ते सुख माझ्या वाट्याला का नाही, म्हणून असमाधानी राहू नका.
टीम आपलं मानसशास्त्र
‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनिपाहे’ रामदासांच्या या पंक्ती आठवल्या की, खरेच जीवनाकडे नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो. एका वाईट स्वप्नातून पुन्हा एकदा सत्यात जगण्याचा प्रवास सुरू होतो. पुन्हा एकदा नव्याने जगण्याची उमेद निर्माण होते.
कधी कधी असे होते की, आपण आपल्या दुःखामध्ये गुरफटून जातो. आपल्या स्पर्धा , आपल्या तुलना , आपल्या विवंचना, आपल्या अडचणी, आपल्या व्याधी, आपल्या अपेक्षा , आणि वास्तवाचा स्वीकार करत नाही , जे आपल्याकडे नाही समोरच्याकडे आहे म्हणजे ते सुख आपल्याकडे नाही समोरच्याकडे आहे. अशी तुलना तर होतेच. पण परत इथे cognitive capacity चे , magnification आणि minimisation , distorted thoughts चे विषय येतात. आपल्या कडे जे नाही तेच बघितले जाते. त्याचेच विचार केले जातात. आणि जे आहे त्याची कदर नसते. किंमत नसते. हसायचे, आनंदाने जीवन जगायचे आपण विसरून जातो.
बरेचदा दुःख कशाचे असते ? तर एखादी गोष्ट माझ्याकडे नाही यापेक्षा ती गोष्ट समोरच्या कडे , इतरांकडे आहे याचे दुःख जास्त असते. मग हा द्वेष झाला का ? पण हे सुधा आहे की आपण टाटा, बिर्ला , अंबानी यांच्या कडे सगळे आहे आपल्याकडे नाही म्हणून दुःख करत नाही. तर आपण दुःख कधी करतो ? जेव्हा आपल्याच ओळखीच्या , नात्यातल्या , जवळच्या व्यक्तीकडे ती गोष्ट असते. आणि आपल्याकडे नसते तेव्हाच. पण म्हणजे आपलेच , जवळचे लोक आपल्याला आदर्श वाटतात.
शाळेत असल्यापासून आई वडील कळत नकळत आपल्याला जर असे सांगत असतील, असे शिकवत असतील की , तो / ती बघ किती अभ्यास करते, किती हुशार आहे . त्यांना एव्हढे मार्क्स पडले तुझे बघ. ही जी तुलना येते , त्याला कारणीभूत आपण पालक च असतो.
पूर्वी पालक ही तुलना खूप कमी वेळा करत. पण आजकाल स्पर्धेच्या युगात .. आणि खूप सुपरफास्ट जगात , आपले मूल मागे पडू नये म्हणून रेस मधल्या घोड्या सारखे झापड लावून शिकविले जाते.
पूर्वी पालक हुशार होते. विचारी होते. त्यांची शिकवण एवढीच असायची की संगत चांगली पाहिजे. म्हणजे काय तर त्यांच्याकडून जे चांगले आहे ते शिकता येते. म्हणजे जे आपल्याकडे नाही किंवा कमी आहे ते आपल्या जवलच्यांकडून शिकून घेता येईल ..त्यात स्पर्धा , चुरस नसायची. तर मुलांची प्रगती महत्वाची होणे महत्वाचे असे.
काळानुरूप सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. स्पर्धेत जिंकल्यावर समोरच्याचे कौतुक , अभिनंदन करणे बाजूला , आपण मागे पडलो , तो कसा काय शर्यत जिंकला हा द्वेष निर्माण झाला . चुरस असावी . पण आपला विजय जसा दुसरे celebrate करू शकतील तसे त्यांचा ही आपण celebrate करण्याची क्षमता हवी , मानसिकता हवी.
अनेकदा आपल्याला सगळे आनंद , सुख मिळत असते तरी ही कुठे तरी मनात रुखरुख असते की माझ्याकडे वस्तुरुपी गोष्टी नाहीत. जे आहे ते पैसे , दागिने , कपडे, घर , गाडी यात समाधान नसते. अजून पाहिजे याकडे लक्ष असते. आपली छोटी गाडी तर कोणाची मोठी बघितली की तशी पाहिजे असे वाटते.
