तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टीत राग येत असेल तर तुम्ही हे करून पाहिलंय का?
सोनाली जे.
बऱ्याचवेळा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीत राग येतो. आणि हा राग का येतो ? तर आपल्या मनासारखी गोष्ट घडली नाही , आपल्याला अपेक्षित असते त्याप्रमाणे समोरची व्यक्ती वागली नाही तर, परिस्थिती समोर आपण हतबल असू , त्यावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर. राग येतो. म्हणजे काय होते नक्की ? तर बाह्य गोष्टींचा परिणाम आपण आपल्या अंतर्गत गोष्टींवर करून घेतो.
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कोणा ना कोणावर रागविण्याची कोणाच्या तरी रागाचा सामना करण्याची वेळ येतच असते.
आपण कोणावर रागावतो ? कधी विचार केलात का ? आपण परक्या माणसावर कधी रागावत नाही . आपल्याच माणसावर रागावतो. आणि कधी हा राग लटका असतो.
आपण ही आयुष्यात एखाद्याच्या चुकीच्या वागण्याने , आपल्या अपेक्षेप्रमाणे न वागल्याने , कधी अपेक्षाभंग झाल्यामुळे , कधी गैरसमजातून आपल्याच लोकांवर रागावून त्यांच्यापासून कायमचे दूर जाण्याचा , किंवा त्यांना कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो . आयुष्यभर रागाचे ओझे घेवून ते बाळगत असतो.एकमेकांच्या कडून आपण ठेवलेल्या अपेक्षा आणि अपेक्षाभंग हे आपल्यातल्या रागाचे कारण असते. त्यांनी कसे वागावे हे आपण ठरवू नये. आपल्या दृष्टीने आपण योग्य वर्तन करावे. समोरचा रागावला म्हणून रागाची प्रतिक्रिया देवू नये.
या सगळ्या घटना या परिस्थितीनुसार आपण दिलेल्या प्रतिक्रिया च असतात. आणि परिस्थिती ही कायम सारखीच राहत नसते ती बदलत असते. एखादी व्यक्ती आपल्यावर त्या वेळी रागावली म्हणजे आपण तो राग आयुष्यभर धरून ठेवावे असे नाही ना ?? ..एक लक्षात घ्या , परिस्थिती ही क्षणिक आहे , ती आता काही क्षण , तास, दिवसात बदलणारी असते . पण तुमची प्रतिक्रिया जो तुमचा राग आहे तो एकमेकांना कायमचे दूर करू नये. तुमच्या मनात एकमेकांच्या विषयी तिरस्कार ,द्वेष निर्माण करू नये. तुमचे चांगले संबंध बिघडवू नयेत. दोघात दुरावा निर्माण करू नये. तुमची प्रतिक्रिया तुम्हाला एकमेकांपासून कायमचे गमावू नये म्हणून प्रयत्न करा.
थंडीचे दिवस असतात म्हणून राजदरबार बाहेर उन्हात भरला असतो. एक व्यक्ती येते आणि म्हणते माझ्या कडे सारख्या दिसणाऱ्या दोन वस्तू आहेत , अनेक राज्यात जावून आलो पण त्यांनी हिरा ओळखला नाही. त्यात एक काच आहे आणि एक हिरा आहे. त्यातला हिरा जर दरबारात ओळखला किंवा तुमच्या राज्यात दरबारात ले , पंडित , नगरवसी कोणी जर अचूक ओळखले तर हा हिरा तुमच्या राजखजान्यात ठेवा , आणि जर नाही ओळखला तर त्या हिऱ्याच्या दुप्पट किमंत मला द्यायची.
राजदरबारात सगळे पारख करू लागतात . कोणालाच ओळखू येत नाही. तेव्हा एक आंधळे बाबा म्हणतात मला संधी द्या . त्यांना संधी दिल्यावर केवळ एकदा स्पर्श करून ते क्षणात ते हिरा कोणता आणि काच कोणती ते सांगतात. राजा आंधळे बाबांना विचारतो तुम्हाला दिसत नसताना ही तुम्ही अचूक कसे. ओळखले? तेव्हा ते सांगतात की आपण ऊनात बसलो होतो. उन्हात काच गरम झाली. हिरा मात्र थंड राहिला.
