घेऊन येणाऱ्या, आपण जन्माला घातलेल्या नवीन जीवाचे केवढ्या आनंदाने, जोशात स्वागत होते. आई-बाबा होण्यासारखे सुख नाही. अगदी जीवनाची इतिकर्तव्यता नसली तरीही आयुष्याला एक सुंदर वळण लागतं. अर्थ प्राप्त होतो. मूल नुसतं जन्माला येत नाही तर ते आई-वडिलांनाही जन्माला घालतं. त्यांचा नवा प्रवास सुरू होतो. नवरा-बायको यांना नव्याने जोडणारा धागा जणू.

मुलांचे संगोपन करणं आज अतिशय कौशल्याचं काम झालं आहे. पूर्वी एकाच घरात,  एकत्र कुटुंब पद्धतीत अनेक भावंडं असत. एकमेकांबरोबर ती छान निकोप वाढत असत. वेगवेगळ्या माणसांचे अनुभव घेऊन समृद्ध होत असत. तडजोड करायची लहानपणापासूनच सवय लागत असे. आपल्या वस्तू शेयर करायची  सवय असे.

माणसांना सांभाळून स्वतःची नवी वाट शोधत असत. आता आई वडील आणि एकुलता एक मुलगा किंवा मुलगी. आजी आजोबा घरात असणं ही दुर्मिळ आता. त्यामुळे आत्ताचे सर्व आयाम झपाट्याने बदलणाऱ्या आणि प्रचंड स्पर्धेच्या युगात आपल्या एकुलत्या एक अपत्याला घडवणे हे कठीण कर्म आहे. म्हणूनच आज कित्येक नवरा बायको आई-वडील होण्यास धजावत नाहीत. आज फक्त प्रचंड पैसे कमावण्यासाठी मुलांना सक्षम करणे हाच त्यांच्या संगोपनाचा केंद्रबिंदू उरला आहे. अगदी जन्माला आल्यापासून त्याची कोणाशी तरी तुलना केली जाते. धड चालता येत नाही पण शाळेत घातले जाते.

प्रत्येक मूल हे वेगळं असतं. त्यांची आकलन क्षमता, बुद्ध्यांक वेगळा असतो. मुळात मूल जरी तुमचं असलं तरी ते स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घेऊन येतं. तुमच्या आशा, अपेक्षा, अपूर्ण राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याचं माध्यम नव्हे! हे पालकांना समजतच नाही. मग सुरुवातीपासूनच त्याने आमच्याच अपेक्षांप्रमाणे वागावे म्हणून त्याला आमिषे दाखवली जातात. तू हे कर मग मी तुला ते देईन. ही घेण्याची मुलांची वृत्ती वयानुसार वाढत जाते.

आज बहुसंख्य पालक दोघेही नोकरी-व्यवसाय करणारे असतात त्यामुळे मुलाने मागितलेली प्रत्येक गोष्ट विनासायास त्याला आणून देणं हा अजून एक मुल वाढवण्याचा मापदंड झालायं. कारण आपण आपल्या नोकरी व्यवसायात पूर्ण व्यस्त असताना मुलाला वेळ देऊ शकत नाही, याची बऱ्याच पालकांना बोच असते. मग ती बोच कमी करण्यासाठी वस्तूंच्या रूपात मुलाला खूष केले जाते. मुलांना आई-वडिलांचा वेळ हवा असतो, ते नातं फुलायला हवं असतं. पण ते जमत नाही म्हणून भेटवस्तूंची लाच.. मग हीच सवय मुलाला होते. आज अगदी एक वर्षाचे मूल ही हातात मोबाईल घेऊन बसलेले दिसतं.

भौतिक सुखांचा , भौतिक गोष्टींचा अतिरेक झालेला आहे. प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध आहे. कित्येक आकर्षणं सहज साध्य आहेत. आपण मागू ते मिळतंय याने मुलांची हिंमत वाढते. कित्येकदा पालक शक्य नसतानाही मुलांचे हट्ट पुरवतात. आज मुलांना “नाही” ऐकायची सवयच राहिलेली नाहीये. आमच्या लहानपणी पाच पैशांनाही हातात घ्यायची आमची हिम्मत नव्हती. तेवढा धाक वडीलधाऱ्यांचा असायचा. माझी आई नेहमी सांगायची, “कपडेलत्ते आणि खाण्याचे लाड होतील. बाकी कोणतेही लाड चालणार नाहीत.” आज-काल स्वतःच्याच मुलांचे अति लाड, अति कौतुक पालकच करताना दिसतात.

सतत आल्या गेल्या समोर आपल्या मुलांचे गोडवे गायचे. त्यांच्या चुकांवर पांघरूणं घालायची. क्षमता, कुवत नसतानाही पाल्या कडून पालक खूप अपेक्षा ठेवतात. आजही बहुतांश घरांमध्ये मुलगा आणि मुलगी हा सरळ भेद दिसतोच. मुलाचे अति लाड पुरवले जातात. त्याला कोणत्याही कामाची सवय नसते. मुलींनी मात्र सगळे शिकलं पाहिजे. “घर सर्वांचं असतं तर घरातली कामं ही सर्वांची आहेत.” हीच लाडावलेली मुलं (वंशाचे दिवे) मोठे झाल्यावर ही आई त्यांच्या मागे धावत असते. त्यांच्या हातात प्रत्येक गोष्ट आणून देते. दरवाजाची बेल वाजल्यावरही न उठणारी मुलं आणि हातातलं काम टाकून धावणारी आई सहज दिसते.