पण आपण हा कधीच विचार करत नाही की आपल्याकडे जे आहे ते इतरांकडे नसते. आपल्याकडच्या अनेक गोष्टी त्यांनी कधी पहिल्या ही नसतात. आपल्याकडे नाक , कान , डोके , डोळे , हात पाय सगळे धड असते पण इतरांकडे काही वेळेस कशाची तरी उणीव असते. कोणाला हात नसतील तर तो / ती आयुष्य कसे काढत असेल याची जाणीव ही नसते आपल्याला ..डोळसपणे बघा . आपल्याकडे खूप काही आहे. बोटात घालण्याची अंगठी नसेल पण आपली सगळी बोट तर शाबूत आहेत. जे नाही पेक्षा जे आहे ते चांगले बघायचा दृष्टिकोन शिकणे गरजेचं आहे.
ते सुख माझ्या वाट्याला का नाही, म्हणून असमाधानी राहू नका. बदली होवून नवरा दुसऱ्या गावी गेला तरी भेटणार आहेच ना . जमेल तेव्हा येणार आहेच. ज्यांनी आपल्या पती ला कायमचे गमावले अशा स्त्री कडे बघितले की लक्षात येईल की हा काही काळ पुरता दुरावा आहे. आयुष्यभराचा नाही. म्हणून आहे त्याचा स्वीकार करा .समाधान मानावे .
इतरांच्या सारखेच पती सोबत राहायचे सुख माझ्या वाट्याला का नाही, म्हणून असमाधानी राहू नका.परिस्थिती बदलली की , परत बदली झाली की एकत्र येणारच आहात यात समाधान माना. आणि तसा सकारात्मक विचार करा.
दोन मित्र शाळेत असल्यापासून एकत्र असतात. जेवण खाणे , अभ्यास एकत्र करत असत. कॉलेज ही एकत्र. नंतर ऑफिस ही एकच. दोघे खूप जवळचे मित्र असतात. सुख दुःखात कायम एकत्र. एकदा ऑफिस मधून येताना त्यांच्या गाडीला accident होवून ते दोघेही गंभीर जखमी होतात. दोघेही एकाच हॉस्पिटल मध्ये एकच रूम मध्ये. फक्त एकाची बेड खिडकी कडे आणि एकाची बेड भिंती कडे.
खिडकी कडे आहे तो आपला मित्र किती नशीबवान ,वत्याच्य वाटेला खिडकीतून बघण्याचे सुख आपल्याला मात्र नाही असे त्या दुसऱ्या मित्राला दुसरा भिंती कडचा मित्र त्याला वाटत असतें. तो रोज त्या मित्राला विचारत असे की खिडकीतून काय दिसते तेव्हा तो मित्र सांगत असे . अरे बाहेर हिरवे गार मोठे झाड आहे , बाग आहे. बागेत मुले खेळत आहेत. काही जण वॉकिंग करत आहेत. आकाशात उडणारे सुंदर पक्षी दिसत आहेत.
त्या भिंतिकडेच्या मित्राला याचा फार त्रास होत असे .मला मात्र भिंतीकडे बघावे लागते. तो त्याचा द्वेष करू लागला. मनातून चिडचिड करू लागला. एके रात्री भिंती कडेच्या मित्राची तब्येत अचानक बिघडली . तो मदातिकरिता इकडे तिकडे बघत होता .श्वास घ्यायला त्रास होवू लागला .या भिंतिकडच्या मित्राने बघितले पण काही मदत केली नाही. तो तसाच झोपून राहिला. दुसरे दिवशी तो मित्र हे जग सोडून गेला हे समजल्यावर त्याला वाईट वाटले.
पण मग त्याने त्या मित्राची खिडकी कडची बेड देण्याकरिता सांगितले. जेव्हा त्याला ती बेड दिली तेव्हा त्याने उत्सुकतेनं खिडकी मधून बाहेर बघितले आता आपल्याला छान छान गोष्टी बघायला मिळणार . या आनंदाने त्याने बाहेर बघितले खिडकीतून तर त्याला तिथे भिंत दिसली. त्याला एवढी निराशा आली . आणि आपल्या मित्राची साथ सुटल्याची हळहळ वाटली. केवळ आपल्याला बरे वाटावे म्हणून तो खिडकीतून काय दिसते याचे रसभरीत वर्णन करून आपले मन उत्साहित करत होता .पण प्रत्यक्षात मात्र तिथे ही भिंतच होती.
