Skip to content

दुःखी व्यक्तींना ‘कम्फर्ट झोन’ देण्यापेक्षा त्यांना सक्षम करायला हवं!!

दुःखी व्यक्तींना ‘कम्फर्ट झोन’ देण्यापेक्षा त्यांना सक्षम करायला हवं!!


मेराज बागवान


दुःख वाटल्याने कमी होते असे म्हणतात.इतरांशी बोलून दुःखावर तोडगा काढता येतो. हे जरी खरे असले तरीही काही प्रमाणात इतरांच्या दुःखात आपण स्वतःला किती आणि कोणत्या पातळीपर्यंत सामील करून घ्यायचे याला देखील मर्यादा असतात. करण कितीही झाले तरी लोकांच्या आयुष्यात फार मोठे दुःख आहे म्हणून आपले आयुष्य थांबवून चालत नाही. आणि जर का आपण असे करत असू तर आपण आपल्या आयुष्यावर अन्याय करत आहोत.म्हणूनच इतरांच्या दुःखात स्वतःला फार दूरपर्यंत फरपटत नेऊ नये.

आपण माणूस आहोत.समूहात राहणे आपल्याला आवडते.कोणीच ह्या जगात फार काळ एकटा राहू शकत नाही. मग जेव्हा आपण समाजात वावरत असतो, तेव्हा अनेकांशी आपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या संबंध येतो.नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र-मंडळी आणि कुटुंबीय -घरातील व्यक्ती असतात.प्रत्येकाशी आपण बोलत असतो,त्यांच्यासोबत आपण जगत असतो.

सुख-दुःखाच्या गोष्टी होतात. एक माणूस म्हणून सुख-दुःखे शेअर करणे , मन मोकळे करणे ही खूप चांगली गोष्ट आहे.काही दुःख असेल तर एकमेकांना त्यावर उपाय सांगणे , किंवा मार्ग दाखवणे , दुःख कमी कसे होऊ शकते ह्यावर बोलणे इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत. पण एका विशिष्ट पातळीनंतर, दुःख हे ज्याचे त्यानेच सहन करायचे असते आणि त्यातून मार्ग हा काढायचा असतो. कारण प्रत्येक जणच इतरांच्या दुःखात स्वतःला कायमचे झोकून देत असेल तर वास्तव जीवनाला काही अर्थच उरणार नाही. म्हणूनच वास्तव जीवनाचा समतोल साधायचा असेल तर लोकांच्या दुःखात स्वतःला फार दूरपर्यंत फरफटत नेऊ नये.

दोन मैत्रिणी असतात.खूप जवळच्या.प्रत्येक गोष्टी एकमेकांशी शेअर करणाऱ्या.दोघी आपापल्या संसारात व्यस्त होत्या.त्यामुळे कालांतराने दोघींमधील संवाद तुटू लागला.जबाबदाऱ्या वाढत होत्या.त्यामुळे दोघी देखील एकमेकांना समजून घेत आयुष्य जगत होत्या.जवळजवळ वर्षभर दोघींचा काहीच संपर्क झाला नाही. आणि मग अचानक एके दिवशी एका मैत्रीणीने दुसरीला फोन केला, आणि मग त्यांची भेट ठरली.भेटी-गाठी झाल्या.त्यानंतर त्यातील एक मैत्रीण काही गोष्टी शेअर करू लागली, ज्या गोष्टींमुळे तिच्या आयुष्यात उलथापालथ झाली होती.

