त्रास सहन केल्याशिवाय आयुष्याचा खरा आनंद घेता येत नाही.
सोनाली जे
अरे संसार संसार या बहिणाबाईंच्या कवितेत त्यांनी किती सूचक वर्णन केले आहे..
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।
गरम तव्यावर भाकरी टाकताना आधी हाताला चटके बसतात आणि नंतर गरम गरम भाकरीचा आस्वाद घेता येतो . तसेच संसाराचे ही आहे..आधी त्रास सहन करावा लागतो मग त्यातून खऱ्या आनंदाची , सुखाची प्राप्ती होते .
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नवीन घडलं
घरकुला संग समदं येगळं होईल
दिस जातील, दिस येतील,
भोग सरंंल , सुख येईल.
संसाराचे ही असेच आहे , फाटक्या जीवनाला आशेची ठिगळं जोडणाऱ्या एका जोडप्याची कहाणी. संसार सुरू झाल्यावर माणसाचं आयुष्य बदलून जातं. संसारात आधी त्रास आहेत,नवीन लग्न झाल्यावर येणाऱ्या अडचणी आहेत मग आर्थिक भार असेल ..किंवा स्वभाव जुळवून घेताना होणारी भांडणे त्यातून परत सगळे विसरून आनंदाने एकत्र येणे असेल , तर कधी अडचणी आहेत, त्यावर मात करून परत संसाराची ठिगळे जोडत जायचे.
कधी सुख तर कधी दुःख आहेत , त्यातच नव्या पाहुण्याची चाहूल..मग ती जबाबदारी.. त्या येणाऱ्या बाळाला ..म्हणजे परिस्थिती ला, ते ओझे कसे सोसेल याची बापाला काळजी , चिंता आहे तर आईला मात्र त्याच्याबद्दल खात्री आहे. दिस जातील, दिस येतील, म्हणजे दुःखाचे , त्रासाचे दिवस जातील , आर्थिक टंचाई असेल हळू हळू सगळ्यातून बाहेर पडू , त्रास कमी होतील..कष्ट करण्याची जिद्द असली की ते कष्टाचे , त्रासाचे दिवस निघून जातील आणि आनंदाचे दिस / दिवस येतील .भोग सरंंल , सुख येईल. सगळे भोग सरतील..कष्ट संपतील , सगळे त्रास संपतील आणि सुख येईल.
खरेच तर आहे ना , की त्रास सहन केल्याशिवाय आयुष्याचा खरा आनंद घेता येत नाही. बाळ पोटात असताना ते पूर्ण ९ महिने ९ दिवस आई त्याची काळजी घेतच असतें.आपल्या जीवा पेक्षा जास्त जपत असते. बाळंतपणाच्या प्रचंड कळा म्हणजे खरे तर स्त्री चा पुनर्जन्म म्हणले तरी चालेल. या कळा सहन करूनही काही वेळेस होणारे सिझेरीन , नॉर्मल झाले तरी टाके ..कधी कळा सहन होत नसतील तेव्हा epiduril इंजेक्शन पाठीतून देवून आयुष्यभराचा त्रास सहन करणारी ही आई एवढ्या त्रासानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला , बाळाला बघितले की सगळे त्रास विसरून जाते आणि आनंदाने , प्रेमाने आपल्या बाळाकडे बघते…हा आनंद एवढा जास्त असतो की त्रास कुठच्या कुठे विसरून जाते ती .
समर्थ रामदासांनी ही लिहून ठेवले आहेच ..
कष्टेविण फळ नाही l कष्टेविण राज्य नाही l
कष्टेविण होत नाही l साध्य जनी ll
म्हणजे तुम्ही कष्ट करा, आधी त्रास सहन करावाच लागतो ..त्यानंतर आनंद मिळतो..
घरची अतिशय गरिबी, कष्ट करून पैसे मिळवून हातावरचे पोट भागविणारी मुले , खूप कठीण परीक्षा देतात त्याकरिता जिद्दीने तयारी करतात, सगळे त्रास सहन करून पास होणे तेही चांगले मार्क्स मिळवून हे ध्येय ठेवतात , आणि पेपर देण्याकरिता खूप मेहनत घेतात , दिवस रात्र अभ्यास करतात, प्रयत्न करतात, यश मिळण्याकरिता जे त्रास सहन करावे लागतील त्याची तयारी असते आणि मग एवढ्या कष्टातून , त्रासातून जेव्हा चांगल्या मार्कानीं पास होतात तेव्हा तो खरा आनंदी आनंदच असतो.
आपण जेव्हा खूप त्रास सहन करून एखादी गोष्ट मिळवीत असतो तेव्हा त्याची आपल्याला जाण किंवा किंमत ही खूप असते..आणि मी ते achieve करण्याकरिता पडतील ते कष्ट , त्रास सहन केले याचे एक आत्मिक समाधान असते..शिवाय हे त्रास आपल्याला कायमच पुढचा आनंद मिळविण्याकरिता motivate करीत असतात..
जसे रोज चालत जाणारी व्यक्ती वेळेत पोहचू शकत नाही तेव्हा ऑफिस मधून ऐकून घ्यावी लागणारी बोलणी आपल्याला अजून कष्ट करून, त्रास सोसून सायकल तरी घ्यावी याकरिता प्रेरित करते..आणि हळूहळू सायकल आली की थोडे त्रास , कष्ट कमी व्हावे म्हणून दुचाकी घेतो पावसा पाण्याचे किंवा सर्वांनी एकत्र जाताना होणारे त्रास कमी करण्यासाठी मग अजून थोडे कष्ट करतो , त्रास सहन करतो आणि अर्थातच पेट्रोल आणि इतर मेंटेनन्स भागविता येतील एवढे पैसे जमा करतो की चारचाकी ही होते आणि पावसापण्यात , उन्हात सहज जाता येईल , सर्व कुटुंब एकत्र जावू शकेल याचा आनंद निर्माण होतो..
म्हणजे छोट्या गोष्टींमधून जसे त्रासामधून प्रेरणा घेवून च खऱ्या आनंदाची प्राप्ती होते..एखादी गोष्ट सहज मिळाली की त्याची आपल्याला तेवढी किमंत राहत नाही .जाणीव नसते..पण त्याकरिता खस्ता काढतो तेव्हा ती मिळविली की खूप आनंद होतो, त्या गोष्टींची आपण खूप किंमत ठेवतो.कदर करतो.
त्रासात ही चांगले बघून चांगलेच होणार , पुढे सुख आणि आनंद मिळणार असाच सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे..त्रासाकडे त्रास म्हणून बघू नका ती आपल्याला काही तरी चांगले साध्य करण्याकरिता मिळालेली संधी म्हणूनच बघा..पुढचं काय कोणाला ही माहिती नसते.. येणारा प्रत्येक क्षण आपल्याला जगण्याची ,शिकण्याची , अनुभव घेण्याची संधी देत असतो..आयुष्य एकदाच मिळते..पुढचा जन्म वगैरे माहिती नाही पण आहे तो क्षण भरभरून जगा.त्रासाचे फळ आनंद , सुख मिळणार हे लक्षात घ्या..
आयुष्य सुंदर आहे ..सकारात्मक रहा..आनंदाने जगा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


