Skip to content

थोडं सहन करा…कारण आपल्याही कमतरता समोरचा सहन करत असतो.

थोडं सहन करा…कारण आपल्याही कमतरता समोरचा सहन करत असतो.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


ती अबोल पानं वाऱ्याकडे कधीच तक्रार करत नाही.वारा सुटला की पानं गळायला लागतात. त्यांची फांदीवर रहायची इच्छा असूनही ती पानं राहू शकत नाही. वारा आला की त्या पानांना आपली जागा सोडावीच लागते.आणि ती पानं जागा सोडतातही.तेही त्या वाऱ्याकडे कोणतीही एक तक्रार न करता…! कारण पानाला स्वतःच्या उणीवांची जाणीव आहे. म्हणून तीही वाऱ्याची तक्रार न करता त्याला सहन करतात.

आपल्या आयुष्याचही अगदी असच आहे. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही काही जाणीवांनी पूर्णपणे समृद्ध झालेली नाही. कोणत्या ना कोणत्या उणीवा त्यांच्यातही आहेत.फरक इतकाच की माणसं स्वतःच्या कमतरता , उणीवा मान्य करायला लवकर तयार होत नाही. त्याला स्वतःच्या कमतरता लवकर मान्यच होत नाही. नेहमी इतरांकडून तो चांगल्याची अपेक्षा करतो.

पण स्वतःकडूनही कोणीतरी अपेक्षा करत असेन हे मात्र तो विसरून जातो.पहा , काही लोकं खूप सहनशील असतात , समजूतदार असतात तर काही लोकं अगदी याउलट असतात.त्यांना थोडही सहन करायला आवडत नाही. एखादी गोष्ट सहन करायची म्हणजे त्यांना ‘महादिव्य’ वाटतं. मी का सहन करू ? हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे.

परंतु आपल्यालाही कोणीतरी सहन करून घेत असतो हे सुद्धा लक्षात घेणं तितकच आवश्यक आहे.त्यामुळे आपण स्वतःही थोडं सहन करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक जण हा माणूसच आहे. प्रत्येकाला इथे भावना आहे. प्रत्येक जण इथे कोणती ना कोणती गोष्ट सहन करत असतो.कुठेतरी मनात काही गोष्टी सलत असतात.

आणि त्यांना सहन करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो.कारण व्यक्त होणं हा पर्याय उपलब्ध असला तरी आपण त्याचा सहजासहजी स्वीकार करत नाही. आपण एकतर गोष्टी सहन करतो नाहीतर समजून घेतो.

अशी कितीतरी उदाहरणं आपल्या रोजच्या जगण्यात आपण पाहतो. कुणी अजिबात सहन करायला मागत नाही. ‘मी सहन करणार नाही म्हणजे नाही’ हा त्यांचा हट्ट लहान मुलांच्या वरचा असतो.आपली कोणतीतरी गोष्ट समोरच्याला खटकली असेल असा विचार आपण का नाही करत…? सरळ सरळ मी सहन करणार नाही म्हणून मोकळं होतो आपण.थोडा वेळ तर आपण इतरांना त्यांच्या कलाने समजून घ्यायला देऊच शकतो नं…?

असं एक उदाहरण… जे आपल्या अगदी जवळच आहे.आपण बिंधास्त म्हणतो ‘ ती मला नेहमी सहन करते’ , किती सहन करते मला….पहा हे आपले मित्रमैत्रिणी आपल्याला खूप सहन करतात. अगदी सगळ्याच गोष्टींमध्ये ते सहन करतात , समजून घेतात.पण मग आपण पण कधी त्यांना समजून घेतो का…? त्यांना आपल्यामुळे सहन करावं लागतं हा विचार आपल्या मनात येतो का…? तेही आपल्याला इतकं सहन करतात.मग कधीतरी आपण थोडं सहन केलं तर काय बिघडतं….?

अगदीच सातत्याने सहन करा असं मुळीच नाही. पण जेव्हा गरज पडेन , योग्य वेळी सहन करायला शिका.समोरच्यानेच सहन करायला हवं हा अट्टाहास सोडून द्या. आपल्याकडूनही चुका होतात , माणसं दुःखावली जातात हे मोकळेपणाने मान्य करा.आपल्यातही काही कमतरता असतात ज्या ईतर लोकं सहन करतात. म्हणून थोडं आपणही सहन करूयात.थोडसच अगदी थोडसच…!

ते नखभर म्हणतात नं अगदी तेवढंस जरी सहन केलं तरी खूप आहे. थोडं सहन करायची सुद्धा आपल्याला सवय हवी. नाहीतर एकदम अशी अचानक कधी सहन करायची वेळ आली तर त्रास नको नं…? मला सवय नाही हे सगळं सहन करायची असं म्हणताना एकदा तरी समोरच्या मनाचा विचार करा.खरच त्यांना पण सवय आहे की नाही… हे एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करा.

पहा , पडद्यामागे नक्की कोणत्या भावना असतात नी कोणत्या नाही. कोण किती सहन करत, कोण किती समजून घेतं…कारण सगळच आपल्याला वाटतं तितकं नेहमीच सोपं नसतं.एक साधं सांगायच झालं तर…. एखादा ड्रेस शिवताना त्या कापडाला आधी कात्रीचे , सुईचे घाव सहन करावे लागतातच.

कारण ते सहन नाही केलं तर ड्रेस शिवणं कठीण आहे. आणि एकटं कापड असं काही करू शकत नाही.आणि अशावेळी कात्री-सुईकडे घाव घालण्याशिवाय पर्याय नसतो.आयुष्य अगदी असच आहे. फक्त आपल्या भावना जिवंत , बोलक्या आहेत. आणि त्यांच्या अबोल…!

म्हणून थोडं आपणही सहन करूया……… सोपं नसतं पण अशक्यही नसतं…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!