” तुमची अथांग मेहनत एक दिवस तुमच्या जगण्याला चार चांद लावल्याशिवाय राहात नाही.”
मधुश्री देशपांडे गानू
” अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.”
ही आणि अशा अनेक म्हणी आपल्याला यशाचा चेहरा दाखवतात. यश म्हणजे काय? ते सांगतात. पण अपयश ही यशाची पहिली पायरी असली तरीही जर आपण त्यातून काही शिकलो नाही तर यश कसे मिळणार?? यशस्वी होण्यासाठी लागणारी अथांग मेहनत, प्रामाणिक प्रयत्न, सचोटी, सातत्य या गोष्टींची जोड असली तरच यशाचं शिखर तुम्ही गाठू शकता. आणि तुमच्या जीवनाला हे लखलखीत यश चार चाँद लावतात.
जन्माला आलेला प्रत्येक जीव काही कर्म घेऊन येतो. प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या स्वभावानुसार, अनुभवानुसार, परिस्थितीनुसार ध्येय उद्दिष्ट ठरलेलं असतं. ते असायलाच हवं. नाहीतर प्राण्यांसारखे जगण्यात काय अर्थ आहे?? मूल जन्माला आलं की आई वडील त्याच्यावर योग्य संस्कार करतात. आपण सहज म्हणतो की “मुल म्हणजे मातीचा गोळा”. पण सगळीच माती सारखी नसते ना! प्रत्येकाची जडण-घडण वेगळी, दृष्टिकोन वेगळा, विचार-कृती वेगळी. आयुष्यात तुम्हांला एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही. शॉर्टकट घेतलात तर लवकर मिळणाऱे यशही शॉर्टकटने निघून जातं.
ससा आणि कासव यांची गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली असते. हळूहळू का होईना पण सातत्याने अथक प्रयत्नांनी आपण स्वतःची प्रगती करत राहिलो तर एक दिवस यश आपलंच आहे. आपल्याला नेमकं कोणतं क्षेत्र निवडायचे आहे इथेच आपण गोंधळून पडलेलो असतो. त्यामुळे मुळात मेहनतीचा प्रवासच काहींच्या बाबतीत उशिरा सुरू होतो. काहींना स्वत्वाची जाणीव खूप उशिरा होते. पण जेंव्हा त्यांना त्यांचा योग्य मार्ग सापडतो तेंव्हा मात्र यशाची दारं त्यांना खुली होतात. यासाठी प्रयत्नपूर्वक आपण काही गोष्टी करायला हव्यात. अनेक यशस्वी नामवंत व्यक्तींचे चरित्र वाचनात असायला हवे. त्यांच्या छोट्या-छोट्या सकारात्मक गोष्टी आपणही आत्मसात करायला हव्यात.
सतत नाविन्याचा ध्यास हवा. नवीन शिकण्याची आस, प्रयत्नही हवेतच. आम्ही ब्रह्मविद्या शिकत असताना आमच्या मॅडमनी आम्हांल एक गोष्ट सांगितली होती. एक व्यक्ती एका साधू महाराजांकडे जातो. आणि म्हणतो की, “मला तुमचा शिष्य करून घ्या.” साधु महाराज म्हणतात, “ठीक आहे. आधी आपण चहा घेऊया.’ त्यांनी त्या व्यक्तीला चहा ओतायला सांगितले. त्या व्यक्तीने कप भरून चहा ओतला आणि बशीतही सांडला. त्यावर साधू महाराज म्हणाले,” अरे, तुझा कप तर भरून वाहतोय. मग मी तुला आणखी काय शिकवणार?”
या गोष्टीचे तात्पर्य असे की, जरी तुम्हांला खूप काही येत असेल तरीही विद्यार्थ्या सारखं तुम्हीं सतत नवीन शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. मनाची पाटी कोरी करून नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्यात. मीच काय तो शहाणा! मला सगळं कळतं.. अशा भावनेने तुमची प्रगती थांबते.
एक उद्दिष्ट, एक ध्येय मग ती नोकरी असो, अगदी छोटासा व्यवसाय असो.. हे आपलं आपण ठरवायला हवं. खूप मोठी स्वप्नं, दिवास्वप्न नकोतच. यशाचं शिखर दिसत असताना संपूर्ण लक्ष फक्त पहिल्या पायरीवर हवं. यासाठी तारतम्याने वास्तवाचा विचार करणे, प्राधान्यक्रम ठरवणं, योग्य परिस्थितीत योग्य निर्णय घेणे, धोरण आणि दृष्टिकोन लवचिक ठेवणं, सतत reality checking या सगळ्या गुणांची अत्यंत आवश्यकता असते.
यासाठी सातत्य हवं. वाईट गोष्टींची सवय लागायला वेळ लागत नाही. पण चांगल्या गोष्टींची सवय मात्र सातत्याने प्रयत्न करूनच लावून घ्यायला हवी. प्रत्येकवेळी स्वानुभवातूनच शिकता येतं असं नाही. इतरांचे आपल्या नियोजित क्षेत्रातले भलेबुरे अनुभव आपले शिक्षक असतात. स्पंज सारखे सगळे टिपायची बुद्धीला सवय करायला हवी.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची कोणाशीही तुलना करायची नाही. स्वतःची तुलना स्वतःशीच करायची. एक पाऊल का होईना पण कालच्या पेक्षा आपण आज पुढे टाकलं हे महत्त्वाचं आहे.नेमकं आणि नीटस planning हवं. स्वयंशिस्त, स्वावलंबी ही.
खूपदा असे पाहण्यात येतं की माणसं खुप मेहनत करतात. अगदी चोवीस तास एखाद्या कामात तनमनाने झोकून देतात. पण त्यांना त्या मानाने यश मिळत नाही. मग ते नशिबाला, परिस्थितीला, माणसांना दोष देतात. खरं म्हणजे ते स्वतःच कुठेतरी कमी पडलेले असतात. सतत कोणाला तरी नावं ठेवण्याची अशा माणसांना सवय असते.
अशा नकारात्मक ऊर्जेमुळे ते स्वतः शंभर टक्के योगदान देऊ शकत नाही. आणि त्यांच्या यशातही उणीव राहते. पण हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे “डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर”. जर याची जोड तुम्हीं तुमच्या अथांग मेहनतीला दिलीत तर यश मिळणारच. अत्यंत सचोटीने, प्रामाणिकपणाने, योग्य मार्गाने, वेळ लागला तरी चालेल पण तुम्ही सकारात्मकतेने, एकाग्रतेने जर अथक प्रयत्न आणि मेहनत करत असाल तर एक दिवस तुम्ही यशस्वी होणारच. आणि हे खणखणीत यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. त्याचा सार्थ अभिमान काही वेगळेच तेज घेऊन येईल. आणि तुमच्या जगण्याला लखलखत्या तारकांचे चारचाँद लावल्याशिवाय राहणार नाही.
यासाठी सर्वांना अथांग शुभेच्छा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
