दुःखांना कवटाळून हे असं अजून किती दिवस जगणार ??
मेराज बागवान
आपले आयुष्य सुख दुःखांनी भरलेले असते. आपण सर्व जण हे जाणत असतो की , सुख तसेच दुःख दोन्ही कायम नसते.दोन्ही गोष्टींमध्ये आयुष्य जो पर्यंत आहे तो पर्यंत चढ-उतार चालूच राहणार असतात.त्यामुळे कोणतीच गोष्ट कायम नसते, हे कायम मनावर बिंबवले पाहिजे. सुखाविषयी बोलणे तसे सोपे असते.पण दुःखाचे काय? अनेक जण आयुष्यातील दुःखाला कायम कवटाळून बसलेले असतात.पण हे कुठपर्यंत चालणार? आणि ह्या दुःखांना कवटाळून हे असं अजून किती दिवस आपण जगणार ??
आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख हे असतेच.फरक असतो तो प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा. अनेक दुःखे असतात, घरात कोणीतरी कायम आजारी असते, दुर्धर आजाराने ग्रस्त असते, कधी नातेसंबंध दुरावलेले असतात, कधी आर्थिक परिस्थिती बेताची असते, काही घरात सतत कलह पाचवीला पुजलेले असतात,तर कुठे नोकरीच्या ठिकाणी विविध प्रकारची घुसमट होते असते, तर कुठे कुणाच्या तरी आयुष्यात अनेक प्रकारे कायम अन्याय-अत्याचार होत असतो आणि कधी व्यक्ती कायमची साथ सोडून जगातून निघून गेलेली असते.
अशी अनेक प्रकारची दुःखे माणसाच्या आयुष्यात असतात.फक्त दुःखाची पातळी कमी-जास्त असते.काही दुःखे जणू आयुष्यात कायमचीच झालेली असतात.ही सगळी दुःखे मनाला प्रचंड वेदना देत असतात.मनाला पोखरत असतात.कधी स्वतःची दुःखे असतात तर कधी आप्त जनांची.
पण दुःख कोणाचेही असो त्रास हा आपल्याला होतोच.कारण भावनिक रित्या आपण आपल्यासाठी, आपल्या प्रिय जणांसाठी विचार करत असतो.पण असे सगळे असले तरी देखील ह्या दुःखांना कायम कवटाळून बसणे कितपत योग्य आहे? कारण दुःख दुःख करून आयुष्याला आपण ‘ब्रेक’ तर लावू नाही शकत ना ? आणि आपण तसे कधीच केले नाही पाहिजे.कारण दुःख असले तरी देखील ‘पुढे जात राहणे’ गरजेचे असते.स्वतःसाठी तसेच आपल्या प्रिय जणांसाठी देखील.
दुःख आयुष्यात कायम जरी नसले तरी काही दुःखे कायमची होऊन जातात आयुष्यात. जसे की एखादे नाते संपुष्टात येणे. मग त्यासाठी कारण कोणतेही असो.मग हे नाते पुन्हा कधीच जोडले जाऊ शकत नाही.पण म्हणून कायम मनात हेच ठेवून म्हणजे, ‘ती/तो मला सोडून गेला, त्याने मला खूप त्रास दिला, माझे आयुष्य उध्वस्त केले’ , असे म्हणून काय उपयोग आहे?
कारण घडणारी घटना, गोष्ट तर घडून गेलेली असते.जाणारी व्यक्ती निघून गेलेली असते.मग आपण स्वतःला इतका त्रास, तोही आयुष्यभर का करून घ्यायचा? त्याऐवजी , आपण त्या दुखाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.म्हणजे ,’जे होते ते चांगल्यासाठीच, ती व्यक्ती माझ्या लायकच नव्हती, माझ्या आयुष्यात तिला मी स्थान द्यावे इतकी ती महत्वाची नव्हती,
त्या व्यक्तीबरोबरचा प्रवास माझा इथपर्यंतच होता, त्या दुःखामुळे माझ्या आयुष्यला नवीन दिशा मिळाली आणि मी पूर्वीपेक्षा जास्त समाधानी आयुष्य आता जगू शकतो आहे’ असे आपण स्वतःला म्हणले पाहिजे आणि तशी कृती देखील केली पाहिजे. तर आणि तरच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकू.
अनेकदा आपण फक्त दुःख, त्यातून झालेला त्रास, दुःख देणारी घटना, व्यक्ती लक्षात ठेवतो.आणि आयुष्यभर कुढत जगतो. याऐवजी आपण त्या सर्व दुःखांमधून काय शिकलो, नवीन धडा काय मिळाला, विश्वास कोणावर कसा आणि किती ठेवावा ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.अर्थातच ज्या दुःखामुळे आपले आयुष्य पूर्णतः बदलते ते आपण विसरू शकत नाहीच, पण ते कायम मनात घेऊनच जगले पाहिजे असे नाही.किंबहुना ते दुःख आपण मनाच्या एका कप्यात कायमचे बंद करून त्यातून सकारात्मक गोष्टी शिकून पुढे जात राहिले पाहिजे.
