Skip to content

“थोड्या वेळासाठी येणारा राग खूप काही बिघडवून जातो.”

“थोड्या वेळासाठी येणारा राग खूप काही बिघडवून जातो.”


मधुश्री देशपांडे गानू


क्रोधो मुलमनर्थानां क्रोध: संसार बंधनम्

धर्मक्षयकर:  क्रोध तस्मात् क्रोधं विवर्जयेत् .

“क्रोध म्हणजेच राग हा सर्व आपत्तींचं मूळ आहे. क्रोध हेच कारण आहे या संसार रुपी मोहजालात अडकून राहण्याचं. क्रोध धर्माचा नाश करणारा आहे. म्हणून क्रोधाचा त्याग करा.”

मानवाला मन रुपी अफाट शक्ती प्रदान झाली आहे. अनेक भावभावनांचे तरंग या मनात उठत असतात. अनेक भावनांपैकी राग ही अशीच एक भावना. मानवाच्या षड्रिपू पैकी एक. एखाद्या निष्पाप लहान मुलाला राग आला तर आपण किती कौतुकाने त्याचा रुसवा काढतो. कारण हा राग अगदी छोट्याशा बालमनाला निर्मळ पणे आलेला असतो. पण हाच राग एखाद्या प्रौढ व्यक्तीला आला तर तो त्याचे आयुष्यभराचे नुकसान करू शकतो. राग हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे असे मानले जाते. राग येण्याची अनेक कारणे आहेत.

१) मनासारखे न घडणे.. आपल्या इच्छेप्रमाणे घटना घडल्या नाहीत किंवा आपली माणसे वागली नाहीत तर आपल्याला राग येतो. माझ्या मनासारखंच सर्व व्हावं हा अट्टाहास या रागाला कारणीभूत असतो.

२) प्रेमात अपयश…यानेही मनाची शांतता ढळते. चिडचिड, अस्वस्थता येते. सगळ्या जगाचा राग येऊ शकतो. ३) सामाजिक ताण.. कधीकधी सामाजिक नियम हे जाचक वाटू शकतात आणि राग येतो.

४) दुःख..जवळच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू किंवा अत्यंत आवडीची वस्तू हरवणे. हे माझ्याच बाबतीत का घडलं? म्हणून राग येतो.

४) खूप काम करून थकवा आल्याने ही राग येतो.

५) आजार… माणूस सतत आजारी पडत असेल किंवा शारीरिक दौर्बल्य असेल तर त्याची चिडचिड होते. ६) अपमानित वाटल्याने ही वाईट वाटून राग येतो.

७) आर्थिक विवंचना, ताण यानेही राग येतो.

८) एखाद्या व्यक्तीला त्याच्यातील दोष दाखवून दिला तरी त्याला पटकन राग येतो.

९) परिस्थिती न बदलण्याची असहाय्यता रागाला कारणीभूत ठरते.

राग येण्याची अनेक वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक कारणे असू शकतात. मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजांमध्ये आणि मूलभूत भावभावनांमध्ये अडथळे निर्माण झाले की माणूस मनात अस्वस्थ होतो. आणि त्याची चिडचिड होते. राग येतो. कधीकधी हा संताप अनावर होतो आणि त्याच्या हातून कोणतेही दुष्कृत्य घडू शकते.

आज देशात युवा पिढी सर्वात जास्त संख्येने आहे. पण हीच युवा पिढी अनेक बाबतीत दुबळी असल्याचे लक्षात येते. दरवर्षाला भारतात हजारो लोक आत्महत्या करत आहेत आणि यात प्रामुख्याने हा तरुण वर्ग आहे. मनाविरुद्ध झालेली कोणतीही घटना न पचवता आल्यामुळे, वास्तवाचे भान आणि स्वीकार न करता आल्यामुळे मनस्थिती बिघडते.

आणि परिस्थितीचा, माणसांचा, जगाचा राग येतो. हा जर वेळीच नियंत्रणात आणला नाही तर याचे रुपांतर प्रचंड नैराश्यात होते आणि आत्महत्येसारखे मार्ग अवलंबले जातात. कारण सारासार विचार करण्याची क्षमता रागामुळे गमावून बसलेले असतात.

काहीवेळा राग येण्यासाठी क्षणिक कारणही पुरते.  तर काहीवेळा अनेक मनाविरुद्ध नकारात्मक घटना घडून तशी मानसिक स्थिती तयार होते. मग रागाद्वारे याचा स्फोट होतो. बऱ्याचदा वड्याचे तेल वांग्यावर काढले जाते आणि आपणा हकनाक आपल्या प्रेमाच्या माणसांना दुखावतो.

आज आपण रोज अशाच बातम्या ऐकतो आणि पाहतोय की कानांवर विश्वास बसत नाही, अशा घटना घडत आहेत. मित्राने शिवी दिली म्हणून त्याचा खून केला. आईने अभ्यास कर सांगितलं म्हणून आईचा खून केला. मुलाने अभ्यास केला नाही म्हणून आईने मुलाचा खून केला. अशा अनेक भयंकर गुन्ह्यांच्या घटना अक्षरशः अंगावर काटा आणतात. असे कसे वागू शकतात? असा विचार येतो.

