Skip to content

“दुःखाला सतत चिकटून बसणारी माणसं आपल्यालाही गोत्यात आणू शकतात.”

“दुःखाला सतत चिकटून बसणारी माणसं आपल्यालाही गोत्यात आणू शकतात.”


मधुश्री देशपांडे गानू


” जगी सर्व सुखी असा कोण आहे?

विचारे मना तुच शोधुनी पाहे..”

श्री समर्थांनी किती समर्पक सांगून ठेवले आहे. या जगात सर्वात सुखी असा कोण आहे, याचा हे मानवा तूच शोध घे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःख हा उन-पावसाचा खेळ चालूच असतो. सुख ही आणि दुःख ही भोगावीच लागतात. भोगून संपवावी लागतात. यातून कोणाचीही सुटका नाही. जेव्हा आपण भरभरून सुख उपभोगत असतो तेव्हा, “मी सुखी का? माझ्याच वाट्याला हे का?” असा प्रश्न परमेश्वराला विचारतो का? दुःखाला सामोरे जाताना मात्र, “मीच का? माझ्याच वाट्याला हे दुःख का ?”असा प्रश्न पडतो आपल्याला.

याचं कारण दुःखाला सामोरे  जाण्याचं सामर्थ्य, समंजसपणा, विवेक बुद्धी, वास्तवाचा स्वीकार या सगळ्याचा बहुतेक व्यक्तींमध्ये अभाव असतो. विचार आणि विवेकाने वागणारी माणसे या दुःखद प्रसंगांना ही धीराने सामोरे जातात. आणि सारासार विचारांनी लवकर यातून बाहेर पडतात. अगदी कितीही जवळचं, प्रेमाचं माणूस आपल्याला कायमचं दुरावलं तरी जगरहाटी चालूच राहते ना! जे मागे राहिले आहेत त्यांना त्यांचे जीवन जगावे लागते. मग जी प्रेमाची माणसं आता तुमच्याजवळ आहेत, त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठीही जगणं आलंच. मग ते सकारात्मकतेने, सक्षम मानसिकतेने जगायलाच हवं.

तरीही काही माणसं असतात अगदी घरटी एक तरी अशी व्यक्ती असतेच असते, जी फक्त दुःख उगाळत बसते. केव्हातरी भूतकाळातील दुःखद घटनांचा इतका पगडा तिच्या मनावर असतो की ती त्यातून बाहेर पडू शकत नाही. सतत एक प्रकारचा दुःखी, सुतकी चेहरा करून ही व्यक्ती वावरत असते. प्रत्येक घडणाऱ्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रचंड नकारात्मक असतो. जणूकाही आजूबाजूला सगळे वाईटच घडत असतं.

अगदी रोजच्या घडणाऱ्या शुल्लक प्रसंगांकडे, आपल्याच माणसांकडे बघण्याचा या व्यक्तीचा दृष्टिकोन इतका नकारात्मक असतो की चांगलं, मंगल काही दिसतच नाही. ही माणसं सतत दुःखाचा विचार करत असतात. सतत “मी किती दुःखी आहे, माझ्यावर कसा अन्याय झाला, माझं नशीब कसं वाईट आहे” याचंच “गुणगान” गात असतात.

प्रत्येकाला स्वतःची “दर्दभरी कहाणी” ऐकवत असतात. अत्यंत किरकिरी, चिडक्या स्वभावाची असतात. ही माणसं कोणाचंही नीट ऐकून घेत नाहीत. अशी एक जरी व्यक्ती कुटुंबात असेल तरी तिला सांभाळणे खूप कठीण असते. सगळ्या घरावर या नकारात्मक व्यक्तिमत्त्वामुळे अवकळा पसरते. अशी व्यक्ती खरे तर कोणालाच आवडत नाही.

काहीही कारण नसताना कुटुंबातील इतर सदस्यांना आनंदाचे, सुखाचे प्रसंग मोकळेपणाने साजरे करता येत नाहीत. भरभरून आनंद घेता येत नाही. या व्यक्तीच्या दुःखाचे गालबोट असतेच. पून्हा घरातील सदस्यांना उगाचच अकारण आनंदी होण्याचे ही “गिल्ट” येते. पण खूपदा ही व्यक्ती आपल्या कुटुंबाचाच भाग असल्याने आपण तिला सांभाळत राहतो. पण घराचा आनंद नष्ट होतो. घरातील व्यक्तींचीही चिडचिड होऊ शकते.

अशा व्यक्ती बरेचदा अत्यंत तुसड्या, माणूसघाण्या होतात. पटकन कोणालाही काहीही बोल लावणाऱ्या असतात. दुसऱ्याचं सुख, आनंद यांना बघवत नाही. यामुळे कुटुंबातील सदस्यांची इतर महत्त्वाची नाती दुखावू शकतात, कायमची दूर होऊ शकतात. काही आर्थिक, व्यावसायिक नुकसान होऊ शकते.

याच व्यक्ती कधी दुःखाच्या आवेगात आक्रमक होतात. कोणाला इजा करू शकतात. त्यांचा त्यांच्या भावनांवर, कृतीवर ताबा राहत नाही. अशा व्यक्तींना ताबडतोब समुपदेशनाची गरज भासते. घरातील इतर सदस्यांची मानसिक स्थिती या एकाच व्यक्ती मुळे बिघडू शकते. रोजच्या दिनक्रमात, कामात अडथळे येतात. इतर सदस्यांचे मानसिक, शारीरिक स्वास्थ्य बिघडते.

नक्कीच अशा व्यक्तींना त्यांच्या या परिस्थितीतून, मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण आपण आपले मनस्वास्थ्य बिघडू देऊ नये. स्वतःला कोणत्याही परिस्थितीत दोषी मानू नये. “प्रत्येकाला आनंदी राहण्याचा हक्क आहे आणि भरभरून आनंद घ्यायलाच हवा.” अशा व्यक्तींकडे प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करायला शिका. त्यांच्या दुःखाला गोंजारू नका. त्यांच्या तथाकथित दुःखाच्या लाटेत तुम्ही वाहून जाऊ नका.

कारण त्याचा काहीही उपयोग नाही. अशा सतत दुःखी राहणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करत असतात. त्यांना या दुःखाची चटक लागते. सतत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. स्वतः आयुष्यात पुढे जात नाहीतच, यशस्वी होण्याचा प्रयत्न ही करत नाहीत. वर “मी दुःखी आहे” हे निमित्त सतत पुढे करतात.

अशा सतत दुःखी व्यक्ती त्यांच्या स्वभावामुळे, वागण्यामुळे आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक स्तरावर कधीही तुम्हांला गोत्यात आणू शकतात. कोणतेही टोकाचे पाऊल उचलू शकतात. अशा व्यक्तीवर वेळीच इलाज होणे गरजेचे आहे. पण या व्यक्तीमुळे तुम्ही स्वतःचे आयुष्य आनंदाने जगणे, सुखाचे स्वागत करणे थांबवू नका. जी व्यक्ती दुःख भोगून, स्वीकारून लवकर संपवते तीच व्यक्ती लवकर सुखाला सामोरी जाते. शेवटी हे सगळे तुमच्या मानण्यावर आहे.

“जीवन प्रवाही आहे” एका दुःखद प्रसंगाने जीवन थांबत नाही. आणि नकारात्मक व्यक्तीमुळे तुमच्या सकारात्मकतेवर परिणाम होत नाही, हे एकदा तुमच्या लक्षात आलं की त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या विचारांमध्ये थारा देत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुखाचे आनंदाचे क्षण भरभरून जगायला सज्ज होता…. हो ना!

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!