Skip to content

“तुमच्या जगण्याच्या प्रेरणेचं सर्वोच्च स्थान स्वतःला द्या.”

“तुमच्या जगण्याच्या प्रेरणेचं सर्वोच्च स्थान स्वतःला द्या.”


मधुश्री देशपांडे गानू


” सकारात्मक प्रेरणेचा तू आरंभ

तूच तुझ्या जीवनाचा संकल्प

प्रेम, समाधान तुझीच रूपे

यातच मानवा तुझे पूर्णत्व ..”

माझ्या कवितेतील काही ओळी आहेत या. जीवनातील कठीण काळातून जाताना स्वतःलाच समजावण्यासाठी, स्वतःलाच आधार, उभारी देण्यासाठी लिहिलेल्या.

माणूस सामाजिक प्राणी आहे. कळत नकळत समाजात, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा परिणाम आपल्यावर होत असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तिच्या सभोवतालची परिस्थिती, तिला येणारे अनुभव याने ती घडत असते. समाज सतत तुमच्यावर मतं, नियम लादत असतो. काही संपूर्ण समाजासाठी उपयुक्त असतात. तर काही वैयक्तिक स्वरूपाचे असतात.

सहज असं लक्षात येतं की बहुतेक सगळ्याच माणसांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड असतो. स्वतःबद्दल कमीपणा असतो. आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला जाणीव नसते. मुल्यही नसतं. पण जे आपल्याकडे नाही किंवा दुसऱ्याकडे आहे त्यावरच आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं आणि तेच आपल्याला हवं वाटत असतं.

यामुळे आपला व्यक्तिमत्व विकास खुंटतो. आपल्यातले चांगले गुण लक्षात घेऊन त्यावरच लक्ष केंद्रित करून आपला व्यक्तिमत्व विकास करणं आणि समाजातील बाह्य घटकांचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घेणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आणि ही आपली जबाबदारी आहे.

प्रत्येक व्यक्ती ही गुणदोषांसहित बनलेली आहे. परिपूर्ण कोणीही नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वैशिष्ट्य असतं. आपण फक्त बाह्य गोष्टींचा विचार करू. आपल्या सौंदर्याच्या व्याख्या फक्त गोरा रंग आणि सडपातळ शरीरयष्टी एवढ्याच आहेत. मग बाकीचे सगळे काय कुरूप?? याबाबत समाजाच्या अनेक धारणा या अत्यंत तकलादू, कुचकामी आणि तुमच्या स्वत्वाला, स्वाभिमानाला धक्का लावणार्या असतात.

प्रत्येक सावळा आणि काळा रंग असणार्‍या मुलीला लहानपणापासूनच प्रचंड न्यूनगंड असतो. एखाद्या वजन जास्त असलेल्या माणसाला सतत टोमणे ऐकावे लागतात. तुम्ही कितीही सतेज, निकोप, आरोग्यपूर्ण असाल तरीही. मग गोरी, सडपातळ पण शरीर अनेक रोगांनी पोखरलेले याला आपण सौंदर्य म्हणतो. किती विरोधाभास आहे हा!

हे तर झालं बाह्यगोष्टींचं.. पण तुमचं मन! ही तर एक प्रचंड ऊर्जा आहे. फक्त तुमचं मनच तुम्हाला खंबीर साथ देऊ शकतं. आज प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. केवळ समाज तुलना करतो, आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या म्हणून जे तुम्हाला पटत नाही, आवडत नाही ते तुम्ही करता. कितीतरी डॉक्टर आणि इंजिनिअर झालेली मुले त्यांची आवड काही वेगळी असू शकते. कोणाला नाटकात काम करायची आवड असेल, कोणाला फोटोग्राफीची आवड असेल ..

समाज, तुमचे नातलग सतत तुमची तुलना यशस्वी लोकांशी करतात. समाजातील यशस्वी लोकांचे अनुभव ऐकून त्यांच्या पासून प्रेरणा घेणे ठीक आहे. त्यापासून तुम्हाला विधायक उपयोग होत असेल तरीही छानच. पण त्यांच्याशी सतत तुलना नाही होऊ शकत ना! तुमची परिस्थिती, कुवत, क्षमता, आवड या सगळ्याला तुमच्या लेखी जास्त महत्त्व असायला हवं.  कधी तुम्ही तुमच्या सहयोगी किंवा मित्र-मैत्रिणींशी स्वतःची तुलना करता. भौतिक, सामाजिक, आर्थिक स्तरावर. याने होतं काय की एक तर तुम्हाला प्रचंड मत्सर वाटू लागतो.

