Skip to content

त्यांची नेहमी आठवण काढा ज्यांनी तुमच्यासाठी तडजोड केलीये !!

त्यांची नेहमी आठवण काढा ज्यांनी तुमच्यासाठी तडजोड केलीये !!


श्री. राकेश वरपे I ९१७५४२९००६

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


आयुष्य मार्गक्रमण करत असताना इच्छित गोष्ट मिळविण्यासाठी किंवा ती साध्य करण्यासाठी आपल्यासमोर अनेक अडथळे येऊन ठेपतात. ते सर्व अडथळे आपण बाजूला सारून पुढे जात असतो. कारण इथे आपल्याला चांगली जाणीव झालेली असते कि शेवटी पुढे जाणंच महत्वाचं आहे.

अशा पद्धतीने पुढे सरकताना अनेक अदृश्य मदतीचे हात आपल्याला नकळतपणे लाभलेले असतात. सामाजिक जीवनात एखादी गोष्ट मिळविण्यासाठी किंवा समाधानी आयुष्यासाठी आपण एकटेपणाने काहीच करू शकत नाही. आपल्याला मदतीच्या हातांची गरज लागतेच शिवाय आपल्यासाठी अनेकांनी अनेक प्रकारच्या तडजोडी सुद्धा केलेल्या असतात.

अशा तडजोडी ज्याची कदाचित आपल्याला माहिती सुद्धा नसेल. यामध्ये आपले पालनकर्ते तर आहेतच. शिवाय घराबाहेर पडल्यानंतर कित्येकांनी १० सेकंद का होईना आपल्यासाठी तडजोड केलेली असते.

तुम्ही जेव्हा तुमची टू-व्हीलर घेऊन बाहेर पडता पलीकडच्या रस्त्यावर जाण्यासाठी समोरच्याने तुमच्यासाठी मारलेला ब्रेक, रांगेत उभे असताना तुम्हाला घाई म्हणून पुढच्याने त्याची दिलेली जागा, प्रवास करताना तुम्ही पुष्कळ वेळ उभे असता त्यावेळी त्या अनोळखी मित्राने त्याची दिलेली जागा, सुट्टे पैसे नाहीत म्हणून दुकानदाराने ‘नंतर दे चालेल’ काढलेले उद्गार या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत असतो.

या सगळ्या माणसांनी कुठेनाकुठे त्यांचा वेळ हा आपल्याला दिलेला असतो आणि सध्या कोण कोणासाठी वेळ काढतंय हे तुम्हाला चांगलंच माहितीये. या धडपडीचा आयुष्यात कोणी कोणाकडे येत-जात नाही असं म्हणण्यापेक्षा मिळेल तेव्हा माणसं वेळ काढत असतात असं बोलूया. म्हणून एकंदरीत या सगळ्या लोकांनी आपल्यासाठी केलेली हि एक तडजोडच असते.

त्यांच्यामुळे आपण एका निश्चित ठिकाणी काही सेकंद लवकर पोहोचलेलो असतो. एखाद्यामुळे आपले काम झालेले असते. कोणीतरी आपल्याला एक मोठी आयुष्याची शिकावण देऊन गेलेला असतो. अशा सगळ्यांची आठवण एकदातरी आपल्याला काढायला हवी.

आपण मनापासून आठवण काढू याचा अर्थ आपण पुन्हा तशाच लोकांना आपल्या जीवनामध्ये आकर्षित करतोय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला भेटणे शक्य असेल तर नक्की जाऊन भेटा आणि भेटता येत नसेल तर त्यांनी तुमच्यासाठी केलेली तडजोड आठवा आणि त्यांना मनापासून धन्यवाद म्हणा.

तुम्ही त्यांचे मानलेले आभार हे त्यांच्यापर्यंत पोहोचो अथवा न पोहोचो परंतु तुमच्या अशा पद्धतीने झालेल्या व्यक्तिमत्व विकासामुळे अशाच प्रकारची माणसं तुम्हाला कायम कुठेना कुठे भेटतच राहतील…

आणि हो, अशा व्यक्तींची आपल्या अवतीभवती काहीच कमी नाही. तुम्ही सुद्धा कधीतरी कोणासाठी तडजोड केलीच असेल. कदाचित तुमचीही कोणीतरी डोळे बंद करून आठवण काढत असेल.

अशा सकारात्मक विचारांनी प्रत्येक दिवसाची सुरुवात करायला हवी.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!