असे प्रश्न तुम्हाला हि पडतात का ?
हेमा यादव – कदम
1) छोट्या छोट्या गोष्टीमुळे सुद्धा खूप तणाव येतो तणावमुक्ती साठी काय करावे ?
दुर्लक्ष करायला शिका … एकदा गोष्ट घडून गेली कि आपल्याला काय पण परमेश्वराला पण ती दुरुस्त करता येत नाही … आणि आपण देवापेक्षा मोठे नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला कितीही त्रास करून घेतला तरी घडलेली घटना बदलणार नसते. हे स्वतःला समजून सांगा आणि गोष्टी तिथल्या तिथे सोडून देत जा .. तसेच तुम्हाला जो रिकामा वेळ मिळेल त्यात नको ते विचार करण्यापेक्षा एखादा छंद जोपासा .. लेखन करा .. ऑल द बेस्ट
2) तुमच्या घरातील सर्व मंडळी सतत घालून पाडून बोलत असतील तर काय करावे ?
सर्वात आधी ते तुमच्याशी असे का वागतात याचे कारण शोधा…. जेव्हा क्रिया घडते तेव्हाच प्रतिक्रिया येते .. त्यामुळे ते असे का बोलतात हे शोधून त्यावर काम करा जर नकळतपणे काही चुका घडत असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करा .. आपणच बरोबर आहोत हा विचार बाजूला ठेऊन तुम्ही स्वतःला त्यांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करा .. समजून घ्या कि ते असे का वागतात .. आणि खूप जास्त नाही पण थोडेफार तरी बदल करा मग कदाचित त्यांचं असे बोलणे कमी होईल.

3) “झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे” असे का म्हटले जाते?
सोपे आहे कारण झालेल्या गोष्टी लक्षात ठेऊन वर्तमानात किंवा भविष्यात काय फरक पडणार असतो .. आपण फक्त वर्तमानात जगायचे असते त्यामुळे भूतकाळ रम्य आणि भविष्यकाळ उज्ज्वल होतो , जर आपण वर्तमानातील वेळ भूतकाळ आठवण्यात आणि भविष्यकाळ रंगवण्यात वाया घालवला तर वर्तमानात आपण फक्त विचार करत बसू आणि कृती मात्र शून्य … आणि आपल्या अशा वागण्यामुळे भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही अंधारात …. म्हणून सर्वानी वर्तमानात जगायला पाहिजे .. वर्तमानात आपण आनंदाने सर्व गोष्टी भरभरून जगायला पाहिजे मग सर्व काही ठीक होते म्हणून असे म्हणतात कि झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे …. असे मला वाटते …
4) आयुष्याची साठी आली. तारुण्याच्या मस्तीत अथवा अजाणतेपणीही कधी कधी काहींना दिलेली उर्मट उत्तरे चुकीची होती, ही जाणीव मन व्यथित करते आहे. आता पश्चाताप होऊन काही उपयोग आहे का? ज्यांना दुखावलं त्यांचे शाप मला लागत असतील का?
कोणतीही कृती करण्याआधी १०० वेळा विचार करायला हवा .. पण एकदा का कृती घडली कि मग विषय संपला , त्यामुळे नंतर ” मी हे करायला हवं होते , किंवा मी ते करायला नको होते ” या मनात येणाऱ्या विचारांना अक्षरशः काही अर्थ नसतो , थोडक्यात सांगायचे तर समजा – गाडी चालवताना एखाद्या व्यक्तीकडून अपघात घडला आणि त्या मध्ये समोरच्या व्यक्तीचे निधन झाले , तर त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करणे शक्य नाही…. मग चूक कोणाची का असेना ज्याच्या हातून कृती घडली त्या व्यक्तीला परिणामांना सामोरे तर जावेच लागते ..
आपल्याकडे एक म्हण आहे “आपण जे पेरतो तेच उगवते ” त्यामुळे जास्त विचार नका करू आणि कदाचित काही लोकांनी तुम्हाला त्यांच्या वागण्याने वाईट बोलण्यास हि प्रवृत्त केले असावे कारण समोरच्यांच्या क्रियेवर तुम्ही प्रतिक्रिया दिली असणार .. असो सांगण्याचा मुद्दा हा कि समोर जी परिस्थिती होती त्यानुसार तुम्ही वागत गेलात आणि कृती करत गेलात .. गोष्टी घडून गेल्यात आता त्यावर आता चिंतन नको , जेव्हा परिणामांना सामोरे जायची वेळ येईल तेव्हा धाडसाने सामोरे जा … आणि बिनधास्त जगा … होऊन होऊन काय होणार ? काही होणार नाही .. मस्त एन्जॉय करा आयुष्य.. नको त्या विचारात अडकून पडू नका … वर्तमानात जगा ….
5) मी किंवा ती आम्ही एकमेकांचा भूतकाळ एकमेकांशी शेअर करू शकतो का? हो तर त्याला काही मर्यादा आहे का?
एकदा एखादी गोष्ट घडून गेली ती बदलणे आपल्या हातात नसते , त्यामुळे भूतकाळाला खरंच महत्व द्यायला पाहिजे का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे आवश्यक आहे , वर्तमानात जगताना आणि भविष्यात एखाद्या व्यक्तीसोबत पुढे जायचे ठरवल्यानंतर गरजेच्या गोष्टी माहित असल्या म्हणजे खूप झालं .. ज्या दिवशी आपला एखाद्या व्यक्तीसोबत जीवनाचा प्रवास सुरु होतो त्यादिवसापासून ती व्यक्ती आपल्यासोबत कसे वागते आणि आपल्या नात्याला योग्य न्याय देते का ? हे महत्वाचे असते ..
जर तुम्ही एकमेकांना कोणत्याही गोष्टी सांगितल्याने तुमच्या नात्यात दुरावा येणार नाही किंवा कोणतेही गैरसमज होणार नाही याची तुम्हाला १००% खात्री असेल तर तुम्ही भूतकाळावर जरूर चर्चा करा … पण त्या सवांदानंतर जोडीदाराच्या त्या वेळेच्या वागण्याचे अर्थ काढत बसू नका , भूतकाळात तुम्ही प्रत्यक्ष रित्या त्या ठिकाणी हजर नव्हतात त्यामुळे समोरच्या व्यक्तीने कोणत्या परिस्थितीत काही निर्णय घेतले ते आपल्याला माहित नसते म्हणून त्या निर्णयाचा किस न पाडता भूतकाळ गोष्ट म्हणून ऐका आणि तिथल्या तिथे सोडून द्या … समजूतदारपणाची उच्च पातळी दोघांमध्ये असेल तर कोणत्याही गोष्टी एकमेकांना सांगायला काहीच हरकत नाही असे मला वाटते …..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

