तुमचं आयुष्य एका जागी थांबू देऊ नका, त्याचा दुसऱ्यालाही त्रास होईल.
मेराज बागवान
आयुष्य’ म्हणजे एक प्रवास.सुख-दुःखांनी भरलेला.अनेक माणसांनी भरलेला आणि विविध घटनांनी रंगलेला. म्हणूनच आयुष्य हे रंगीबेरंगी आहे.कोणता एकच रंग, कोणती एकच घटना आयुष्यात कायम नसते.रोजचा दिवस नवीन असतो आणि आयुष्य देखील. मग एवढे सगळे असताना, केवळ कोणत्या एका गोष्टीमुळे , आपण आपले आयुष्य एका जागी का थांबवून ठेवायचे ? आणि जर का आपण असे करत आहोत, तर याचा त्रास आपल्याला तर होतोच , तसेच दुसऱ्याला देखील होत असतो.
आयुष्यात कधी कधी अशा घटना घडतात , ज्या आपल्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकतात.कोणा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, नातेसंबंध तुटणे, विश्वासाघात होणे, भांडण होणे, फसविले जाणे, प्रेमभंग होणे इत्यादी घटना आयुष्यात घडत असतात.काही जण अशा घटनांमधून तावून-सुलाखून निघतात , त्यातून धडा घेतात आणि पुढे चालत राहतात.पण काही जण असे असतात की , त्यातच त्यात गुरफटून जगत राहतात आणि स्वतःचे आयुष्य पुढे च घेऊन जात नाहीत.
कोणा अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, काही जण कायम त्याच दुःखात स्वतःला वाहून टाकतात.”ती व्यक्ती माझ्या आयुष्यात नाही मग माझ्या जगण्याला काय अर्थ आहे” असा काहीसा विचार ते करतात.पण याने काय होते, त्या व्यक्तीच्या सहवासातील जवळच्या लोकांकडे तिचे दुर्लक्ष होते.त्यांचाशी योग्य तो संवाद होत नाही.आणि मग हळूहळू जी जिवंत नाती आहेत ती देखील , जिवंतपणीच मरुन जाऊ लागतात. मग ह्या सगळ्याचा त्रास त्या इतर लोकांना होतो.
कोणी तरी व्यक्ती काही कारणांमुळे आपल्यापासून दूर झाली , किंवा त्या व्यक्तीला परिस्थितीमुळे कायमचे दूर जावे लागले , तर मग या गोष्टीचा त्रास स्वतःला करून घेणारे बरेच जण आहेत. “ती व्यक्ती मला का सोडून गेली,आता मी माझे संपूर्ण आयुष्य तिच्या आठवणीतच व्यतीत करणार”.असे विचार मनात आणून काही जण स्वतःचे आयुष्य थांबवून ठेवतात.
एखाद्याने आपल्याला फसविले, धोका दिला , आणि त्यामुळे जर नाते तुटले तर या गोष्टीचा सारखा तोच तोच विचार करत बसणारे देखील आपण पाहतो.”असे का झाले, माझ्याच बाबतीत का असे, मी सगळ्यांशी चांगले वागते, मदत करते, तरी देखील मलाच का सगळे असे भेटतात” असे बोलून बरेच जण स्वतःला त्याच त्या गोष्टीत अडकून ठेवतात.
पण असे सगळे करणे बरोबर नाही.यामुळे आपण आयुष्याचा पूर्णपणे आस्वाद घेऊ शकत नाही.मुक्तपणे जगू शकत नाही.शांतपणे जगणे, हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे.पण अशा सर्व घटनांमध्ये आपण जर का स्वतःला बांधून ठेवत असू , तर आपण चुकीच्या रस्त्यावर आयुष्याचा प्रवास करीत आहोत.स्वतःला तर आपण दरीत ढकलतोच , पण आपल्या ह्या वागण्याचा दुसऱ्यांना देखील त्रास होत असतो.ते आपल्याला दुःखात पाहू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा जीव आपल्यासाठी तुटत असतो.
