तुमच्यातला जगण्याचा आशावाद इतरांच्याही कामी यायला हवा………
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
आणि………… मऊ मऊ शुभ्र ढग असलेल आभाळ आज मात्र विलक्षण रंगांनी भरलेलं होतं.एखाद्या कोऱ्या पानावर चितारलेल ते चित्रच वाटत होतं जणू…..!! वेगवेगळ्या रंगछटांनी भरलेल हे विस्तीर्ण आभाळ– “आयुष्य खूप सुंदर आहे. ते भरभरून जगता आलं पाहिजे. आयुष्य कोरं वाटत असेन तर लक्षात ठेवा रंगांची सुरेख ऊधळण त्याच्यावर कधी ना कधी होणारच…….” हे प्रकर्षाने सांगत होतं.खरच, या आभाळाकडे पाहून हतबल झालेल्या कुणाच्याही मनात नक्कीच आशेची एक पालवी फुटली असणार हे नक्की…..
अबोल तु तरी शब्द उमटले
तुझ्या बोलण्याने आशेला नवे पंख फुटले…!!
या आभाळाकडे पाहून अशा ओळी नकळत सुचायला लागल्या. वाटलं,किती ते आभाळाच जादुई वागणं..! गेले पंधरा दिवस निराश असलेली मी..आज त्याच्याकडे फक्त पाहिलं आणि माझ्या मनात जगण्याच्या नव्या आशा घिरट्या घालू लागल्या………!!
इतकं सगळ झाल्यानंतर, माझ्या एक गोष्ट मात्र लक्षात आली. ती म्हणजे “जगण्यातला आशावाद” जो मी त्या आभाळाकडे पाहून शिकले.मित्रांनो-मैत्रिनींनो, आपण आपल्यातला “जगण्याचा आशावाद” इतरांच्या कामी कसा येईल याचा विचार करायला हवा. कारण आपल्यातला आशावाद इतरांमध्ये कळत-नकळतपणे नव्या आशा पल्लवित करत असतो.सभोवताली आपण कितीतरी लोकं बघतो ,जी फक्त आयुष्यात नकारघंटा वाजवताना दिसतात.
उदा ; – हे माझ्याकडून होणार नाही, मी नाही करु शकणार, आता काय सगळं संपल…. वगैरे वगैरे. हे असं नकारात्मक, निराशावादी बोलणं आजुबाजूचं वातावरणही बिघडून टाकतं.यामुळे थोडासा शिल्लक असलेला आशावादही मावळून जाईल. त्यामुळे नेहमी आशावादी जगण्याचा स्वीकार करा.
“काहीही करा पण आम्हाला उभं करा”
ही ताजीतवानी गोष्ट.खरतरं खूप वेदनादायी पण तितकीच प्रेरणादायी……..
पुरामुळे होतं नव्हतं सगळं गेल.पण त्या बाईने हिम्मत नाही हारली. अक्षरशः टाहो फोडत तिने मुख्यमंत्र्यांना विनंती केली– “काहीही करा पण आम्हाला उभं करा”. म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही जगण्याचा आशावाद मात्र तिच्यामध्ये अगदी ठसठसून दिसत होता. “आम्हाला आयुष्य अजून जगायचय.आम्हाला थोडी मदत करा.संकटांशी दोन हात करण्याची हिम्मत जराशी वाढेल.
कारण आशेचा एक तरी किरण आज ना उद्या खिडकीतून नक्की येईल याची मला खात्री आहे.” हे तिच्या वेदनांमधून स्पष्टपणे जाणवलं. मित्रांनो, तिच्या या बोलण्यामुळे इतरांमध्ये नक्कीच “शंभर हत्तींच बळ” निर्माण झालं असेल यात काही शंका नाही. तिचा हा जगण्याचा आशावाद इतरांसाठी नक्कीच प्रेरणा देणारा आहे.
संकटं येतात.ब्रेकप,घटस्फोट होतात.मनासारखं काही घडत नाही म्हणून “काही चांगल होणारच नाही” असा निराशावाद बरा नव्हे. आयुष्यात कितीदा दुःखाचे डोंगर कोसळतात पण म्हणून काही सगळ्या आशा सोडून द्यायच्या का..?
तर नाही…. नव्या गोष्टी नव्याने पुन्हा साद घालतील. आज नाही पण उद्या काहीतरी नक्की चांगल घडेल हा आशावाद ठेवला तर आयुष्य जगण्यास नवे पैलू मिळतील. निराशावादी राहण्यापेक्षा आशावादी जगणं पसंत करा. आयुष्य मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. त्या आशावादामुळे रंग भरल्या आभाळासारखच तुमच्या आयुष्याच चित्र सुंदर व्हायला वेळ लागणार नाही…….!!
अजून एक आवर्जून सांगावीशी वाटते, की आयुष्यात ध्येयवादी व्हा,प्रयत्नवादी व्हा… आशावाद आपोआप टिकून राहील. आणि निराशावाद कायमचा मिटून जाईल………
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