पण आपल्याला तो आनंद , उत्साही , फ्रेश बनवत होता. आपण मात्र त्याला समजून घेतले नाही. त्याला शेवटी ही मदत केली नाही. याची हळहळ वाटू लागली.
आपल्या अवती भोवती ही आपण जे बघत असतो लोक , वस्तू , त्यांच्या चांगल्या चांगल्या गोष्टी , श्रीमंती यामागे ही असेच काहीसे असते. कधी त्यांनी हे करण्याकरिता काढलेले कर्ज आपल्याला दिसत नाही. कर्जाचे हप्ते नियमित चुकवताना होणारी धावपळ , कसरत समजत नाही. कधी आपली झाकली मूठ सव्वा लाखाची. ..बाहेर लोकांना आपल्यातल्या उणिवा कमतरता दिसू नये म्हणून एक वेगळा चेहरा. जसे विदुषक कायमच वरती वेगळा मुखवटा धारण करतो ,आणि सगळ्या जगाला हसवत असतो , पण आत मात्र तो खूप दुखी असतो. मेरा नाम जोकर मधल्या राजू सारखे.
अनेकदा लोकांनी जे कमविले असते त्याकरिता त्यांनी खूप त्याग केले असतात. प्रसंगी घरापासून , कुटुंब , मुले यांच्यापासून दूर राहून , प्रसंगी उपाशी राहुन , कधी मिळेल ते खावून , कधी आजारी असताना ही त्यात च काम करून , पैसा , नाव , कीर्ती , यश मिळविले असते.
पण आपल्याला हे दिसत नाही फक्त त्याचे यश , वस्तू , आनंद हेच दिसते. त्याचा त्रास तो कशातून गेला याचे आपण विचार ही करत नाही.
म्हणून इतरांकडे हे आहे ते आहे हे बघून किंवा विचार करून , किंवा आपल्याकडे हे नाही ते नाही असे नकारात्मक विचार करून , आपल्या कडे असलेल्या सुखाचा , आनंदाचा विसर पडू देवू नका.
ते सुख माझ्या वाट्याला का नाही, म्हणून असमाधानी राहू नका.तर आहे याकडे सकारात्मक दृष्टीने बघा. बरेचदा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे असतात. जसे कवळी असलेले दात लांबून आपल्याला मोत्या सारखे .एकसारखे , स्वच्छ दिसत असतात. आणि मग आपल्या दाता मधले व्यंग , फटी , खाली वर असणारे दात आपल्याला त्रासदायक वाटतात. आपल्याकडे त्यांच्या सारखे टपोरे सुंदर दात का नाहीत असे वाटत असते. पण त्या कवळी ने कडक वस्तू खाताना त्या लोकांना होणारा त्रास त्यांनाच जाणवत असतो.
असे आपण ही अनेक गोष्टीतला आपल्याकडे असणारे सुख , आनंद , समाधान याला आपण महत्व देत च नाही. आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्ती , समजून घेणारी लोक , भावना शेअर करण्यासाठी असणारे आपले लोक, कमी पैसे मिळाले तरी रात्री दमून भागून सुखाने लागणारी झोप या छोट्या पण मोठ्या गोष्टी ही आपण count करत नाही.
आयुष्य खूप सुंदर आहे. आणि ते अजून सुंदर होण्याकरिता ते सुख माझ्या वाट्याला का नाही, म्हणून असमाधानी राहू नका.तर आहे त्यात समाधान मानून आनंद अजून वाढवा. किंवा मग आपल्यातल्या क्षमता अजून वाढवा.
सुख म्हणजे नक्की काय असतं ? कस्तुरी मृग असतो तसे त्याच्या स्वतः मध्ये सुगंध दडलेला असतो आणि तो इतरत्र शोधत असतो. तसे आपले सुख आपल्यातच दडले आहे.
आयुष्य सुंदर आहे ते अजून सुंदर बनविताना ते सुख माझ्या वाट्याला का नाही, म्हणून असमाधानी राहू नका. तर आपल्यात दडलेले ते अमूल्य सुख शोधा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


