Skip to content

तात्पुरत्या फायद्यासाठी चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू नका.

तात्पुरत्या फायद्यासाठी चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू नका.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


“सत्याच्या वाटेवर चालताना एकटे पडलात तरी चालेल पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू नका.” हा विचार तुमच्या माझ्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. आणि कित्येकांना तर हा विचार पटण्यासारखा आहे. या विचाराच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे इथे बरेच आहेत.पण हाच विचार खोडून काढणारेही कमी नाहीत.

आयुष्यात अनेकदा आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या लोकांना पाहतो.त्यांची मानसिकता किंवा अनेक गोष्टींच निरीक्षण करण्याची माणसाला सवय असते.तर तुम्ही असा अनुभव नक्की घेतला असेल की एखादी व्यक्ती तात्पुरत्या फायद्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टींचे समर्थन करताना निदर्शनास आलं असेलच. पण हे असं एखाद्या फायद्यासाठी चुकीच्या गोष्टींच समर्थन करणं कितीसं योग्य आहे…? तुम्हाला तरी पटतेय का ही गोष्ट…?

केवळ आजुबाजूलाच नाही तर आपण आपल्या घरातही ही गोष्ट अनुभवतो. आपल्या घरातही असेच प्रकार घडताना दिसतात.आपणही कित्येकदा असच वागतो. काही गोष्टी मुळातच चुकीच्या असतात पण आपण मात्र तात्पुरत्या फायद्यासाठी त्याला पाठिंबा द्यायला मागेपुढे पहात नाही.त्याचे परिणाम काय नी कसे होतील हा विचारही आपण त्यावेळी करत नाही.

पण नंतर मात्र त्याच चुकीच्या विचाराला पाठिंबा दिला , त्या गोष्टीच समर्थन केलं याचा पश्चाताप आपल्याला होत राहतो. आपण का अशा गोष्टीच समर्थन केलं…? मी का असा बेअक्कलपणा केला….? तरी मला ती सांगत होती अशा गोष्टींना पाठिंबा देऊ नका.त्या चुकीचं गोष्टींच समर्थन करू नका.वगैरे वगैरे विचार आपल्या मनाला केव्हा घेरतात कळतही नाही.

पण हे सगळं केव्हा सुचतं तर सगळं घडून गेल्यावर आपल्याला सुचत रहातं.म्हणून खरच कधी अशा चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देणं , त्यांच समर्थन करणं टाळायचा प्रयत्न करा.

कसय नं…काही माणसांना अगदी कोणत्याही गोष्टींच समर्थन करण्याची सवय असते. अगदी कोणत्याही……

खोकला…आता खोकला हा वेगवेगळ्या कारणांमुळे येतो हे मान्य आहे. पण त्यालाही काही मर्यादा आहेत नं…? एखाद्याला खरच खोकल्याचा त्रास असतो.पण अनेकदा तोच माणूस ते मान्य करायला तयार नसतो.अनेकदा तो सांगतो की नाही , आत्ता ते धूळ होती नं म्हणून ठसका आला , नाही ते फोडणी दिली नं , आणि खिडक्या बंद आहेत नं , त्या वासाने असं झालं तसं झालं , पंखा बंद होता नं…

वगैरे वगैरे कारणं देऊन आत्ता फक्त ठसकाच लागलय असं ते म्हणतात पण आपल्याला खोकल्याचा त्रास आहे हे मान्य करायला तयार होत नाही. आणि अशा याच गोष्टीला पाठिंबा देणारे घरात कितीतरी जण असतात. पण हे दिसतय किती चुकीच आहे. आपण तेवढ्यापुरतं त्या व्यक्तीसाठी म्हणून त्या व्यक्तीच्या हो मध्ये हो मिसळवतो. पण त्याने वस्तुस्थिती बदलणार असते का…? खोकला आहे तर तो मान्य करून त्यावर उपचार घेणं “must” आहे की उगाचच प्रत्येकवेळी अशी कारणं देऊन गाडी पुढे ढकलणं चांगल आहे हे त्या चुकीच्या गोष्टींच समर्थन करणाऱ्या व्यक्तीला समजायला पाहिजे. आपलं कुठे काय चुकत आहे हे लक्षात घ्यायला हवं.

आता हे झालं फक्त खोकल्याच उदाहरण…

अनेक लोकांना आपला स्वतःचा फायदा कशात आहे एवढच बघायच असतं. जिथे फायदा होईल तिथे सतत कसं वावरता येईल हाच विचार त्यांच्या मनात घोळत असतो.म्हणजे एखादा माणूस काही चूकीच सांगत असेन पण त्यात जर आपला फायदा असेल तर त्याच माणसच समर्थन करायला आपण तयार होतो.आणि इतकच नाही आपल काम झालं की पुन्हा त्याच व्यक्तीला दोष द्यायला आपण कमी करत नाहीत.म्हणजे किती तो स्वार्थीपणा….!

अंधश्रद्धा , चुकीचं अध्यात्म, किंवा चुकीच ज्ञान अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टींच आपण तात्पुरत्या फायद्यासाठी समर्थन करतो. पण हे अत्यंत चुकीच आहे.अशा चुकीच्या गोष्टींच आपणच समर्थन करत राहिलो तर या चुकीच्या गोष्टी नेहमीच चुकीच्या मार्गावर चालत राहतील.त्या चुकीच्या गोष्टी कधीच बरोबर होणार नाहीत.त्यामुळे असं तात्पुरत्या फायद्यासाठी उगाचच कोणत्याही चुकीच्या गोष्टींच समर्थन करू नका आणि इतरांनाही तसं करू देऊ नका. नाहीतर नंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही आपल्या हातात उरणार नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!