स्वतःबद्दल असुरक्षितता वाटू लागते. सतत तुलना केल्यामुळे त्या व्यक्तीचा राग येतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वत्वाला धक्का लागतो. तुमचा आत्मविश्वास कमी होतो. तुम्हाला कशात सगळ्यात जास्त आनंद मिळतो, हे पाहणे जास्त गरजेचे आहे. त्यानुसार प्रयत्न करणं आणि स्वतःच खरं व्यक्तिमत्त्व घडवणं हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वतः सगळ्या बाबींचा साकल्याने विचार करून तुम्हाला काय हवे, तुमच्या आयुष्यात त्याने काय परिणाम होणार आहे हे ठरवायला हवं. स्वतःच स्वतःची सर्वोच्च प्रेरणा बनायला हवं.

तुमच्या आयुष्यात एखादी वाईट घटना घडली तर ती का घडली? मीच का? या प्रश्नांना उत्तर नसेलही कदाचित. या घटनांवर तुमचे नियंत्रण नसतं. तरीही त्या घटनेला तुम्ही कसे सामोरे जाता हे तुमच्या हातात आहे. त्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि कृती तुम्हीच ठरवू शकता. एखादी व्यक्ती अशा घटनेमळे निराश होऊ शकते आणि तिथेच अडकते.  एखादी व्यक्ती यातूनच सकारात्मकतेने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेते. हे सर्व तुमच्या अंत प्रेरणेवर अवलंबून आहे. बाह्य घटक तुम्ही बदलू शकता. आज समाजात कितीतरी अशी प्रतिकूल परिस्थितीतून वर येऊन यशस्वी झालेली उदाहरणे आपण पाहतो आहोत.

“डियर जिंदगी” नावाचा हिंदी सिनेमा आला होता. त्यात मानसोपचार तज्ञाच्या तोंडी असलेली वाक्य मला फार आवडली होती. “भीतीला सामोरे जा. तुमचं जगणं जर एका चौकटीत असेल आणि ती चौकट जर त्रासदायक होत असेल तर ती चौकट मोडण्याचे धैर्य दाखवा आणि आयुष्य भरभरून जगा.” किती छान सांगितलं आहे ना! तुमचं मन ही तुमची सगळ्यात मोठी शक्ती आहे. तुमचे विचार, तुमचा दृष्टिकोन त्यानुसार कृती बदलणं फक्त तुमच्या हातात आहे.

तुम्ही ठरवलं तरच बदल होऊ शकतात. तुमचं मन हे घटनांबाबत , व्यक्तीं बाबत सतत तुम्हाला संकेत देत असतं आणि बहुतांशी हे संकेत खरे असतात. त्यामुळे फक्त तुमच्या मनाचं ऐका आणि तुमचा आनंद तुम्हीच शोधा. ही फक्त तुमची जबाबदारी आहे. आपल्या चुकांची, अपयशाची जबाबदारी, खापर दुसऱ्यावर फोडू नका. परिस्थितीला जबाबदार धरू नका.

आपण जबाबदार आहोत हे एकदा स्वीकारलं की बदल व्हायला सोप्पं जातं. नेहमी स्वतःची स्वतःशी तुलना करा. कालच्यापेक्षा माझा आजचा दिवस कसा गेला? किती प्रगती केली हा विचार करा. विचारांचं सुनियोजन करण्यासाठी रोज नेमाने लिहायची सवय ठेवा. कोणत्याही गोष्टीसाठी सातत्य गरजेचं आहे.

तुम्ही जसे दिसता, जसे असता तसेच स्वतःला पूर्णपणे स्वीकारा. सगळ्यात जास्त स्वतःवर प्रेम करा. म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करण्याची अंतःप्रेरणा तुम्हाला मिळत राहते. “जब वी मेट” चित्रपटामध्ये गीत म्हणते ना ” मैं अपनी फेव्हरेट हूं”  तसंच.. मग जगही तुमच्यावर प्रेम करू लागतं. स्वतःची सर्वोच्च प्रेरणा तुम्ही स्वतःच आहात. तुमच्या यशाची, आनंदाची गुरुकिल्ली तुमच्या जवळच आहे. ती कधीही दुसऱ्यांना सोपवू नका. स्वतःच्या आनंदी, यशस्वी, समाधानी आयुष्याचे शिल्पकार स्वतः व्हा आणि तुमच्या प्रेमाच्या माणसांना त्यात सामावून घ्या..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““तुमच्या जगण्याच्या प्रेरणेचं सर्वोच्च स्थान स्वतःला द्या.””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!