तणावात राहण्याचे अनेक तोटे आहेत, पण या लेखात काही फायदे वाचूयात.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
आजकाल ‘ताण-तणाव कमी करायला हे करा’, ‘स्ट्रेस टाळायचे उपाय’, ‘ताणविरहित जीवन’ असे शब्द वारंवार कानावर पडत असतात. ताणामुळे शांत जीवन, सुखी जीवन जगणंच अवघड वाटायला लागतं. दिवसेंदिवस धकाधकीच्या होत जाणाऱ्या जीवनात असं होणं साहजिक आहे. आणि ताणापासून मुक्ती मिळवू पाहणारे आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधात राहतो. पण योग्य प्रमाणात ताण असेल तर त्याचे फायदेही असतात., याचा आपण कधी विचार केलाय का बरं? कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात जेव्हा असते तेव्हा तिचा उपयोगच होत असतो.
अगदी मग तो स्ट्रेस किंवा ताण-तणाव असला तरीही. पण कोणतीही गोष्ट जेव्हा प्रमाणाबाहेर जाते किंवा अति होते तेव्हा तिचे तोटे ही आपल्याला पाहायला मिळतात. मग अगदी चांगल्या गोष्टीदेखील अति झाल्यावर त्यांचे तोटे असतात.
कोणतंही संकट आपल्यासमोर आलं की आपल्यापुढे दोन पर्याय असतात. एकतर त्या संकटांशी लढणं, किंवा आपल्याच फायद्यासाठी तात्पुरती माघार घेत पलायन करणं. म्हणजे जंगलात वाघ समोर आल्यावर त्याच्याशी रिकाम्या हातांनी मारामारी करणं हा निश्चितच चांगला पर्याय ठरणार नाही. त्यावेळी पोबारा केलेलाच बरा!
पण आपल्यासमोर संकट आलं आहे हे तरी आपल्या मनात ‘रजिस्टर’ व्हायला हवं ना! संकटाची जाणीवच झाली नाही तर त्यापुढची पावलं आपण उचलणार तरी कशी? म्हणजेच अजिबातच ताण, तणाव, टेन्शन किंवा स्ट्रेस काहीही म्हणा हे कधीच आलं नाही तर काय होईल? गोष्टी वेळेत पूर्ण होणं तर सोडाच पण आपण किती भयानक प्रसंगांत अडकू शकतो याचा अंदाज ही लावता येणार नाही.योग्य प्रमाणात असलेला ताण अशा वेळी महत्त्वाचा ठरतो. ताणाचे काही फायदे आपण पाहुयात-
१.जसं की परीक्षा जवळ यायला लागली की विद्यार्थ्यांना टेन्शन येतं, आणि त्याच टेन्शनमुळे ते अभ्यास करू लागतात. अभ्यास जसं-जसा होत जातो तसं-तसा ताण देखील कमी होऊ लागतो, म्हणजेच टेन्शन किंवा तणाव इथे एक प्रकारे मोटिवेशन देण्याचंच काम करतात. आणि पास होण्यासाठी किंवा चांगले मार्क्स मिळवण्यासाठी या तणावरूपी मोटिवेशनची आपल्याला गरजच असते.
योग्य प्रमाणात ताण असला तर आपल्याला परिस्थितीचा योग्य अंदाज घेणं शक्य होतं. यावेळी समोरच्या संकटावर लक्ष केंद्रित करण सोपं जातं. आपलं लक्ष केंद्रित होण्याकरता उपयुक्त अशा रसायनांच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा वेग आपल्या मेंदूमध्ये यावेळी वाढतो.
२. योग्य प्रमाणात आणि ‘मॅनेजेबल’ ताण असला की त्याचा आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही चांगला परिणाम होतो. आपल्यासमोर एखादं संकट किंवा परिस्थिती उभी येऊन ठाकल्यावर आपलं शरीर लढण्याच्या ‘मोड’ मध्ये जातं. अशा वेळी आपली रोगप्रतिकारक शक्तीही तात्पुरती का होईना पण आणखी सक्षम होते.
३. ताणाखाली राहून त्याचा चांगला मुकाबला केल्याने आपलं शरीर आणि मन या दोहोंना त्याचा फायदा होतो. कधी-कधी त्या संकटात यशस्वी होतो की नाही यापेक्षा त्या ताणाने आलेल्या मोटिवेशनने आपण ज्याप्रकारे लढा देतो त्यानेच खूप समाधान वाटतं, मनाची शक्ती वाढते, आणि आत्मविश्वासही वाढतो.
४. ऑफिसमध्ये एखादी डेडलाईन जवळ येत असेल तर त्यावेळी आपल्या मनात काय भावना असतात हे आठवा. आणि आपण त्या निगेटिव्ह भावनांवर मात करत ती डेडलाईन गाठली की मनात भरून राहिलेलं समाधान आठवा. ताणाशी योग्य प्रकारे झुंजायची सवय आपल्याला हितकारकच ठरते.
५. ताणामुळे आपली क्रिएटिव्हिटीही वाढू शकते. प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपण इतरांना न सुचलेला एखादा नवा मार्ग शोधून काढतो आणि त्यामुळे त्या समस्येवरचा एक नवीन उपाय मिळतो. आणि नवीन उपायांसोबतच नवीन रिझल्ट देखील पाहावयास मिळतात.
६. ताण असलेला फायद्याचं ठरत हे तर आपल्याला आव्हान समजलंच असेल, पण तो ताण आपल्यामुळे वाढू नये या गोष्टीची दक्षता घेणं काही वेळा आपल्या हाती असतं. जस की, कामं पुढे ढकलली असता त्यांचा ताण ही वाढतो, त्यामुळे वेळेत कामं उरकून ताण न वाढवणं कधीही चांगलंच.
ताण ‘योग्य प्रमाणात’ असेल तरच तो फायदेशीर असतो. प्रत्येकाची ताण सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्यावर असलेल्या ताणाचं योग्य नियमन करणं महत्त्वाचं ठरतं. आणि जर आपल्या सहन करण्याच्या मर्यादेपलीकडे ताण जाणवत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणंही अतिशय निकडीचं ठरतं.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

आजकालच्या तणावपूर्ण वातावरणात अतिशय उपयोगी आहे.