नेहमी दुसऱ्याची परिस्थिती ही आपल्यापेक्षा चांगली आहे, असं का वाटतं?
मिनल वरपे
लहानपणी प्रत्येकाची गंमत असते ती म्हणजे प्रत्येक लहान मूल जी वस्तू जे खेळणं दिसेल ते तो आईवडिलांकडे हट्ट करून मागतो आणि बिचारे आईवडील परिस्थितीनुसार जेवढं जमेल तितके प्रयत्न करून त्याला ती वस्तू ते खेळणं त्याला आणून देतात.
लहानपणी सहज हट्ट करून रडून आपल्याला हवं ते मिळते पण तेच मोठ झाल्यावर आपल्याला जे दिसेल ते हवं तर असते पण मनात जाणीव असते ती म्हणजे आपल्या परिस्थितीची. अर्थात काही अपवाद असतात.
जेव्हा नेहमी आपण परिस्थितीला समजून घेऊन तस वागत असतो पण बहुतेक वेळा आपल्याला मनात एक प्रश्न पडतो आणि तो म्हणजे आपली परिस्थिती ही अशी का??
आपली परिस्थिती आपल्याला कायम चांगली वाटत नाही कारण नेहमी दुसऱ्याची परिस्थिती ही आपल्यापेक्षा चांगली आहे हा विचार आपल्या मनात कायम एक जागा करून घेतो.आणि असे का वाटते याची काही कारण आपण जाणून घेऊयात:
समाधान
बहुतेक ठिकाणी परिस्थिती वाईट असल्याचं दुःख मुलांना जाणवते आणि त्यामुळे ते दुसऱ्या मुलांसोबत तुलना करतात पण वय शिकण्याचं असल्यामुळे ते त्यावेळी काही करू शकत नाही मग अशावेळी जे आहे त्यामधे समाधान मानावं आणि नंतर शिक्षण घेऊन परिस्थिती बदण्यासाठी प्रयत्न करावेत.
प्रयत्न
दुसऱ्यांकडे जे आहे ते बघून सतत स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या परिस्थितीत कशा प्रकारे प्रयत्न करून बदल करता येतील याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे. मला नाही जमणार म्हणून प्रयत्न करणे सोडायचे नाहीत तर मी सुद्धा जमेल तेवढे प्रयत्न करून माझ्या परिस्थितीत सुधारणा करेन अशी जिद्द ठेवली तर नक्कीच परिस्थितीत बदल होणारच.
विचार
काही लोक दुसऱ्यांची परिस्थिती कशी चांगली हाच विचार करत बसतात तर काही लोक फक्त मी हे करेन, अस करेन तस करेन हे विचार करत राहतात. जर आपण या विचारांना कृतीची जोड दिली तर नक्कीच आपल्या ऊर्जेचा योग्य तो वापर होईल.
ध्येय
ज्यांना ध्येय नसते ते लोक भरकटतात. काय करायचं आणि कस करायच याबद्दल त्यांना काहीच कल्पना नसते आणि त्यामुळे त्यांच्याकडे असलेली वेळ, ऊर्जा आणि शिक्षण यांचा ते योग्य ते उपयोग करत नाहीत. योग्य ध्येय समोर ठेवले तर नक्कीच आपण ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणार आणि त्याबरोबरच आपली वेळ आपली परिस्थिती यामधे बदल घडवणार.
मानसिकता
ज्यांना कायम नकारार्थी विचार करायची सवय असेल असे लोक कायम मागे राहतात. स्वतः तर पुढे जात नाहीतच आणि दुसऱ्यांना सुद्धा नकारार्थी बोलून मागे ओढण्याचा प्रयत्न ते करतात. त्यामुळे नकारार्थी विचारांपासून आणि नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांपासून जास्तीत जास्त दूर राहील तर नक्कीच एका योग्य दिशेने वाटचाल करून आपण प्रगती करणार.
संकुचित आयुष्य
असे अनेक लोक आपल्याला भेटतात ज्यांना आजूबाजूला काहीही चालले असो पण काहीही फरक पडत नाही. त्यांना चार भिंतीत राहण्याची सवय झालेली असते. आपले मित्र, शेजारी, कामातील सहकारी हे कशे पुढे गेले कस यश मिळवलं हे जाणून घेण्याची उत्सुकता सुद्धा या लोकांमधे नसते आणि त्यामुळेच अशी लोक जगाच्या पाठीवर राहतात.आणि या संकोचित स्वभावामुळे परिस्थिती मधे बदल करून घेण्यासाठी ते मागे पडतात.