काही जण आपल्या जवळच्या एखाद्या मित्र-मैत्रिणीजवळ सारखे घडून गेलेल्या वाईट गोष्टींविषयी बोलत राहतात,आणि तेच ते उगाळत बसतात.यामुळे काय होते , आपण फक्त भूतकाळात रमून जातो आणि वर्तमान विसरतो. आणि त्या मित्र-मैत्रिणीला देखील नकळत आपल्यामुळे मानसिक ताण येतो आणि त्यांचा वेळ देखील नको त्या ठिकाणी वाया जात असतो. जे घडून गेले ते घडून गेले, सारखे उगाळल्यामुळे परिस्थिती ही थोडीच बदलत असते. आपण फक्त मनाची समजूत घालत बसतो आणि नकळत सहानुभूती अपेक्षित करत असतो.जे आयुष्याच्या दृष्टीने योग्य नसते.
आयुष्य कधीच कोणासाठीच थांबत नाही.आपल्या आयुष्याची जबाबदारी सर्वस्वी आपली असते.कोणत्या एका घटनेमुळे, व्यक्तीमुळे ,गोष्टीमुळे आयुष्याला पूर्णविराम देऊन नाही चालत. त्यामुळे आयुष्य जसे येईल त्यानुसार स्वतःमध्ये योग्य ते बदल करून पुढे चालत राहणे गरजेचे असते. स्वतःचा आनंद कधीच दुसऱ्यावर सोपवू नका. हे तुमचे आयुष्य आहे, ते कसे जगायचे हे सर्वस्वी तुम्ही ठरविले पाहिजे.म्हणून तुमचे आयुष्य कधीच एकाच ठिकाणी थांबवू नका.आणि जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात अधोगती करीत आहात.
आयुष्यात कोणतीच गोष्ट ही कायमची नसते.मग हा थांबण्याचा ‘अट्टाहास’ कशासाठी? प्रत्येक दिवस हा नवीन असतो, रोज नवीन सूर्य उगवतो आणि संध्याकाळी मावळतो.असे का ? तर रोजचा नवीन दिवस , नवीन काही तरी आपल्यासाठी आणणार असतो.म्हणून भूतकाळात अडकून पडण्यापेक्षा , पूर्णपणे वर्तमानात जगले पाहिजे.
कोणी आपल्याशी बोलत नाही, स्वतःहून विचारपुस करीत नाही असा नकारात्मक विचार करण्याऐवजी, ‘प्रत्येकाला आपले आपले प्राधान्यक्रम असतात’ हे समजून घेतले तर स्वतःला आणि दुसऱ्याला देखील त्रास होत नाही.आणि आयुष्य सहजरित्या पुढे सरकत जाते.
काही जण आपल्या खूप जवळचे असतात.त्या व्यक्ती कायम आपल्या आयुष्यात असाव्यात असे आपल्याला वाटत असते.पण ज्या प्रकारच्या भावना आपल्या मनात आहेत, तशाच प्रकारच्या भावना त्यांच्या मनात आपल्या प्रति असतीलच असे नाही.त्यामुळे त्या व्यक्ती नेहमी आपल्या आयुष्यात असतीलच असा अट्टाहास सोडायला हवा आणि त्या व्यक्ती आपल्या आयुष्यातुन निघून जात असतील , किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यात आपल्याला स्थान द्यायचे नसेल तर आपण का त्यांच्यावर जबरदस्ती करावी. प्रत्येकाचे आपले असे प्राधान्यक्रम असतात.
एखादि व्यक्ती तुमच्यासाठी प्रथम प्राधान्यक्रम असू शकते, पण त्या व्यक्तीसाठी तुम्ही तिचा प्राधान्यक्रम असालच असे नाही. आणि मग ती व्यक्ती जरी आपल्या आयुष्यातून निघून गेली तरी आपण त्यांच्यासाठी का सतत झुरत बसायचे आणि आयुष्याला का ब्रेक द्यायचा ?
म्हणूनच तुमचं आयुष्य एका जागी थांबू देऊ नका.यामुळे तुम्हाला ही त्रास होणार नाही आणि तुमच्या जवळच्या लोकांना देखील नाही.आयुष्याचा प्रवास ‘एन्जॉय’ करीत जगा. ‘ऑल दी बेस्ट फॉर लाईफ’….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


