Skip to content

दुसऱ्याने भरलेल्या कानांवर ठेवलेला विश्वास माणसाला कायम संकटात टाकतो.

दुसऱ्याने भरलेल्या कानांवर ठेवलेला विश्वास माणसाला कायम संकटात टाकतो.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


संध्या आणि विकासच नुकतच लग्न झालं होत. लग्न साध्या पद्धतीने आणि मोजक्या, अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत पार पडलं. कारण दोघांनाही जास्त खर्च नको होता. त्याला कारणही होते. विकासची परिस्थिती चांगली होती. खर्च त्यांना पेलवणार नाही असा काही विषय नव्हता. पण संध्या, तिची परिस्थिती मात्र तशी बेताची होती. त्यामुळे तिचा स्वभाव पण काटकसरी होता. कोणतीही गोष्ट करताना ती विचार करे.

आता अस असताना या दोघांचं लग्न कसं जमलं. तर याला कारण म्हणजे विकास आणि त्याच्या घरातल्या माणसांना आधीपासून चांगली संसारी, संस्कारी अशी मुलगी हवी होती. त्यांना पैश्याची श्रीमंतीच हवी होती अस नाही. त्या दृष्टीने संध्याच कुटुंब चांगल होत. अगदी श्रीमंत नसले तरी ती माणसं चांगली होती. संध्याने स्वतःच्या हुशारीने चांगल शिक्षण घेतल होत व आता ती नोकरी करत होती. घर सांभाळत होती. थोडक्यात ती गुणी तसच स्वावलंबी मुलगी होती. अजून काय लागतं संसार करायला? हा सर्व विचार करून लग्न जमून आलं होत.

संध्याच्या आई वडिलांनादेखील खूप समाधान वाटलं कारण तिच्या सासरची मंडळी चांगली होती. आपली मुलगी चांगल्या घरात गेली या विचाराने ते सुद्धा सुखावले. अश्या रीतीने नवीन संसार सुरू झाला. संध्या रोज सकाळी लवकर उठून सर्वांना नाश्ता वैगरे बनवत असे. तसच घरातली कामं आवरली की स्वतः तयारी करून कामावर जात असे. वरच्या सर्व कामांना घरात माणसं होती, त्यामुळे तो प्रश्न काही येत नसे.

पण जेवण, चहापाणी बाहेरून काही आणायचं असेल हे सर्व संध्या करत होती. अगदी थोड्या वेळात तिने सर्वांच्या आवडी निवडी जाणून घेतल्या. विकास सोबत देखील तिचं नवरा बायकोहून ही मैत्रीचं नातं झालं होत. ते दोघंही त्यांच्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगत, त्याच बरोबर दिवसभरात काय काय झालं यावर पण ते बोलत. त्या दोघांमध्ये कसलाही आडपडदा नव्हता.

अस हे एक सुखी कुटुंब होत. पण चांगल्या गोष्टींना नजर लागायला वेळ लागत नाही. तसच काहीस इथे झालं. संध्याचा हा सुखी परिवार शेजारी असलेल्या बऱ्याच जणांच्या डोळ्यात खुपत होता. त्यांना हे अस हसत खेळत कुटुंब नको होत. अशी माणसं आजूबाजूला असतातच. त्यांच्या स्वभावाचा तो भागच असतो. जितके वाद होतील, तंटे होतील त्यात यांना आनंद असतो. तशीच एक संधी साधून आली. संध्या जेव्हा एकदिवस बाझार घेऊन येत होती तेव्हा शेजारच्या काकू तिच्याशी बोलायला आल्या.

“अरे संध्या कशी आहेस? काम कसं सुरू आहे तुझ?” “मस्त काकू. तुम्ही कश्या आहात?” संध्या. “मी पण छान आहे. माझा काय आता अर्ध आयुष्य जगून झालं आहे. तुमच्या सारख्या मुलांचे नवीन संसार पाहायचे हे काम आता!” अस म्हणून त्या हसल्या. “बाकी सासूचा रुसवा गेला का आता? आता बोलतात त्या नीट तुझ्याशी?” त्यांचा हा प्रश्न संध्याला समजला नाही. कारण लग्न झाल्यापासून असा कधी प्रसंग आला नव्हताच. आता एक घर आहे माणसं आहेत त्यामुळे भांड्याला भांडं लागत. ते पण तेवढ्यापुरत असत. पण त्यातून सासू तिच्यावर रुसली आहे अस कधी झालं नाही.