या गोष्टीतून सांगायचे म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या लोकांवर रागावत असतो आणि अनेक चांगल्या व्यक्ती, चांगले मित्र आपल्या आयुष्यातून दूर होतात. कधी कधी क्षणिक तर कधी कायमच्या दुरावतात.
ज्याने विपरीत परिस्थिती मध्ये ही आपला स्वभाव बदलला नाही, टिकवून ठेवला . शांत राहिला ..बाह्य परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होवू दिला नाही. तो हिरा .. तो सर्वांना हवाहवासा वाटणारा. तो व्यक्ती ही सर्वांना धरून राहतो.टिकवून ठेवतो.
मग आपण कधी प्रयत्न केले का विपरीत परिस्थिती मध्ये , बाह्य परिस्थिती असेल , इतरांचे वर्तन , मनाविरुद्ध घटना याचा आपल्यावर कोणताही परिणाम होवू न देता आपण कधी शांत , तटस्थ , न रागावता राहिलो का ? नाही ना ?? मग तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत राग येत असेल तर तुम्ही हे करून पाहिलंय का?
१. React करू नका : प्रतिक्रिया देवू नका : एखादी व्यक्ती , परिस्थिती हाताबाहेर गेली तर आपण अस्वस्थ होतो , समोरच्याला दोष देतो, आणि स्वतः चे आणि समोरच्या चे ही मानसिक संतुलन बिघडवून टाकतो. यापेक्षा त्याक्षणी शांत रहा , काहीच react करू नका.
प्रतिक्रिया तात्कालिक , क्षणिक आहे आणि त्यात कोणतीही विचार प्रक्रिया समाविष्ट नाही म्हणून कोणत्याही परिस्थितीवर , परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देऊ नका / react होवू नका.. त्याऐवजी परिस्थितीला योग्य विचार प्रक्रियेने प्रतिसाद / response द्या … ” React होणे हे अगदी लगेच घडू शकते परंतु प्रतिसाद देण्यास वेळ घ्या , तो देण्यास वेळ असतो . प्रतीक्रिया तात्पुरती असते आणि ताबडतोब चुकीची प्रतिक्रिया देवून होणारा परिणाम आणि आपल्या हातातून गोष्टी कंट्रोल बाहेर जावून , कधी इतरांना त्रासदायक शब्द , कृती, राग यातून पश्चात्ताप करून घेण्यापेक्षा , विचार करून , शांत राहून , वेळ घेवून प्रतिसाद द्या, प्रतिसादासाठी जबाबदार रहा, पश्चात्ताप करून कोणताही खेद बाळगू नका … मनाने हलके आणि मानसिकरित्या मुक्त व्हा …
२. रागाच्या भरात आपले आणि आपल्या जवळच्या लोकांचे जीवन आणि मनःस्वास्थ्य बिघडवू नका , आणि स्वतः बिघडवून घेवू नका.
मोजकेच लोक आपले असतात, आपले त्यांच्यावर आणि त्यांचे आपल्यावर प्रेम , माया , आपुलकी , भावना असतात . त्यामुळे अशा आपल्या लोकांना आयुष्यभर जपा.
हे सगळे सांगणे सोपे आहे , पण प्रत्यक्षात करणे अवघड आहे.
काही वेळेस परिस्थिती खूपच हाताबाहेर जाते. काही ही केले तरी दोघांच्यात समजून घेण्याची मानसिकता संपते. रागात पारा एव्हढा चढतो , temper चढते तेव्हा काही ही केले तरी पटवून सांगितले तरी पटवून घेण्याची मानसिकता राहत नाही. अशावेळेस खूप क्वचित वेळेस एकमेकांना गमाविण्या शिवाय पर्याय च नसतात. दूर राहा. पण तेव्हाही एकमेकांना स्पेस द्या. वेळ द्या. शांत रहा. ही तात्कालिक परिस्थिती , क्षणिक राग हा कधी ना कधी शांत होईलच. . परिस्थितीची जाण येईलच.
