Skip to content

ती व्यक्ती तुमची किंमत कधीच करू शकत नाही ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असतात.

ती व्यक्ती तुमची किंमत कधीच करू शकत नाही ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असतात.


मेराज बागवान


आयुष्य जगत असताना अनेकजण तुम्हाला भेटतात. त्यातील काही जण तुमची मदत करतात.तुम्हाला ती तुमच्या अडचणीच्या वेळी कामी येतात.तसेच तुम्ही देखील त्यांना त्यांच्या अडचणीत मदत करतात , सहकार्य करतात.

पण यातील काही व्यक्तींसाठी तुम्ही नेहमीच उपलब्ध असतात.कारण त्या व्यक्ती तुमच्यासाठी खूप खास असतात.तुमच्या जीवनात त्यांचे स्थान अत्यंत महत्वाचे असते.घरातील व्यक्तींनंतर जणू त्याच व्यक्ती तुमच्यासाठी महत्वपूर्ण असतात.

म्हणूनच तुम्ही त्यांच्यासाठी कधीही काहीही मदत करायला किंवा त्यांच्या प्रत्येक गरजेला हजर असतात.हे सर्व जरी चांगले असले तरी देखील एक विचार तुम्ही कायम लक्षात ठेवला पाहिजे.तो म्हणजे : ‘ती व्यक्ती तुमची किंमत कधीच करू शकत नाही ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असतात.’

हे वाक्य कितीही कडू वाटले तरी अंतिम सत्य हेच असते.आणि तुम्ही याचा स्वीकार करणे देखील गरजेचे आहे.तुमची एखादी मैत्रीण आहे.ती अनेकवेळा अडचणीत असते.तुम्ही देखील तिची नेहमीच साथ देता. पण असेच बरेच वेळा होत राहिले तर हळूहळू नकळत का होईना ती व्यक्ती तुम्हाला गृहीत धरू लागते.

मग कदाचित तुम्ही इतर वेळी म्हणजे त्या व्यक्तीला तुमची जेव्हा गरज नसते तेव्हा जर का तिच्याशी बोलायला गेलात तर बरयाचवेळा असे होऊ शकते की , ती तुम्हाला तितकासा प्रतिसाद देऊ शकणार नाही.कारण तुम्ही तिच्यासाठी नेहमीच असतात.त्यामुळे तिला त्यात वेगळे असे काहीच वाटणार नाही.कारण ठरवून नाही पण स्वाभाविकपणे हे तिच्याकडून तुमच्याबाबतीत होणारच.

एखादी आणखीन कोणीतरी व्यक्ती आहे.जी तुमच्या अति-परिचयाची आहे. तिच्याशी तुम्ही नेहमीच स्वतःहून बोलतात.तब्येतीची चौकशी करतात.पण तुमची नेहमी पुढाकार घेतात की ,’मी तिच्याशी बोलले पाहिजे.कारण मला तिची काळजी वाटते वगैरे वगैरे’.पण रोजरोज बोलून एका क्षणी त्या व्यक्तीच्या नजरेत तुम्ही किंमत क्षुल्लक होऊन जाते.

आणि तुम्हाला वाटते, ‘अरे मी नाही बोललो तर त्याला वाटेल मी त्याला विसरलो’.आणि याच विचारातून तुमचा खटाटोप सुरू होतो,तो त्याच्या सहवासात राहण्याचा.पण होते उलटेच.ती व्यक्ती पूर्णपणे तुम्हाला वेळच देऊ शकत नाही.कारण ,’काहीही झाले तरी तुम्ही त्या व्यक्तीसाठी असणारच आहात , असे तिला वाटत असते’.आणि त्यामुळेच तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीशी बोलाल त्यावेळी ती व्यक्ती पूर्णपणे तुम्हाला वेळ देईलच असे नाही.