तिने अबोधापणे विचारले, “मला समजलं नाही तुम्ही काय म्हणताय ते! त्यावर त्या जवळ येत हळू आवाजात म्हणाल्या, अग तुला कसं ठाऊक असेल. तू होतीस लग्नाच्या नादात. पण आम्हाला आहे ना सर्व माहीत. तुझ्या सासूला खरतर तू सून म्हणून पसंद नव्हतीस. त्यांना चांगल्या श्रीमंत घरची सून हवी होती. पण शेवटी मुलापुढे कोणाचं काय चालत?” संध्याला यावर विश्वास बसेना कारण कधीही त्यांनी तिची परिस्थिती काढली नव्हती.

ती म्हणाली, “तुमचा काहीतरी गैरसमज झालाय काकू, आईंच अस काही नाहीये. त्या कधी माझ्याशी अस वागल्यादेखील नाहीत.” त्यावर काकू म्हणाल्या, “अग पोरी तू अजून खूप जग पाहायचं आहेस. या अश्या गोष्टी कोण तोंडावर बोलून दाखवत नाही. तुझ्या समोर बोलल्या नसतील. पण आमच्याकडे त्या अनेकदा बोलून गेल्या होत्या.” सकाळपासून संध्या अगदी छान मुड मध्ये होती. पण हे सर्व बोलण ऐकून ती अस्वस्थ झाली. तिला त्यांचं बोलण खर वाटत होत अस नाही.


पण परिस्थितीमध्ये असलेला भेद तिला माहीतच होता. त्यामुळे या गोष्टीमुळे जर सासू नाराज झाली असेल तर ती शक्यता नाकारता येत नव्हती. तिला तिथे फार वेळ थांबण्याची इच्छा नव्हती. घरी काम आहे अस सांगून तिने काकूंचा निरोप घेतला. घरी आल्यावरही त्यांचे ते शब्द कानात घुमत होते. कामात लक्ष लागेना. सासूने हे पाहिलं तिने विचारल देखील पण कामाचा थकवा आहे अस सांगून संध्याने विषय बदलला. विकास जेव्हा घरी आला तेव्हा तिने त्याच्या जवळ फिरवून प्रश्न विचारला, की खरच ती सून म्हणून सर्वांना पसंद होती का? त्याला पण आश्चर्य वाटलं.

इतक्या दिवसांनी तिने हा प्रश्न का विचारावा याच. पण तिने खूप आग्रह केल्यावर तो बोलला की सर्वांना ती पसंद होती. अगदी आईला पण. एक दोनदा आई गमतीत म्हणाली होती, की मला श्रीमंत सून पाहिजे म्हणजे मला मिरवता येईल. पण हे खरच गमतीत बोललेल होत तेही त्यांचं लग्न जमायाच्या खूप आधी. पण हे इतकंच संध्याला पुरेस होत परत अस्वस्थ व्हायला व त्यावर विचार करायला. त्या दिवसापासून तिचा स्वभावच हळू हळू बदलत गेला. सासूने केलेल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीने देखील तिला फरक पडू लागला.




सोबत मध्ये मध्ये भेटत असलेल्या काकू होत्याच डोक्यात नवीन नवीन गोष्टी भरवायला. या सर्व गोष्टींमुळे घरात वरचेवर वाद होऊ लागले. कशी मी गरीब आहे म्हणून मला हे अस वागवलं जात या सारख्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. एका मर्यादेनंतर सासू पण बदलून गेली. ज्या गोष्टी चुकूनही घरात निघत नसत त्याच नेमक्या निघू लागल्या. ज्यात संसार, घर वैगरे सर्व आलं. चूक कोणाची होती? ते कोणा भलत्याचीच. पण फळ मात्र यांना भोगावी लागली. एक हसत खेळत कुटुंब दुभंगल.

हे असे प्रसंग अनेकदा होत असतात. कोणतरी अगदी कमी ओळख असलेला माणूस आपल्या डोक्यात काहीतरी भरवतो आणि आपण सहजपणे त्यावर विश्वास ठेवून आपली चांगली नाती खराब करून टाकतो. स्वतःला संकटात टाकतो. संध्याच पण इथे काय चुकल तर तिने त्या बाईवर पटकन विश्वास ठेवला. तिच्या बोलण्याला खरच काही आधार आहे का हा विचार तिने केला नाही. समोरची व्यक्ती दर वेळी भोळी बनून बोलली, वागली म्हणजे ती खरच तशी असते अस होत नाही हे तिच्या लक्षात आलं नाही.


जर तिने एकदा शांतपणे सद्सद्विवेकबुध्दी वापरून विचार केला असता, त्या बाईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं असत तर कदाचित पुढे होणाऱ्या गोष्टी ती टाळू शकली असती. म्हणून कधीही कोणावर आंधळा विश्वास न ठेवता, पटकन काहीतरी ऐकून त्यावर प्रतिक्रिया न देता विवेकी विचारांचा फिल्टर त्याला जोडला पाहिजे. त्यातली सत्यता तपासून पाहिली पाहिजे. तरच आपण अश्या धोक्यापासून वाचू शकतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!