Skip to content

“तुटण्याचा अर्थ कायम संपणे असा होऊच शकत नाही…”

“तुटण्याचा अर्थ कायम संपणे असा होऊच शकत नाही…”


मधुश्री देशपांडे गानू


“ये जिंदगी है..

ईम्तिहान बहुत लेती हैं..

थक जायेगा अगर, तो थोड़ा-सा रुक कर

चल… फिर से चल…

चलते रहना ही मंजिल हैं तेरी……

माझ्या “मंजिल” या हिंदी कवितेतील काही ओळी आहेत या.. खरंच आहे. कधीकधी हे जीवन फारच परीक्षा बघतं माणसाची. अगदी सहनशक्तीचा अंत होईपर्यंत. तरीही माणूस एका दुर्दम्य इच्छाशक्तीने चालत राहतो. ठेचकाळतो, रक्तबंबाळ होतो पण थांबत नाही. जगण्याची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नाही. आणि हेच माणूसपणाचे लक्षण आहे.

आयुष्य खूप सुंदर आहे. जीवन एकदाच मिळतं. भरभरून जगा. हे लिहायला खूप सोप्पं आहे. पण आयुष्याच्या वाटचालीत, प्रवासात अचानक असे धक्के बसतात की त्या क्षणी सर्व काही संपलं, असंच वाटतं. प्रत्यक्षात दुःखाला सामोरे जाताना, कठीण प्रसंग निभावताना फार त्रासदायक, विदारक असतं.

एखाद्या स्त्रीवर अचानक अकाली पती गमावण्याचं दुःख पदरी येतं आता कोविड काळात तर हे प्रकर्षाने दिसत आहे. अशी स्त्री आतून तुटते. उन्मळून पडते. तिचा साथीदार आता कधी तिच्या सोबत असणार नाही हे वास्तव स्वीकारताना तिला मरणप्राय यातना होत असतात. तरीही ती कायम संपत नाही. तिच्या मुलाबाळांसाठी, घरातील ज्येष्ठ-कनिष्ठ सदस्यांसाठी ती कंबर कसून पुन्हा उभी राहते.

आता तर तिला सर्वच बाजू एकटीने सांभाळायच्या असतात. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, भावनिक… स्वतःला समर्थ, सक्षम, खंबीर बनवण्यावाचून तिच्याकडे पर्यायच नसतो. अशावेळी जर अविचार करून ती नैराश्यात गेली तर संपूर्ण घराला नैराश्य येऊ शकतं. क्वचित आपणही जीवन संपवावं असं ही एखाद्या कमकुवत मनाच्या स्त्रीला वाटू शकतं. पण या प्रसंगातून धीराने बाहेर पडून पूर्ण आयुष्याची घडी व्यवस्थित बसवणे यातच तर खरं कौशल्य आहे. ती संपत नाही तर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुन्हा अधिक सामर्थ्याने, ताकदीने उभी राहते.

आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी धावत असतो. प्रत्येकालाच आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक पातळीवर यश, अजून यश हवं असतं. त्यासाठी अथक प्रामाणिक प्रयत्नही करत असतो. करायलाच हवेत. पण नेहमी सगळं आपल्या मनासारखं नाही होत ना!! कधीतरी अपयश पदरी येतं. अगदी विद्यार्थीदशेत अपयश असो किंवा बढती बदली मध्ये अपयश असो, व्यवसायात तोटा असो, अशावेळी प्रत्येक जण आतून कुठेतरी तुटतोच. असहाय्य, अगतिक होतो. पण वास्तवाचा स्वीकार करून अपयश पचवून जो परत नव्या उमेदीने उभा राहतो तो खरा माणूस.

आज सोशल मीडियामुळे किंवा एकूणच जगण्याचा वेग वाढल्यामुळे प्रेमात सहज पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण प्रेमाचं नातं असो आणि अगदी कोणतंही नातं असो ते निभावण्यासाठी जी मानसिक ताकद लागते ती मात्र आज समाजात कमी पडत आहे. मग क्षुल्लक कारणावरून ब्रेकअप, लग्नानंतर लगेच पटत नाही म्हणून घटस्फोट यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कारण खरी जीवन मूल्यं आम्ही आत्मसात करतच नाही.

खोट्या, दिखाऊ, चकचकीत, वरवरच्या बडेजावाला आम्ही भुलतो. आणि वास्तव समोर आलं की त्याचा स्वीकार करता येत नाही. अशावेळीही खूप तुटल्यासारखं वाटतं. कौटुंबिक सामाजिक ताण असतोच. अशी प्रेमाची नाती तुटल्याने आत्मविश्वासही डगमगतो. पण यातूनही मनाची समजूत घालत पुन्हा नव्याने उभं राहावं लागतं. एक वाईट अनुभव आला म्हणजे नेहमीच वाईट अनुभव येईल असं नाही ना! परत नवीन समंजस जोडीदार मिळू शकतो. पुन्हा नव्याने नाती जोडतोच की आपण!

आयुष्य जगताना अशा अनेक पातळ्यांवर आपण तुटतो, मनाची, भावनांची पडझड होते. तरीही परत सगळे त्राण गोळा करून उभे राहतोच. अगदी पूरग्रस्त, शेतकरी, कष्टकरी.. किती नैसर्गिक आपत्तीतून, आर्थिक संकटातून जात असतात. पण पुन्हा प्रयत्न करतातच ना!

काळानुसार मनावर वर्मी बसलेले घाव ही भरतात. जाणीवा बोथट होतात. नवीन अनुभव, नवीन नाती मनाला सुखावतात. उद्याची आशा मनाला पल्लवित करत असते. काहीतरी तुटतं तिथे नवीन जन्माला येतं, पुन्हा सांधलं जातं. यालाच तर जीवन म्हणतात.

माणूस सगळ्याच चांगल्या वाईट अनुभवातून शिकत राहतो, पुढे जात राहतो. तुटण्याचा अर्थ कायम संपलं असा होऊच शकत नाही. जर तुम्ही या प्रसंगांकडे एक धडा, एक शिकवण म्हणून पाहिलं. शांतपणे, सारासार विवेकाने परिस्थिती हाताळली तर तुम्हीं एक माणूस म्हणून घडत राहता.

आयुष्य खरंच सुंदर आहे. प्रवाही आहे. एका तुटण्याच्या क्षणापाशी आपण  थांबू शकत नाही. संपू शकत नाही. तेव्हा कोणताही बांका प्रसंग आला तरीही त्यातून सावरून नव्या उमेदीने जीवनाला सामोरे जा. यश तुमचंच आहे….

क्या हुआ गर तूने ईम्तिहान लिया, ऐ जिंदगी….

क्या हुआ गर टूट कर बिखरा हूँ…

जर्रे जर्रे से मेरे फिर उभरने की ज़िद  अभी जिंदा है……


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on ““तुटण्याचा अर्थ कायम संपणे असा होऊच शकत नाही…””

  1. Anirudha Bankar

    खर्च खुप सुंदर लेख. खुपचं चांगलं काम करतात तुम्ही. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. दिर्घअयु लाभो

  2. श्रद्धा

    फार छान लेख आहे त्यामुळे प्रेरणा मिळाली नाते तुटल्यामुळे खचुन गेलेल्या मनाला धीर मिळाला
    छान लेख असतात मि नियमित वचते आणि बरेच जनना शेअर ही करते त्याना ही याची मदत होईल

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!