ती सांगू लागली.” अग ,हे वर्ष खूप कठीण गेले बघ.नवरा खूप आजारी होता. दवाखाने मागे लागले होते सारखे. जवळजवळ महिनाभर नवरा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता.कामावर जाऊ शकला नाही , चार महिने.त्यामुळे पगार पूर्ण बंदच होता.त्यातच सासऱ्यांना अर्थांगवायूचा झटका आला. आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. माझ्या पदरात सहा महिन्यांची मुलगी.कुणाला सांभाळू, कुणाचे पाहू, काहीच सुचत नव्हते बघ. ह्या सगळ्या गोष्टी एका मागोमाग घडत होत्या. घराची जबाबदारी येऊन पडली.नवरा खूप नैराश्यात गेला होता बघ. आता ह्या सगळ्या गोष्टींना चार पाच महिने उलटून गेले. आता कुठे काही गोष्टी पूर्ववत होत आहेत.”

हे सर्व ऐकल्यानंतर , दुसरी मैत्रीण बोलू लागते.” अग तू मला का नाही हे सर्व सांगितले. मी होते ना..” आणि त्यांचे यावर बोलणे सुरू झाले. काही वेळाने दोघींनी एकमेकांचा निरोप घेतला.

पण ह्या सगळ्यात जी मैत्रीण ऐकत होती तिच्यावर खूप परिणाम झाला. ती खूप दुःखी झाली. इतकी की तिला फक्त तिच्या मैत्रीणीचे च आयुष्य समोर दिसू लागले.प्रत्येकवेळी तिचीच काळजी वाटू लागली.तिचे मन इतर कुठल्याच गोष्टीत रमत नव्हते. ती तिला सारखे फोन करून तिची चौकशी करू लागली. “तू बरी आहेस ना, तुला काही झालं तर नाही ना.,घरी सर्व ठीक आहे ना? ” अशी अतिकाळजी करू लागली आणि स्वतःचे वास्तव जीवन विसरू लागली.आणि काही काळाने स्वतःच नैराश्यात जाऊ लागली, की अरे मी माझ्या मैत्रिणीला मदत नाही करू शकले आणि स्वतःच दुःखी होऊ लागली.

असे अनेकवेळा घडू शकते. म्हणूनच इतरांच्या दुःखात स्वतःला कुठपर्यंत गुंतवायचे याला मर्यादा हव्यात. अर्थातच ,अगदी तुसडेपणाने वागणे, किंवा इतरांचे दुःख ऐकून देखील न घेणे हे पण योग्य नाही.शेवटी आपल्याला माणुसकी नाही सोडायची , पण आपले पण आयुष्य जगायचे आहे.वरील उदाहरणात जशी त्या स्त्री ची मानसिक अवस्था झाली तशी होऊन देखील कसे चालेल ? आपल्यामुळे कोणाचे काही अडत नाही. आपल्या जवळची व्यक्ती असते , त्यामुळे तिच्याबद्दल आपल्याला भावना असणे , सहानुभूती वाटणे साहजिकच आहे. पण आपले पण आयुष्य असते, आपल्यावर देखील जबाबदाऱ्या असतात, आपल्यावर घरात कोणीतरी अवलंबून असतो.मग हे सगळं विसरून कसे चालेल ? आयुष्यात लोकांच्या दुःखाबरोबरच स्वतःच्या आयुष्याचा समतोल हा राखता आला पाहिजे.

ह्या जगात अशा काही व्यक्ती होऊन गेल्या आहेत आणि अजूनही आहेत ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्यच इतरांची दुःखे पुसून टाकण्यासाठी कायमची वाहून घेतली आहेत. जसे की ,मदर टेरेसा, सिंधुताई सपकाळ,प्रकाश आमटे या सारख्या व्यक्ती पहिल्या तर त्यांचे जीवनच जणू इतरांसाठीच आहे हे आपल्या लक्षात येईल. परंतु , त्याच्या आयुष्याचे ध्येयच वेगळे आहे.ह्या सर्व व्यक्ती समाजासाठी एक आदर्श आहेतच. पण अशा व्यक्तींसारखे आपल्यासारख्या माणसांना प्रत्येक वेळी नाही वागता येत ना? समाजसेवा हे व्रत ज्यांनी हाती घेतले आहे त्यांच्यासाठी लोकांच्या दुःखात स्वतःला लोटून घेणे हे काही वेगळे नाही. पण त्या व्यक्ती देखील लोकांचे दुःख कमी करता करता स्वतःचे आयुष्य हे जगतच आहेत की.म्हणून इतरांच्या दुःखात कुठपर्यंत स्वतःला घेऊन जायचे हे आपल्याच हातात असते.