इतका राग अनावर होतो की आपण काय करतोय याचेही भान राहू नये? बदला घेण्याची भावना इतकी तीव्र असावी? मुलीने प्रेमाला नकार दिला तर तिच्यावर ऍसिड हल्ला करणारे महाभाग आपण पाहतोयं. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा, विचारांचा, स्वतंत्र मतांचा आपण काहीच विचार, आदर करू शकत नाही.

आज माणूस अत्यंत स्वार्थी, एकलकोंडा, कशाची किंमत नसलेला नात्यांची बूज नसणारा आणि क्रूर होत चालला आहे. माणसा माणसा मधला संवाद विरळ होत आहे. राग आला तर तो नियंत्रणात कसा ठेवायचा हे कळत नाहीये. कारण आम्हाला नाही ऐकायची सवय उरली नाहीये. आम्हाला सगळं हवयं. लगेच हवयं.  कोणाचंही ऐकून घेण्याची सवय उरली नाही.

अगदी आईवडिलांची सुद्धा. आमचे लगेच अपमान होतात आणि ते असह्य होतात. वय वर्ष 12 ते 19 हा काळ अतिशय नाजूक शारीरिक-मानसिक स्थित्यंतरांतून जाणारा, तारुण्याच्या उंबरठ्यावरचा असतो. हा काळ जपणं खूप गरजेचं असतं.  पण आज याच वयाची मुलं अनेक लैंगिक, अमली पदार्थ अशा गुन्ह्यांमध्ये सापडलेली आढळतात. कारण कोणाचंही न ऐकणे. आम्हाला लगेच राग येतो. क्षणिक आलेला राग आपलं आयुष्यभराचं नुकसान करतो.

एक तर आपण आपल्या जवळच्या माणसांना वाटेल ते बोलून कायमचं दुखावतो. मग अगदी जन्मापासून असलेली नातीही कायमची दुरावतात. अहंकारापोटी आम्ही माफी मागत नाही. माफी मागणे कमीपणाचं वाटत आम्हाला. लगेच स्वतःबद्दल हीन भावना जोपासते. रागाच्या पलीकडे जाऊन नैराश्याने घेरले तर अनेक शारीरिक, मानसिक आजार कायमस्वरूपी मागे लागतात. संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी होऊ शकते.

मला आठवतंय माझी आई नेहमी लहानपणी सांगायची.” रागावू नये. रागाने आपलंच रक्त जळतं.” हे तिचं नुसतं सांगणं नव्हतं तर खरंच रागामुळे जे हार्मोन्स तयार होतात ते शारीरिक नुकसान करतात.. राग जर आला तरी तो नियंत्रणात आणता आला पाहिजे. पटकन कोणालाही उलटून बोलण्याआधी दोन क्षण विचार करावा. नंतर पश्चाताप करून काय फायदा? आता मला राग आला आहे ती गोष्ट खरंच एवढी महत्त्वाची आहे का? मुळात राग कशामुळे आला हे कळलं तर त्याचं निराकरण करता येतं.

प्रत्येक गोष्टीचा मार्ग , उपाय हा असतोच. शांतपणे आकडे मोजणं हा तर आपल्या आईवडिलांनी आजी-आजोबांनी सांगितलेला सोप्पा उपाय. अगदी खूप राग आला असेल तर तो प्रसंग लिहून काढावा. त्याने होणारं नुकसान खरच आहे का हे तपासावं. रागाचं नियोजन करणं हे सातत्याने, सरावाने शक्य आहेच.

ज्याला स्वतः मध्ये सकारात्मक बदल करायचा असेल तो हे रागाचं नियोजन करण्याचं तंत्र अवलंबवेल आणि स्वतःचे कोणतेही वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक नुकसान होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीचा स्वीकार केल्याने आपण त्यातून लवकर बाहेर पडतो आणि नवीन मार्गही मिळतो.

राग न येऊ देता समोरचा आपल्या भल्यासाठी सांगतोय एवढा सारासार विचार करण्याची सवय लावावी. आपण सामान्य माणसे आहोत. मनाविरुद्ध गोष्टी घडणारच आणि राग येणारच. पण हा आवेग सांभाळायला आपण शिकले पाहिजे. आत्मपरीक्षण, आत्मचिंतन अत्यंत गरजेचे आहे. मी नेहमी सांगते त्याप्रमाणे लिहिण्याचा सराव सर्वात सुंदर मार्ग आहे मनातील भावभावनांचे हिंदोळे नियंत्रित करण्याचा. ध्यानधारणा तर सर्वोत्तम उपाय आहे.

हे अनुभवाअंती सांगते आहे. योग्य व्यायाम, योग्य आहार, योग्य वर्तन, नियमित संगीत ऐकणे यांनीही आपल्या मनस्थितीत सकारात्मक परिणाम घडून येतात. कोणत्याही परिस्थितीत पराकोटीचे वर्तन न करता संयमित वर्तनाने आपण आपले जीवन सुखमय बनवू शकतो नक्की प्रयत्न करा आणि सुखी व्हा….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!