मोठे झाल्यावर लग्न झाल्यावरही जबाबदारीची कोणतीही जाणीव सवय नसलेले हे मुलगे केवळ  वाढले आणि कमावते झाले म्हणून त्यांची लग्न होतात. इथेही सून कमावती हवी आणि गृहकृत्यदक्ष ही हवी. यांचा मुलगा काहीच मदत करणार नाही. हीच परिस्थिती आज मुलींच्या बाबतीतही दिसते. सगळ्या क्षेत्रांमध्ये हिरिरीने दिसणाऱ्या मुली घर कामात मात्र मागे पडलेल्या दिसतात. कारण आई-वडिलांनी तसं वळणच लावलेलं नसतं.

आता हे सरसकट सगळ्यांबद्दल आपण बोलत नाहीये. कितीतरी असे मुलगे आणि मुली आहेत जे सगळ्या आघाड्या खूप छान सांभाळतात. आणि हे  नक्कीच त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार आहेत. पण आपण असे संस्कार घडलेले नसणाऱ्या मुलां बद्दलच बोलतोय. अतिशय लाडावलेल्या मुली लग्न होऊन सासरी गेल्यावर त्यांची पंचाईत होते. त्या नवीन घरी, नवीन माणसांशी जुळवून घेऊ शकत नाहीत. घरकामाची सवय नसते.

आज कितीतरी क्षुल्लक कारणांवरून घटस्फोट होण्याचे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. दोघांचे आई-वडील मुलांच्या संसारात प्रचंड ढवळाढवळ करतात, नको इतकं लक्ष घालतात, यामुळे नवरा बायकोचं चुकत माकत का होईना पण एकमेकांबरोबरच नातं फुलायला वेळच मिळत नाही. तडजोडीची अजिबात सवय नसते. त्यामुळे एकमेकांशी पटत नाही. या सगळ्याचं मूळ कुठेतरी लहानपणापासूनच झालेल्या चुकीच्या संस्कारांमध्ये आहे. फक्त “मी” पणाला महत्त्व दिलेलं असतं. मुळातच पालकच फक्त भौतिक सुखांना महत्त्व देताना दिसतात. आज करियर बरोबर घरकाम आणि गरजेपुरता स्वयंपाक मुलगा असो वा मुलगी यांना आलाच पाहिजे.

एक माणूस म्हणून आपलं मुल घडवायला पालक विसरतात. आज भरपूर पैसा कमावणारा मुलगा किंवा मुलगी हे आदर्श समजले जातात. मग ते कसेही वागले तरी चालेल. पण समाजात वावरताना आणि तुमच्या आयुष्यातलं कोणतंही नातं निभावताना तुमचा स्वभाव, तुमची भावनिक, सामाजिक जाणीव ही जास्त प्रगल्भ असायला हवी.

आज तुलनेने कमी शिकलेले किंवा कमी कमावणारी मुलं आणि मुली ही अक्षरश: वाळीत टाकली जातात. त्यांच्यात इतर कितीही चांगले गुण असले तरी! अति लाड आणि केवळ पैसा कमावण्याचं मशीन बनवण्याच्या पालकांच्या अतिरेकामुळे कित्येक मुलं बिघडली आहेत. पैसा सहज हातात येत आहे. गुन्हेगारी जगतात कोवळ्या वयातील मुलं सहज पाहायला मिळतात. कारण घरात धाक उरलेला नाही. आपल्या आई-वडिलांना काय वाटेल असा विचार करतच नाहीत. रोज धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत..

प्रत्येक मुलांमध्ये गुणविशेष असतातच. प्रत्येक मूल 95 टक्के मिळवत नाही. त्याचा योग्य कल ओळखून, त्याचा मित्र म्हणून पालकांनी त्याला योग्य मार्ग दाखवायला हवा. काही मुलांना वेळ लागतो. अशावेळी पालकांनी संयम बाळगायला हवा.

सुजाण पालकत्व ही खूप मोठी जबाबदारी आहे. आई-वडील या भूमिका योग्य तऱ्हेने निभावता येतील असा आत्मविश्वास पालकांना हवा, तरच मुलांना जन्म द्या. संपूर्ण संस्कारक्षम बनवा.  बुद्ध्यांक बघताना त्यांची मानसिक ताकद आणि भावनांची जाणीव यालाही तेवढेच महत्त्व द्या. नुसते कागदी हुशार न बनवता विनम्र, प्रेमळ, समंजस, सज्जन , समर्थ, सक्षम बनवा. वेळप्रसंगी तडजोड करण्यासही शिकवा. “नाही” ऐकायची त्यांना सवय लागू द्या. स्वतःचं करिअर घडवताना ते माणूस म्हणूनही पूर्ण विकसित होतील याकडे आज पालकांनी सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज आहे… बरोबर ना…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““नको तिकडे माया करणारे आई वडील मुलांचं नुकसान करत असतात.””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!