“थकलो म्हणून काय झालं…. थांबलो नाही, हे महत्त्वाचं!”
मधुश्री देशपांडे गानू
साथी ना कारवां हैं,
ये तेरा इम्तिहान हैं…
यूं हीं चला चल, दिल के सहारे..
करती है मंजिल तुझको इशारे..
ओ राही… ओ राही….
रुक जाना नहीं, तू कहीं हार के
कांटों पे चलके मिलेंगे साये बहार के…
“इम्तीहान” या हिंदी चित्रपटातलं गीत. आपल्या आजच्या विषयाला अगदी तंतोतंत लागू पडतं ना! जीवन हा एक आश्चर्यकारक, वळणावळणांचा, चढ-उतारांचा, निरंतर प्रवास आहे. कधी कोणतं वळण समोर येईल सांगता येत नाही. आपण खूप ठरवतो, स्वप्नं बघतो, स्वतःच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगण्याची उमेद असते आपली. पण आपल्या मनाप्रमाणे सर्व घडतंच असं नाही. जीवन जगताना कधी खूप कठीण परीक्षा द्याव्या लागतात, त्यात उत्तीर्ण झालात तरच पुढे जाता येतं.
प्रत्येकाची स्वतःची अशी स्वप्नं, महत्त्वाकांक्षा असतात. त्या पूर्ण होण्यासाठी लागणारे कष्ट, मेहनत, प्रयत्न प्रत्येक जण चोख करत असतो. पण या प्रक्रियेत कधीतरी अकस्मात कठीण प्रसंग उभे राहतात. आपण शारीरिक, मानसिक दृष्ट्या ही खचून, थकून जातो. स्वतःच्या मनाची, शरीराची गरज ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. अशावेळी शरीराला, मनाला विश्रांतीची नितांत आवश्यकता असते. हे ओळखून थोडा वेळ थांबणं गरजेचं असतं. आयुष्याचा प्रवास इथेच संपत नाही. तर शरीराला, मनाला पुन्हा ताजंतवानं करण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. पुन्हा नव्या ऊर्जेने आयुष्याला, कामाला सुरुवात करता येते.
स्पर्धात्मक युगात आणि भौतिक सुखांच्या गर्दीमध्ये आपण स्वतःला झोकून दिले आहे. समाजात, जगात टिकून राहायचं असेल तर पैसा, प्रतिष्ठा, मानमरातब हे हवंच.पण त्यासाठी आपण किती ऊर फुटेस्तोवर धावायचं हे सुद्धा कळायला हवं. कुठे थांबायचं हेच कळेनासं झालंय.
याचा थेट परिणाम नातेसंबंधांवर होताना दिसतोयं. म्हणजे घरासाठी, कुटुंबासाठी अपार कष्ट करून अमाप पैसा मिळवायचा, त्याच कुटुंबासाठी तो पैसा आणि वेळ खर्च मात्र करता येत नाही. भौतिक सुखांचा कडेलोट झाला आहे. शारीरिक थकव्यापेक्षाही मानसिक थकवा, ताण, चिंता आज प्रचंड वाढले आहेत. सामाजिक आर्थिक कौटुंबिक स्तरावर सतत यशस्वी होण्याचा एक ताण प्रत्येकावर आहे.
अगदी छोट्याशा बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तींना हा ताण प्रकर्षाने जाणवतोयं. प्रत्येक स्तरावर प्रचंड स्पर्धा, पहिलं येण्यासाठी चढाओढ, सतत कोणाच्या तरी पुढे असण्याची दुर्दम्य इच्छा आणि प्रत्येकालाच ऑल राऊंडर असायलाच हवं हा गैरसमज… या सगळ्यांमध्ये मनाच्या स्वास्थ्याबद्दल कुठेच जागरूकता दिसत नाही. आज पालक-मुलं, नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी, मित्र-मैत्रिणी अनेक नाती एका अदृश्य स्पर्धेत उतरल्यासारखे वावरत आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे मनावर असह्य ताण, नैराश्य येत आहे. अनेकांची मानसिक स्थिती अगदी क्षुल्लक कारणांनी बिघडत आहे. छोट्या छोट्या प्रसंगांना सामोरे जातानाही कोलमडून जायला होतं.