३. मन divert करा../ दुसरीकडे मन गुंतवा : आपण लहान असताना रागावलो की आपले आई बाबा , आजी आजोबा आपल्याला एक ते दहा अंक मोजायला लावत. तरी ही राग कमी झाला नाही तर उलटे अंक मोजायला लावत . तरीही राग कमी झाला नाही तर मात्र १ते २० , ३० ,५० असे करत शंभर पर्यंत आणि तरी नाही कमी झाला तर उलटे अंक मोजताना आपण ते नीट मोजले जावे म्हणून त्यात पूर्ण एकाग्र होतो. आणि राग विसरून जातो.
तसेच मोठे झाल्यावर ही करून बघायला काय हरकत आहे. मुळात कारण छोटे असते आणि राग मात्र नाकावर मोठा.
हा एक उपाय शिवाय आपल्या आवडत्या गोष्टी करा , छंद जपा , मित्र मैत्रीणीना फोन करा , भेटून मन मोकळे करा, चित्रकला , संगीत , हस्तकला यात स्वतः ला गुंतवून ठेवा. त्यातून नावीन्य ही निर्माण होते आणि उत्साह ही.
४. आनंदी राहा : रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा छोट्या छोट्या गोष्टीत राग येत असेल तर खूप आनंद मिळवा छोट्या छोट्या गोष्टीतून , निसर्गातून ,लहान मुलांच्या मधून . मनोरंजन असेल त्यातून. , फिरायला जा , ट्रेकिंग , पिकनिक , जे आवडेल त्यातून आनंदाची निर्मिती करा.
५. योगा , meditation , ध्यान धारणा , विपश्यना करा.. : ज्यातून मन एकाग्र होईल , शांत राहील आणि स्वतः वर कंट्रोल ठेवण्यास मदत होईल.
६. मोकळ्या हवेत जा : राग आला की हवेवाचून आपला जीव कसा गुदमरतो .तसे होते ..म्हणून एक तर खिडकी उघडा आणि दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. असे करत रहा.
किंवा मस्त मोकळ्या हवेत जा.
७.तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत राग येण्याचे कारण ही छोटे असते. म्हणून स्वतः ची वैचारिक बैठक पक्की करा. भावनिक गोष्टींवर नियंत्रण ठेवा. आणि व्यवहारिक गोष्टींचा स्वीकार करा.
८. एखादी वस्तू , व्यक्ती यावरचा सततचा आपला हक्क समजू नका : हे माझे आहे , ही व्यक्ती केवळ माझी आहे असे समजू नका. तर सत्याचा स्वीकार करा .तुमच्या सारख्या वस्तू दहा लोकांकडे असतील , कदाचित उद्या तुमची वस्तू ही देण्याची वेळ येईल , तुमची जवळची व्यक्ती केवळ तुमची एकट्याची कशी असेल ? आई वडील , नातेवाईक , भावंडे , मुले , बायको., मित्र मैत्रिणी सगळी नाती तेवढीच जवळची ना त्या व्यक्तीला. मग तुम्ही सततचा आपला हक्क गाजवू नका. सत्य परिस्थितीचा स्वीकार करा.
Don’t expect and accept. हे तत्त्व कायम लक्षात ठेवा.
९. भरपूर पाणी प्या : ज्या क्षणी असे वाटते ना आपल्याला राग येतो आहे त्याक्षणी भरपूर पाणी प्या. अगदी तोंडावर पण पाणी मारा. एकदम फ्रेश वाटेल.
१०. आवडते खेळ खेळा ,: मैदानी किंवा बैठे जे कोणते खेळ आवडतात ते नक्की खेळा. यातून मन ,, बुध्दी एकाग्र होतेच पण मैदानी खेळत शारीरिक energy आणि बैठ्या खेळात बौध्दीक energy खर्च ही होते आणि उत्साह निर्माण ही होतो.
राग येत असेल तर आणि त्यावर नियंत्रण म्हणून आवडते खेळ हा उत्तम उपाय.
आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत राग येत असेल तर तुम्ही सातत्याने तो नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करा. आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आयुष्य जगा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

All right