तुम्ही दररोज काय आणि कोणाचं सहन करता, याबद्दल पॉझिटिव्ह कसे राहावे?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
जतिन, जतिन देशमाने. एक मध्यमवर्गीय माणूस. एका छोट्याश्या कंपनीत काम करणारा. घरी बायको दोन मुल आणि आई. जतीन चा स्वभाव तसा साधा. अगदी नाकासमोर चालणार आयुष्य. कोणाशी कधी काही भांडण नाही की तंटा नाही. आपण भलं नी आपलं काम भलं अस त्याच तत्व. कोणी काही बोल तरी तो उलटुन बोलणाऱ्या तला नाही. कदाचित यामुळेच असेल त्याला जाईल तिथे काही ना ऐकून घे, चूक नसताना त्याबद्द्ल बोलणी खा अस सर्व सहन करावं लागत असे.
घरी आई आणि बायकोची भांडण. ज्यात बायकोचं तुमची आई मला नीट वागवत नाही आणि तुम्ही बोलत नाही यावरून वाद. तर सून आल्यापासून तू वेगळा वागायला लागला आहेस. माझं कोण राहील नाही यावरून बोलण. दोन्ही बाजूने बोलणी त्यालाच खावी लागत. दोघींना समजावलं तरी त्या ऐकत नसत. दोघांनाही त्यांचं बोलण खर वाटतं असे, पटत असे. पण मध्ये जतिन ची कोंडी होत होती.
दिवसभराच्या कामाने तो दमून घरी येई. या अपेक्षेने की घरी आल्यावर तरी शांतता मिळेल. जरा उसंत मिळेल. पण नाही आल्यावर यांचे वाद सुरू होत. बरं त्यांच्या वादात अजून वाद करून भांडण्यात त्याला रस नसे व त्याचा तसा स्वभाव पण नव्हता.
घरी अस तर कामावर काही वेगळं वातावरण नव्हत. कितीही नीट काम केलं तरी बॉसच बोलण खाव लागे. तसच याचा स्वभाव गरीब असल्याने कामावरचे इतर लोकही त्याला वाटेल तस वागवत. आपलं काम करून घ्यायचं आणि नंतर झिडकरायच. जतीनला सर्व समजत होत पण त्याला नाही म्हणता येत नसे. तेवढा खंबीरपणा, ठामपणा त्यात नव्हता.
म्हणूनच या सर्व गोष्टी त्याला सहन कराव्या लागत होत्या. पण तो ऐकत होता, सहन करत होता याचा अर्थ त्याला त्रास होत नव्हता अस नाही. त्याला खूप दुःख होई. आपण इतकं नीट वागूनही आपल्यासोबत अस का व्हावं असा त्याला प्रश्न पडे. अस किती दिवस आपण सहन करणार असही त्याला वाटे. जवळचा म्हणावं अस कोण खास मित्र पण नाही. ज्याला मनातलं दुःख सांगता येई. बाकीच्यांना याच परिस्थितीत पाही तेव्हा त्यांचं वागणं याच्या विरुद्ध असे. ती लोक अस झाल तर सहन करत नसत.
भांडण करत, आपला मुद्दा पटवून देत, प्रसंगी वाईटपणा पण घेत. पण जतिन जितकं सहन करे तास कोणाला त्याने पाहिलं नव्हत. अर्थात त्याला या गोष्टी जमणारच नव्हत्या. पण हे सर्व कधी कधी त्याच्या सहन शक्तिपलीकडे जाई. एकप्रकारे असाह्य्यतेची भावना मनात येई. इतकं सर्व करून जर आपल्याला हा त्रास सहन करायला लागतोय याचा अर्थ आपल्या करण्याचा तरी काई उपयोग अस वाटायला लागे आणि याचा परिणाम त्याच्या मनात नकारात्मकता येऊ लागली.
जतिनची ही कथा तुमच्या आमच्या मधलीच एक आहे. ही फार वेगळी नाही.
आपल्यातल्या प्रत्येक माणसाला काही ना काही सहन करावं लागतच. कारण आपलं आयुष्य काही परिकथा नाही. यात अडचणी, त्रास सर्व येणार. कामावर असताना वरिष्ठांच बोलणं सहन करा, घरी काही झालं तर घरातल्यांची बोलणी सहन करा, काहीच नाही आणि आपला त्यात संबंध पण नाही अश्यावेळी समोर चाललेले वाद सहन करा, ऐका. प्रत्येकाची कथा काहीशी अशीच आहे. पण सर्वांना हे सहन करायला जमत अस नाही. बऱ्याच जणांच्या हे सर्व सहनशक्तिपलिकडे जात. कारण एकसारखं अस होत असेल तर आपला आपल्यावरचा ताबा जातो. मग त्यातून परत भांडण, वादावादी, घर सोडून निघून जाणे अश्या गोष्टी पण होतात.