प्रत्येक नात्यामध्ये असे होईलच असे नाही.पण ही एक मानसिकता आहे.जी स्वाभाविक आहे किंबहुना नौसर्गिक आहे.तुम्हीच पाहा ना, आपल्याकडे घरी शेती असेल आणि भरपूर भाजीपाला पिकत असेल आणि त्यामुळे बाहेरून आणायची गरज पडत नसेल तेव्हा आपण सढळ हाताने भाज्यांचा वापर करतो.घरचेच आहे, घरचेच आहे असे म्हणत आपण त्याची किंमत कमी करतो.पण हेच जर का उलटे असेल, म्हणजे, आपल्याला बाजारात जाऊन भाजी विकत घेऊन मग ती घरी आणावी लागत असेल तर नक्कीच आपण ती विचारपूर्वक आणि व्यवस्थित वापरू.

असेच तर आहे ना मग , जी गोष्ट पटकन किंवा कधी कधी फुकट मिळते त्या गोष्टीची किंमत राहत नाही.

म्हणूनच आपण सर्वांनी ही मानसिकता स्वीकारली पाहिजे.कधी न कधी अशी परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येते.कधी तुम्ही त्या जागी असतात किंवा दुसरी व्यक्ती त्या जागी असते.ह्या मानसिकतेवर मी एकच सांगू इच्छिते की, तुम्ही इतरांच्या कामी जरूर या पण त्या बदल्यात कोणती म्हणजे कोणतीच अपेक्षा ठेवू नका.जवळची व्यक्ती आहे म्हणून प्रत्येकवेळी तुम्ही मदत केलीच पाहिजे असे नसते.तुम्ही सदैव इतर व्यक्तीसाठी उपलबद्ध आहात याचा अर्थ असा नाही की , तुम्हाला कोणतीच समस्या नाही.

म्हणून कोण्या एका वेळी तुमच्या अडचणीमुळे जर तुम्ही त्या व्यक्तीला मदत करु शकत नसाल तर स्पष्टपणे तसे त्या व्यक्तीला तुम्ही सांगितले पाहिजे.आणि जर का तुम्हाला काहीही झाले तरी त्या व्यक्तीसाठी उभेच राहायचे आहे तर मात्र मग तुम्ही विनाअपेक्षा मदत केली पाहिजे आणि भविष्यात ती व्यक्ती तुम्हाला वाटेल तेव्हा तुमच्याशी बोलेलच हा अट्टहास सोडला पाहिजे.आणि हेच शहाण्या माणसाचे लक्षण आहे.समजूतदारपणाचे लक्षण आहे.

ते म्हणतात ना, ‘कर्म करीत राहा मात्र फळाची अपेक्षा करू नका’.अगदी तसेच काहीसे आहे. भावभावना हे माणूसपणाचे लक्षण आहे.पण आजकालचे जग हे भावनांचा देखील बाजार करू पाहत आहे.घरात देखील दोन व्यक्तींमध्ये ‘व्यावहारीकता’ आली आहे. मग बाहेरच्या जगाचे तर विचारूच नका.म्हणूनच एक गोष्ट सांगावीशी वाटते.’तुम्ही एखाद्यासाठी सदैव उपलब्ध असतात ही खूप चांगली गोष्ट आहे.खरे तर एक माणूस म्हणून विधात्याने प्रत्येक माणसाकडून हेच अपेक्षिले आहे. पण हे सर्व करीत असताना ‘लक्ष्मणरेखा’ पाळता आली पाहिजे.कारण कोणतीही गोष्ट अति झाली की त्या गोष्टीला काही अर्थच उरत नाही.

व्यक्ती तितक्या प्रकृती.जर नात्याचे बंधन दोन्ही बाजूंनी घट्ट असेल तर कितीही काहीही झाले तरी ते तुटणार नाही.पण नेहमी एकच व्यक्ती बंध धरून ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल तर मात्र त्या व्यक्तीची किंमत राहणार नाही.समोरची व्यक्ती हे मुद्दाम करेल असे नाही किंबहुना कदाचित त्या व्यक्तीच्या हे लक्षात देखील येणार नाही.पण हे ‘सहज उपलबद्ध झाल्यामुळे आपसूकच होणार हे मात्र नक्की’.

सत्य स्वीकारा आणि पुढे चालत राहा.

धन्यवाद!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “ती व्यक्ती तुमची किंमत कधीच करू शकत नाही ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असतात.”

  1. आयुष्य बदलून टाकेल असा लेख आहे madom
    असेच लेख आपण भविष्यात टाकत राहावेत अशी विनंती करतो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!