मध्यंतरी एक मालिका दूरदर्शन होती.ज्यात, एका गृहिणीचा पती ‘विवाहबाह्य संबंधातून’ तिची फसवणूक करतो.आणि त्या बिचाऱ्या गृहिणीचा संसार मोडतो.ती फार दुःखी होते.पण दुसऱ्याच क्षणी एक साधी गृहिणी स्वतःच्या हिमतीवर उभी राहून एक यशस्वी उद्योजिका बनते.
अनेकांना, गरजू व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन त्यांच्या घरात प्रकाश आणते.इथे, जर ती गृहिणी कायम तिच्याच दुःखात राहिली असती तर आज ती इथपर्यंत पोहचू शकली नसती.म्हणूनच प्रत्येकाला दुःखातून देखील स्वतःसाठी , आपल्या माणसांसाठी एक सकरात्मक आयुष्य जगता आले पाहिजे. कधी कुटुंबियांना आपली गरज आहे म्हणून तर कधी स्वावलंबी बनावे यासाठी आयुष्यात नेहमी पुढे जात राहिले पाहिजे. कारण दुःख दुःख करीत बसण्यापेक्षा आयुष्याची वेगळी वाट धरून, आयुष्याला नवीन वळण देणे कधीही उचित असते.
व्यक्ती आयुष्यातून निघून गेली आणि नाते कायमचे संपले यामुळे नक्कीच त्रास होतो.पण मृत्यूमुळे जी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे , ह्या दुखापेक्षा जास्त दुःख त्या गोष्टीचे होते, जेव्हा ती व्यक्ती जिवंत असते पण तरी देखील नाते पुन्हा कधीच जुळू शकत नाही.पण काही वेळेस काही नाती कायमची संपलेलीच बरी असतात.मग ती जिवंत असली तरी देखील.कारण , ती नाती पुन्हा जुळण्यापेक्षा , कायमची दूर झालेलीच बरी असतात.
कारण यामुळे दोन्ही व्यक्तींना त्रास होत नाही आणि दुःख देखील काळाच्या ओघात विरून जाते.अर्थातच हे वाटते तितके सोपे देखील नाही.पण मनाचा खंबीरपणा हा दाखवावाच लागतो.कारण कायम दुःखी राहण्याचा हक्क कोणालाच नाही.आणि कोणी तसे राहू देखील नये.कारण नियतीने हे आयुष्य विविध रंग जगण्यासाठी दिलेले आहे.
म्हणूनच , आपण मग का फक्त कोणत्या एका दुःखामुळे बाकीचे रंग मिटवून टाकायचे? दुःखाशी दोन हात करून सुख अनुभवता आले पाहिजे.प्रत्येक गोष्ट आपल्या मानासारखी होईलच असे नाही.म्हणून , प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. दुखाकडे देखील सकारात्मक रित्या पाहता आले पाहिजे.’दुःखे ही आपली परीक्षा पाहायला आलेली असतात’.मग आपण त्यांना कसे सामोरे जातो हे फार महत्वाचे असते.कधी एकटेच राहून दुःखावर मात करावी लागते तर कधी कुटुंबीय, आप्त स्वकीय आपल्या सोबत असतात.आणि सगळे मिळून त्या दुखाना सामोरे जायचे असते.
दुःखे आपली क्षमता पाहतात.आपला संयम पाहतात.आपण समस्या कशी सोडवतो? डगमगतो की पेटून उठतो? ह्या सर्व गोष्टी नियती पारखत असते. आणि जास्त दुःखे पण त्यांच्यात आयुष्यात असतात जे त्यावर यशस्वीरीत्या मात करू शकतात.म्हणून दुःखे आली तर कायम त्यालाच कवटाळणे बरोबर नाही.त्यातून योग्य तो मार्ग काढता आला पाहिजे.कधी स्वतःवर विश्वास ठेवून तर कधी प्रियजनांची, विश्वासू व्यक्तींची मदत घेऊन दुःखावर मार्ग काढता आला पाहिजे.कोणत्याही परिस्थितीत सारासार विवेक बुद्धी जागृत ठेवून दुःखांचा धीटपणे सामना करता आला पाहिजे.
ह्या जगात अशी अनेक माणसे होऊन गेली , जी स्वतः तर खूप दुःखात होती पण त्या परिस्थती देखील फक्त स्वतःच्या दुःखाला धरून न बसता, जे इतरजण दुःखात आहेत, त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचले.याचे अत्यंत समर्पक उदाहरण म्हणजे, स्वर्गीय आदरणीय ‘सिंधुताई सपकाळ’. आपल्याला अशा व्यक्तींसारखे जगायला नाही जमले तरी किमान स्वतःचे दुःख तरी विसरून , त्यावर योग्य तो मार्ग काढून आयुष्यात पुढे जायला शिकले पाहिजे.
कोणामुळे कोणाचे आयुष्य थांबत नाही.कोणी ते थांबवू देखील नये.अर्थात प्रत्येकाचा निर्णय वेगवेगळा असू शकतो.पण एक गोष्ट तर कायम आहे, ती म्हणजे ‘ जीवनचक्र जे आहे तसे कायम चालू ठेवले पाहिजे’.तर आणि तरच आयुष्य सार्थकी लागले असे म्हणता येईल.
काळजी करू नका.पण , काळजी घ्या , स्वतःची आणि आपल्या माणसांची.सर्व काही ठीकच आहे, चांगलेच आहे.फरक आहे तो फक्त दृष्टिकोनाचा……
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
