देहाला होणारे रोग आणि मनाला होणाऱ्या वेदना हे आपल्याच कर्माचे फळ आहे.
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर…!!
हे गाणं सगळ्यांच्या परिचयाच आहे. आपण जसं कर्म करतो तसच फळ आपल्याला मिळतं.आयुष्यात आपल्याला जे काही मिळत असतं ते आपल्या कर्मामुळेच मिळत असतं.अगदी आपल्या देहाला होणाऱ्या रोगांच आणि मनाला होणाऱ्या वेदनांचही तसच आहे. शरीराला आणि मनाला जो काही त्रास होतो त्याला आपणच जबाबदार असतो.
आपण त्याची नेमकी किती आणि कशी काळजी घेतो यावर ते सर्वकाही अवलंबून असतं.देहाला रोग असे उगाचच जडत नाहीत आणि मनालाही उगाचच वेदना होत नाही. त्यामागे सगळी आपलीच कर्म असतात.पोषक आहार , नियमित व्यायाम ,प्राणायाम हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे हे वेगळं सांगायला नकोच.
पण आपणच आपल्या शरिराची हेळसांड करून घेत असतो.आणि मग दिवसेंदिवस देहाला अर्थातच आपल्या शरीराला वेगवेगळ्या व्याधी जडायला लागतात. शरीराला त्याचा खूप त्रास होत जातो.आणि रोगराई कोणाला आवडते…??कोणाला हवीहवीशी वाटते..?? तर नाही.. कोणत्याही व्यक्तीला ही रोगराई हवीहवीशी वाटत नाही.
कारण ही काही हवीहवीशी वाटणारी गोष्ट मुळीच नाही. पण आपल्याच कर्मामुळे आपल्या या देहाला रोग केव्हा गुंडाळतो काही कळत नाही.मुळात हे सगळं घडतं पण याआधी आपण काहीतरी अशा गोष्टी केलेल्या असतात किंवा आपल्या हातून त्या घडलेल्या असतात.आणि त्याचीच ती फळं आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात मिळत असतात.
देहाचं जसं आहे तसच आपल्या मनाचही आहे. मनाला वेदना कधी उगाचच होत नसतात. त्यामागे असंख्य अशी कारणं असतात. आणि त्या कारणांमागे आपली कर्मच असतात. आपण कधीतरी कुणाला नकळतपणे त्रास दिलेला असतो.मुद्दाम त्रास देणारी माणसं वेगळीच.आणि त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं मिळतातच.खरतरं प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माची चांगली वाईट फळं ही कोणत्या ना कोणत्या रूपात मिळतातच.
आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ….यानुसार चांगली वाईट फळं आपल्याला मिळत असतात.तुम्ही इतरांना त्रास दिला , किंवा इतरांमुळे स्वतःला त्रास करून घेतला तर वेदना होणं अगदी साहजिक आहे. पण याला जबाबदार मात्र तुम्हीच आहात.इतरांना त्रास दिला तर तो त्रास कधी ना कधी आपल्यालाही सहन करावा लागतोच.किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात आपण त्या वेदना सहन करतो.
अगदी आज तुम्ही अन्नाला लाथाडलत तर उद्या कोणत्या ना कोणत्या रुपात तुम्हाला त्याचा त्रास होणारच आहे.अशीच काही उदाहरण अगदी आपल्या डोळ्यासमोर रोजच असतात.त्यामुळे नेहमी कोणतही कर्म करताना नेहमी मनात चांगला हेतू ठेवूनच कर्म करा.हेतू वाईट असेल तर निश्चितच त्याच रूपात तुम्हाला त्याची फळं मिळतील.अनावधानाने देखील आपल्याकडून अनेक गोष्टी होतात.
पण नंतर मात्र कितीही नाही म्हंटल तरी त्याचा त्रास हा होतोच.आणि…आपण आपल्या देहाला आणि मनाला दोघांनाही नीट जपलं पाहिजे. कारण शरीर नीट नसेल तर मनाला काही न काही त्रास होतच असतो.आणि मनातील वेदनांमुळेही देहाला त्रास हा होतच असतो.म्हणजे पहा… , सगळं आपल्या कर्मावर अवलंबून असतं.त्यामुळे ते करताना नेहमी सांभाळून.. समजून उमजून करा….नाहीतर जे फळ मिळायच ते मिळणारच…!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


