तुळशीच्या पानांचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी काय संबंध!
डॉ. रोहिणी कोरके
तुळस ही भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी अशी वनस्पती आहे.आजही आपल्या देशात प्रत्येकाच्या दारात छोटीशी का होईना तुळस असतेच.जुन्या बायका तर अंघोळ करून तुळशीला पाणी घातल्याशिवाय पाणीही प्यायच्या नाही.त्यामागे कारणही तसचं आहे कारण तुळशीमध्ये ओक्सिजन बाहेर सोडण्याचे प्रमाण अधिक असते.
त्यामुळे सकाळी तुळशीचे दर्शन घेतले की शरिराला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. आणि फुप्फुसे कार्यक्षम राहतात. घरासमोर एक तुळस असल्यास घरातील हवा शुध्द होते. तुम्ही म्हणाल मग बायकांनाच का मग पुरुषांनी का नाही घ्यायचे तर याचे उत्तर असे आहे की बायका जास्ती करून घरातच असतात.त्यामुळे त्यांना मिळणारे ऑक्सिजनचे प्रमाण त्यामानाने कमी असते.
म्हणून सकाळी पाणी घालावे, तसेच संध्याकाळी तुळशीला दिवा लावणे अशा गोष्टी त्यांच्यासाठी सांगितल्या आहेत जेणे करून त्या बाहेर पडतील आणि त्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळेल.तर यामागचे अजून एक कारण असे की तुळशीला हळद कुंकू लावून पाणी घातल्याने मनाला प्रसन्नता वाटते. मन प्रसन्न राहिले की शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते.तसेच कोवळा सूर्यप्रकाशही त्यावेळी मिळून जातो.त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन D योग्य मात्रेत मिळून जातो.
पुरुष या ना त्या कारणाने बाहेर पडतच असतात.त्यामुळे त्यांना तेवढा प्रॉब्लेम येत नाही. आषाढी वारीला जाताना लोक डोक्यावर तुळस घेऊन चालत असतात त्यामागेही तेच कारण असावं.कारण ते लोक एवढा लांबचा प्रवास चालत करतात.चालताना किंवा धावताना आपोआपच शरीराला ऑक्सिजनची गरज अधिक भासते.तसेच वारकरी गळ्यात तुळशीमाळ घालतात त्यामागेही हेच कारण असावं.
तुळशीचे शारीरिक आरोग्यासाठी उपयोग: भारतात यास एक घरगूती औषधाचा भांडार मानले जाते.
*तुळशीस टॉनिकही म्हंटले जाते कारण यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत.तुळस आपल्याला विविध संक्रमणापासून वाचवते.
*तुळशीच्या पानांचा रस 2- 3 थेंब पाण्यात टाकल्यास पाणी निर्जंतुक होत अंघोळीसाठी तुळशीच्या पानांना पाण्यात टाकून त्याने अंघोळ केल्यास आरोग्यदायी मानले जाते.
*तिच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, पचनशक्ती वाढते.
* सर्दी खोकला ताप दांतदुखी श्वासारोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुफ्फुसांचे रोग, ह्नदयाचे विकार, हया सर्वांमध्ये तुळस वापरली जाते. तुळशीची ताजी पाने खाल्ल्यास सर्दी खोकला बरा होतो. तुळस पानांना कूटून त्यांना मधासोबत घेतल्यास गळयातील कफ दूर होतो.
*डोकेदुखी-अतिउष्णतेने डोकेदुखीची समस्या निर्माण होणे ही सामान्य गोष्ट आहे. अशावेळी तुळशीची पाने आणि चंदनाची पेस्ट करून कपाळावर लावावी. यामुळे नक्कीच डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
*दातांमध्ये तुळसतेल भरल्यास दातांच्या वेदना कमी होतात.
* पाने खाल्ल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होते.
* नेत्रविकार : डोळ्यांच्या समस्यांवर तुळशीच्या काळ्या पानांचा रस महत्त्वाची भूमिका निभावतो. तुळशीच्या काळ्या पानांच्या (कृष्ण तुळस) रसाचे काही थेंब डोळ्यात टाकल्याने दाहकता कमी होण्यास मदत होते.
* तुळशीची पाने सुगंधीत असतात. याच्या पानांचा सुगंध घेतल्यास श्वसनसंस्थेतील जिवाणूंचे संक्रमण कमी होते.
*कावीळ झाली असता तुळशीचा हार घालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
*तुळशी माळेत रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद आहे. हे झाले शारीरिक आरोग्याबद्दल आता पाहूया मानसिक आरोग्य विषयक माहिती.
या धावपळीच्या जगात बरेच लोक मानसिक त्रासातून जात असल्यामुळे ते नकळतच तणावयुक्त जीवन जगताना दिसतात. तुळशीच्या पानांमध्ये अँटीस्ट्रेससारखे घटक उपलब्ध असतात. त्यामुळे ते माणसाला मानसिक तणावातून मुक्त करतात.
तसेच तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तणावातून येणा-या नकारात्मक विचांरावर मात करणे देखील सोपे होते. तुळशी माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते, चैतन्य वाढते,आत्मा शुद्ध राहतो. तुळशी ही एक संजीवनी आहे, गळ्यामध्ये तुळशीची माला परिधान केल्याने विद्युत तरंगांचे उत्सर्जन होते त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
तुळशीची माळ परिधान केल्यास मानसिक शांती मिळते. गळ्याभोवती परिधान केल्याने अत्यावश्यक अॅक्युप्रेशर पॉईंट्सवर दबाव आणला जातो, व मानसिक ताणतणाव कमी होतो. स्मरणशक्ती वाढविण्यात मदत होते. अशा प्रकारे तुळस ही शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी अतिशय लाभदायी वनस्पती आहे.
आता प्रश्न असा राहतो की तुळशीचे बरेच प्रकार आहेत तर औषधी म्हणून कोणती तुळस अधिक उपयोगी ठरते.तर आयुर्वेदामध्ये कृष्ण तुळस ही अधिक गुणकारी सांगितली आहे.
तर अशा या गुणकारी तुळशीचा उपयोग आपण सर्वांनी दैनंदिन जीवनामध्ये केला पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