माणूस हा भावनाशील प्राणी आहे. जवळच्या लोकांबद्दल आपण भावनिक असतो.त्यांची मग नकळत आपल्याला नेहमीच काळजी , आपुलकी असते. पण ह्याच काळजीचे ‘अति काळजीत’ रूपांतर झाले की मग आपली मानसिक स्थिती हळूहळू ढासळू लागते. अनेकवेळा मग त्याच जवळच्या लोकांविषयी भलते-सलते विचार मनात घोटाळू लागतात. जसे की , ” तिला/त्याला काही झाले तर नसेल ना? आजारी तर नसेल ना? ” इत्यादी. त्यामुळे भावनिक समतोल साधता आला पाहिजे.

कारण एकदा का व्यक्ती भावनिक रित्या कोलमडून गेली की तिचे वास्तव जीवनात लक्ष केंद्रित होत नाही, मग ती व्यक्ती बौद्धिक रित्या कितीही हुशार असली तरीही.त्यामुळे लोकांच्या दुःखाविषयीची मानसिकता नियंत्रित करता यायला हवी. उगाच वाहत जाणे म्हणजे आपण लोकांची किती काळजी करतो ,असे नव्हे. याने फक्त आपल्यालाच त्रास होतो. ते म्हणतात ना , ‘अति तिथे माती’, अगदी तसेच.

समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात किती जरी दुःख असले तरीही आपण काय देव नाही की आपण च त्याची दुःखे कमी करू शकतो. त्यामुळे स्वतःला च ‘मसिहा’ समजण्यापेक्षा, त्या व्यक्तीला स्वतःचा वेळ द्यावा , म्हणजे काही काळ सरल्यानंतर आपोआप ती तिच्या दुःखातून मार्ग काढू शकेल.मग अशा वेळी, मनावर दगड ठेवून फक्त सकारात्मक संवेदना त्या समोरच्या व्यक्तीला देणे योग्य ठरते. सर्वोतोपरी मदत करावी पण मर्यादा ह्या हव्याच. आणि जर का आपली मर्यादा रेषेपलिकडे जात असेल , तर आपणच आपल्या व्यक्तीला ‘पंगू’ बनवत आहोत. प्रत्येक व्यक्ती स्वतःचे दुःख सांभाळून घेण्यासाठी सक्षम असते. फक्त आपण तिला ‘कम्फर्ट झोन’ देण्यापेक्षा तिला सक्षम केले पाहिजे. म्हणजे ती देखील स्वतःचे दुःख समजून घेऊन त्यातून मार्ग काढू शकेल.

आपण जर का प्रत्येकवेळी इतरांच्याच दुःखात स्वतःला झोकून देत असू , तर मग आपण स्वतःसाठी कधी जगणार? आपल्यावर देखील जबाबदाऱ्या असतात. आपले पण खाजगी असे आयुष्य असते. त्यामुळे त्याकडे देखील लक्ष देणे आयुष्यात जरुरीचे असते. जर आपण आपले आयुष्य असेच लोकांच्या दुःखात फरपटत नेत असू तर आयुष्यात स्वतःचे असे वेगळे अस्तित्व आपण कधीच उभे करू शकणार नाही. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असते. नेहमी मदत ही केली पाहिजे. पण आपले आयुष्य देखील पणाला लावून नाही ना चालत?

त्यामुळे काही वेळेस आयुष्यात कठोर निर्णय घ्यावे लागतात. स्वतःसाठी आणि कधी कधी आपल्याच माणसांच्या भल्यासाठी…..



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!