तुमची वागणूक चुकीची नव्हती, हे कसे सिद्ध कराल ?
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असल्याने काही वेळा आपली चूक नसून देखील समोरच्याला आपण चुकीचे वाटूच शकतो. अशावेळी जर आपल्याला आपली वागणूक चुकीची नव्हती हे पटवून द्यायचं असल्यास आपण काही गोष्टींचा अवलंब करू शकतो.
१. सगळ्यात आधी आपली जी वागणूक इतर लोकांना चुकीची वाटली त्याबद्दल शांत डोक्याने एकदा विचार करा. आपण काय वागलो, ते खरंच चुकीचं आहे का?, तसं कोणी आपल्याशी वागलं असत तर आपल्याला चुकीचं वाटलं असत का? हे प्रश्न स्वतःला विचारणं महत्वाचं आहे. आणि हा सगळं विचार करून जर तुम्हाला वाटलं की तुमचं वागणं चुकीचं नव्हतं, समोरच्या माणसाचा त्याबद्दल काहीतरी गैरसमज होऊन त्यांना ते चुकीचं वाटलेलं असावं, तर नक्कीच आपण ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करू शकतो.
२.आपली वागणूक किंवा ज्या गोष्टीबद्दल समोरच्याला आपण चुकीचे वाटत असू, किंवा एखादा गैरसमज झाला असल्यास त्याबद्दल आपण शक्य तितक्या नम्रपणे बोलून त्या गोष्टी मांडायला हव्यात.
३. स्वतःला त्या माणसाच्या जागी ठेवून त्याला आपली वागणूक का चुकीची वाटली असावी याचा विचार करा. जेणेकरून त्याला समजावताना मदत होईल. याचबरोबर त्या माणसाला देखील आपल्या जागी उभं राहून एकदा विचार करण्याची विनंती करून पहा. त्याने त्या माणसाला आपली बाजूही पूर्णपणे कळू शकते.
४. जी गोष्ट किंवा जी वागणूक तुम्ही इतरांना समजावून किंवा पटवून देत असाल, त्याबद्दल तुम्हाला विश्वास असणं गरजेचं आहे. इतरांच्या चुकीच्या समजण्याने तुम्हाला जर तुम्ही चुकीचे वाटायला लागलात तर तुमचे मुद्दे पटवून देणं तुम्हाला जास्त अवघड होईल.
५.आपल्या गोष्टी , आपली मते शांत डोकं ठेवून , आवाज न चढवता, नम्रपणे आणि मुद्देसूद मांडता यायला हवीत. आपले पॉईंट कितीही योग्य असेल तरीही फक्त पटवून देण्याकरता फेरफार (manipulate) करणे हे टाळणं गरजेचं आहे.
६. आपल्या गोष्टी पटवून देण्याबरोबरच समोरच्या माणसाची मते, त्याच म्हणणं ऐकून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. समोरच्या माणसाचं बोलणं समजून घेण्यासाठी ऐकावं ना की, प्रत्युत्तर देण्यासाठी. तुम्ही समजून घेण्यासाठी ऐकलंत तर नक्कीच तुम्हाला तुमच्या गोष्टी त्यांना सिद्ध करताना मदत होईल. पण तुम्ही जर उत्तर देण्यासाठी ऐकत असाल तर त्याने शब्दाला शब्द वाढत जाऊन गोष्टी अजून चुकीच्या होण्याची शक्यता असते.
७. तुमच्या वागणुकीचं स्पष्टीकरण देताना नीट विचार करून उदाहरणे द्या. तुम्ही प्रत्येक गोष्ट बोलताना तुम्ही जेवढे ओपन माईंडेड आणि नम्र राहून तुमच्या गोष्टी मांडताल तेवढ्या आदराने आणि शांतीने लोक तुमचं म्हणणं ऐकून घेऊन त्यावर विचार करतील. आणि शेवटी तुमचं म्हणणं पटवून देण्यात तुम्ही यशस्वी ठराल.
८. तुम्ही केलेली गोष्ट किंवा तुमची वागणूक चुकीची आहे असं एखाद्याला वाटूही शकत, शेवटी ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा, अनुभवाचा देखील हा भाग असतो. त्यामुळे या गोष्टी फार मनाला न लावून घेता या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करा.
९. सगळं करून, समजावून जरी समोरच्याला ते ऐकायचं नाहीए, किंवा आपली बाजू समजून न घेता आपणच चुकीचे आहोत, आपलंच वागणं चुकीचं आहे असं समजायचं असल्यास तिथे आपण प्रॅक्टिकल विचार करून त्या गोष्टी आहे तिथे सोडून देण्यातच शहाणपण आहे. कारण सगळ्या बाजुंनी समजावून , सगळ्या शक्यता लक्षात घेऊन सुद्धा त्या माणसाला आपलंच वागणं चुकीचं वाटत असेल, तर कदाचित पुरावे दाखवून सुद्धा तो माणूस त्याचंच खरं करेल.
त्यामुळे अशा वेळी नादी लागण्यापेक्षा अशा गोष्टी शांत डोक्याने आहे तेथेच सोडून द्याव्यात. आपण आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न केल्या नंतर आपल्या हातात काहीच करायला उरत नाही. त्यामुळे जे हातात नाही त्यासाठी त्रास न करून घेतलेला बरा!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