पण सहन होत नाही म्हणून केलेल्या या गोष्टी पण त्रासदायकच ठरतात. मग अश्या वेळी आपली सहनशक्ती कशी ताब्यात ठेवावी? याबद्दल सकारात्मक कसे राहावे?
तर आधी आपल्याला विचारांच्या पातळीवर काम करावे लागेल. जेव्हा आपण सहन होत नाही अस वाटून काहीतरी उलट प्रतिक्रिया देतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट का सहन झाली नाही याचं उत्तर शोधा. तर अनेकदा ती गोष्ट आपण मनात खूप मोठी करतो. उदा. बायको वेळेवरच बडबडली यावरून राग. बाबा अभ्यासावरुन ओरडले यावरून रुसवा. या गोष्टी मनात खूप मोठ्या झाल्याने त्याची सहनशक्ती पण कमी होते. तर आधी नेमक्या या गोष्टी खरच किती वाईट आहेत, आपल्याला वाटतात तितक्या त्रासदायक आहेत का हे लक्षात घ्या.
दुसरे म्हणजे बऱ्याचदा समोरची व्यक्ती आपल्या चांगल्या साठीपण सांगते. बोलण्याची पद्धत कदाचित असेल वेगळी. कामाच्या ठिकाणी अस होत. बॉस म्हटल्यावर त्यांच्या बोलण्यात थोडातरी कठोरपणा असतो. पण त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ लक्षात घेतला तर आपल्याला तितक त्रास होणार नाही.
आपण अनेकदा आपल्याला सहन झालं नाही की काहीतरी बोलून जातो, त्यातून शब्दाला शब्द वाढतात. वाद होतात. त्यापेक्षा आपल्याला जर काही पटत नसेल तर योग्य शब्दात म्हणजेच ठामपणे सांगता आलं पाहिजे. अश्या बोलण्यात राग, दुःख नाही तर काहीतरी चांगलं निघण्याची शक्यता असते. यासाठी आपलं त्यांच्या रागाचं कारण नीट समजावून घेणं, तसेच आपली बाजू आणि यापुढे ही गोष्ट कशी हाताळता येईल यावर बोललं जात.
इतकं सर्व होऊनही जर समोरची व्यक्ती तसच वागत असेल तर एक लक्षात घ्या. आपण कोणावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. आपण गोष्टी नीट व्हाव्यात यासाठी प्रयत्न करू शकतो. इतकं जरी समजलं तरी आपला त्रास कमी होईल. कारण हे सर्व आपल्याला आपल्या आंतरिक शांततेसाठी करायचं आहे. ती कधी येणार? जर आपला आपल्यावर नीट ताबा असेल तर.
आणि सहन अश्याच गोष्टी करायच्या ज्यातून आपल्याला फायदा होईल. फायदा या अर्थाने जिथे सहन केल्याने आपले मानसिक बळ वाढत असेल, वाद होत नसतील, आपला आपल्यावरच ताबा वाढत असेल अश्या गोष्टी. जिथे आपल्याला शारीरिक इजा होते, जिथे आपल्या सहन करण्याने आपलं नुकसान होत असेल अश्या गोष्टी सहन करायच्या नाहीत.
सर्वात शेवटी आपली सहनशक्ती का वाढवावी? कारण आपल्या आयुष्यात आपण काहीतरी ध्येय ठरवत असतो. आणि ही पूर्ण करत असताना आपल्याला प्रत्येक वळणावर काहीतरी सहन करावे लागणारच आहे. इथे आपली सहनशक्ती जर कमजोर असेल, आपण लगेच माघार घेत असू तर आपण आपले ध्येय गाठू शकत नाही. म्हणून काही झालं तर मला काय साध्य करायचे आहे? कुठे पर्यंत पोहोचायचे आहे हे लक्षात घ्या. त्याच्याशी जर तुलना केली तर आपल्याला या रोज घडणाऱ्या घटना साध्या वाटू लागतील आणि आपली सहनशक्ती पण वाढेल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख आवडला