Skip to content

तुमच्यावर शाब्दिक हल्ला करणाऱ्यांना न बोलता असं चोखपणे उत्तर द्या…

तुमच्यावर शाब्दिक हल्ला करणाऱ्यांना न बोलता असं चोखपणे उत्तर द्या…


हर्षदा नंदकुमार पिंपळे


शब्द हेची शस्त्र…
शब्द हेची अस्त्र…
शब्दाविन जीवन विवस्त्र….!

अरेरे…..हा तर शब्दांचा खेळ…! शब्द….शब्दांची ताकद अफाट असते यात काही शंका नाही. पण केवळ शब्द आहेत तसे वापरून चालत नाही. इथे प्रत्येक शब्दाला काही ना काही अर्थ आहे. चांगलं वाईट हे आपल्याला समजायला हवं.काही नाही तर शब्द आहेत असं म्हणून एखाद्या तोफगोळ्याप्रमाणे त्यांना फेकू नये. प्रत्येक वेळी जिभेला येईल तसं माणसाने बोलू नये.काही झालं की अनेकदा इतरांवर शाब्दिक हल्ले करणारे अनेक जण असतात.

शहाण्याला शब्दांचा मार हा पुरेसा असतो असं म्हणतात. पण जर सातत्याने जर का कुणी एखाद्यावर शाब्दिक हल्ला करत असेल तर त्यांनाही आपल्याला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे. प्रत्येकवेळी आपणही घुम्यासारख बसून चालत नाही. नाहीतर आपण शांत आहोत असं समजून समोरचा शाब्दिक हल्ल्याचा वेग वाढवतच राहतो.आणि आपण मात्र त्या हल्ल्यात पुरते जखमी व्हायला लागतो.कालांतराने जखमांची खपली उडून जाऊन जखमा पुन्हा ओलावतात , ताज्या होतात पण तरीदेखील आपण हातावर हात ठेवून गप्प बसतो.

अशावेळी आपल्याला समजत नसतं की नेमकं समोरच्याला काय उत्तर द्यावं….? हे शब्दांचे तोफगोळे कसे झेलावे…? आणि याला प्रत्युत्तर द्यावं की नाही द्यावं…? काही म्हणजे काही कळेनासं होतं.

इतकच नाही तर काही जणं मूग गिळून गप्प बसल्यासारखं अगदी गप्प राहतात. काहीही न बोलता निमुटपणे सगळं सहन करतात तर काही जणांना काही कळत नाही आणि काही जण मात्र पेटून उठतात, आणि काहीही करून त्या शाब्दिक हल्ल्याला प्रत्युत्तर देतात.

नेहमीच शांत राहून कसं चालेलं…? कधीतरी उत्तर द्यायला हवचं नं….?चला तर मग आपणही पाहूयात या सतत शाब्दिक हल्ला करणाऱ्या व्यक्तींना चोखपणे उत्तर कसं द्यायच ते……..

सर्वज्ञात असलेल एक वाक्य म्हणजे….”action speaks louder than words” . अर्थात कृती ही शब्दांपेक्षा जास्त बोलते किंवा कृती ही शब्दांपेक्षा बोलकी असते.अगदी याप्रमाणेच शाब्दिक हल्ला करणाऱ्या व्यक्तीला आपण आपल्या कृतीतून चोखंदळपणे उत्तर दिले पाहिजे. शब्दात कितीही सामर्थ्य असलं तरीही ते कृतीत उतरल्याशिवाय सार्थ वाटत नाही.

म्हणून कुणी कितीही शाब्दिक गोळ्या झाडूद्या तुम्ही मात्र कृतीतून उत्तर देणं सोडू नका.”action speaks louder than words” हे लक्षात ठेवून आपल्या एका कृतीत किती ताकद असू शकते हे समजून घ्या.आणि कृती करायला सुरुवात करा.त्या कृतीतूनच शाब्दिक हल्ल्याला जखमी करण्याचा प्रयत्न करा.

सतत शब्द अंगावर झेलण्यापेक्षा , कुणाचे टोमणे ऐकण्यापेक्षा एकदाच काय कृती करायची ती करा.आणि अशी कृती करा की जेणेकरून समोरचा next time शाब्दिक हल्ला करताना किमान एकदा तरी विचार करेल.

आणि कधी कधी गप्प रहाण्याची कृती सुद्धा चांगलीच यशस्वी ठरते.कारण अनेकदा समोरचा आपल्याकडे लक्षच देत नाही , आपल्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही असं वाटून शाब्दिक हल्ला करणारी व्यक्ती नाईलाजाने स्वतःहून माघार घ्यायला तयार होते. बडबड करून स्वतःचाच वेळ फुकट चाललाय अशी त्याला कुठेतरी पुसटशी जाणीव होते.

थोडक्यात काय तर….अशा लोकांकडून आपण करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नये. त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे. शांत राहून योग्य ती कृती करण्यावर भर द्यावा. कारण कृतीपेक्षा अजून दुसरं चांगलं बोलकं औषध नाही. दुर्लक्षित केले जात असल्याची भावना , इतरांना काही फरक पडत नाही , यांच्या कृतीपुढे माझे शब्द कमजोर……

या सगळ्या भावना एकत्रित घेऊन शाब्दिक हल्ला करणारी व्यक्ती मुळीच स्वस्थ राहू शकत नाही. अशा भावनेमुळे ती व्यक्ती आपोआप शाब्दिक हल्ला करणं कमी करेल हे नक्की.खूप साध्या आणि सोप्या आणि अगदी बोटावर सहजपणे मोजता येतील इतक्याच या गोष्टी आहेत.

so…या गोष्टी नक्की करून पहा…..आणि न बोलता अगदी चोखपणे उत्तर द्या….शब्दांचे इमले सहज कोसळतील…..!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “तुमच्यावर शाब्दिक हल्ला करणाऱ्यांना न बोलता असं चोखपणे उत्तर द्या…”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!