प्रेमभंग, नोकरी व्यवसायातील स्पर्धा, कौटुंबिक वाद विवाद, आर्थिक ताण, नात्यांमध्ये वितुष्टता, मित्र मैत्रिणीं मधील स्पर्धा, असूया एक ना अनेक गोष्टी खूप खोलवर परिणाम करत आहेत. प्रचंड ताण, नैराश्य, चिंता, निद्रानाश अनेक शारीरिक, मानसिक आजार यांनी अनेकांना ग्रासले आहे. हे समजून घेण्याची, थोडं थांबून विचार करण्याची, मनाला विश्रांती देण्याची, दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे हे समजतच नाहीये..
मान्य आहे या सगळ्यातून जाताना मन दुःखीकष्टी होतं. विश्वासघात, प्रेमात फसवणूक, आर्थिक फसवणूक, नात्यांमध्ये अपेक्षाभंग हे सगळं दु:खदच आहे. अशावेळी माणूस फक्त थकतो, हतबल होतो. त्याला मार्ग दिसत नाही. विचार प्रक्रिया काम करत नाही. हे सगळं सोडून द्यावं असं वाटणं सहाजिक आहे. जीवन इथेच संपावं असंही वाटू शकतं. सहज आत्महत्येचे विचार, आत्महत्येचा प्रयत्न आणि आत्महत्या होताना आपण पाहत आहोत.
अत्यंत नकारात्मक विचारांनी माणूस भारून जातो. आता आपलं काहीच होऊ शकत नाही, माझं कोणीच नाही असा विचार तो करतो. त्याला एकाकी वाटू शकतं. त्याची ऊर्जा या विचारांमुळे क्षीण होते. आणि तो सगळे प्रयत्न, मार्ग सोडून देतो. ती वेळ हरवून बसतो. त्याचं आयुष्य त्या दुःखद प्रसंगापाशी, मनाच्या हतबलतेपाशी थांबून राहतं. अशाच दुःखाच्या, नैराश्याच्या क्षणी थोडं थांबून, शांतपणे विचार करण्याची गरज आहे. ही एक तात्पुरती वेळ आहे आणि नक्की निघून जाणार असा विश्वास स्वतःला द्यायलाच हवा. वाईट दिवस आले तसे चांगले दिवस ही येणारच. तुम्हीं आयुष्याच्या प्रवासात थकून जाल तेव्हा थोडं थांबा, थोडी विश्रांती घ्या आणि पुन्हा नव्या उमेदीने पुढे जा. तिथेच कायमचे थांबून राहू नका.
जीवन प्रवाही आहे हे तर अनेक वेळा लिहिले आहे. पुढे जाण्यातच, अकस्मात येणाऱ्या वाईट प्रसंगांवर मात करण्यातच खरं कौशल्य, सामर्थ्य आहे. त्यातच तुमचा विजय आहे. तुमचं माणूसपण आहे. अगदी प्रेमाच्या व्यक्तीच्या मृत्यूने झालेला वियोगही पचवून आपण पुन्हा उभे राहतोच ना! कोणी बरोबर असो वा नसो आपल्या आयुष्याची जबाबदारी, आपलं आयुष्य सुंदर करणं हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे.
आयुष्याच्या या प्रवासात थकून जाण्याचे गलितगात्र होण्याचे अनेक प्रसंग येतील.. त्याला शांतपणे समर्थपणे तोंड देऊन त्यातूनही सकारात्मक विचारांनी, कृतीने मार्ग काढून पुढे जाण्यातच खरं शहाणपण आहे. थोडं थांबून शांतपणे विचार केला, थोडा दृष्टिकोन बदलला तर आपलं मन निर्णयक्षम होतं आणि आपण चांगला निर्णय घेऊ शकतो.
थकलात तरी विश्रांती घ्या. कायम तिथेच अडकून राहू नका. थांबून राहू नका. खळखळ वाहणारी नदी व्हायचं आणि आसपासचा परिसर सुपीक करायचा कि डबक्यातल्या पाण्याप्रमाणे गढूळ राहायचं हे प्रत्येकाने ठरवायचं. सुज्ञपणे निर्णय घ्या आणि पुन्हा नव्या ऊर्जेने या सुंदर आयुष्याला सामोरे जा. यशस्वी भव!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


