त्रास अशांना सुद्धा होत असतो पण ते कधीच तक्रारी करत नाहीत.
अपर्णा कुलकर्णी
निर्मला स्वभावाने अतिशय निर्मळ स्वभावाची. कॉलेजमध्ये असल्यापासूनच लग्नाची म्हणजेच सुखी संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या निर्मलाला असे दिवस बघावे लागतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण अनुभव तसेच येत होते आणि त्यातून शहाणपण ही येतच होते. नियतीने काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात ज्या कोणालाही माहित नसतात पण जे आहे ते सहन करणे तेवढे क्रमप्राप्त असते असेच निर्मलाकडे बघून सगळ्यांना वाटत होते.
निर्मला अतिशय चुणचुणीत आणि हुशार मुलगी. कॉलेजमध्ये डिस्टिंक्शन मिळवून पास झालेली. अंगात करिअरची,जॉब करण्याची जिद्द त्यामुळे शिक्षण झाल्याबरोबर पंधराच दिवसात तिला नोकरी मिळाली. तिने तिच्या हुषारीच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यात बळकट स्थानही निर्माण केले होते. लवकरच ती प्रेमात पडली आणि सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली.
पण आता तिची स्वप्ने फक्त मुलं आणि नवरा इतकीच मर्यादित नव्हती तर त्यात तिच्या करिअरला ही प्राधान्य होतेच. तिची स्वप्ने, स्वभाव समजून घेणारा कोणीतरी तिला भेटला असेच तिला वाटले निरंजनकडे पाहून पण घरात सगळ्या गोष्टी समजल्या तसे निरंजन हात झटकून रिकामा झाला आणि नाईलाजाने निर्मलाच्या मनात नसताना तिला लग्न करावे लागले. खरतर निरंजन नको म्हणाल्यावर जगण्याचीच इच्छा मरून गेलेली निर्मला स्वतःला समजावत कशीबशी सावरत होती स्वतःला. बऱ्याच प्रयत्नाने तिला ते जमलेही आणि विकाससोबतचा संसार तिने मनापासून स्वीकारला.
लगेच निर्मलाला मुलगा झाला आणि त्यातच तिने तिचे विश्व पाहायला सुरुवात केली. सुरुवातीला जरा बरा वागणारा विकास नंतर नंतर निर्मलावर उगाच संशय घेऊ लागला, कोणाशी बोलली, का बोलली यावर प्रश्न करू लागला. मोबाईल चेक करु लागला आणि घरात कोणताच व्यवहार सांगेना. सगळे व्यवहार लपवून ठेवून त्याने घराचा व्यवहार केला. थोड्याच दिवसात दारात लोक पैसे मागण्यासाठी येऊ लागले. निर्मला विचारू लागली पण विकास काहीच बोलत नव्हता. एकदा बँकेचे लोक पैसे मागण्यासाठी घरी आले आणि तेंव्हा निर्मलाला समजले की माझी बायको मेली आहे असे कर्ज न फेडायचे कारण विकासने पुढे केले आहे. तेंव्हा मात्र निर्मलाची सहनशक्ती संपली आणि तिने घर सोडले. तिच्या माहेरी पण परिस्थिती फार काही चांगली नव्हती. समाज, नातेवाईक, घरातील लोक कोणीच जगू देईना. सगळ्या लोकांच्या नजरा तिच्याकडेच होत्या.
पण शांत राहण्यापलीकडे तिच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. मुलगा लहान होता, त्याची सगळीच जबाबदारी तिच्यावर होती आणि शून्यातून विश्व निर्माण करणे भाग होते. मुलासाठी जगणे भाग होते. म्हणून ती लढत होती आणि राहिली. हळू हळू मुलाला तिने स्व कर्तुत्वावर वाढवले आणि मोठे केले. सगळ्यांच्या नजरा झेलून आयुष्यभर संघर्ष केला. या सगळ्या गोष्टींचा तिला ही त्रास होतच होता पण बोलायला जागाच नव्हती. पण ज्या व्यक्तींना बोलायला जागा उरत नाही अशा लोकांना त्रास होत नाही असे नाही पण त्रास अशांना सुद्धा होत असतो पण ते कधीच तक्रारी करत नाहीत.
जगात अशी कित्येक लोकं असतात ज्यांना भयंकर त्रास असतो, समोर कित्येक कठीण प्रसंग असतात. पण त्यांना समजून घेणारे, बोलून दाखवता येईल असे कोणीच नसते. एकटेच त्रास सहन करत असतात आणि पुढे ढकलत असतात. पण अशा लोकांना त्रास होत नाही असे मात्र अजिबात नसते, उलट ते एकटेच सगळं काही सहन करत राहतात.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
