तडजोड न करणाऱ्या व्यक्ती कोणाशीही जोडल्या जात नाही..
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
आयुष्यात कशाची तडजोड करत नाही आपण…??स्वप्नांची , विचारांची , वागण्याची अगदी छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला तडजोड करावी लागते. प्रोफेशनल म्हणू नका किंवा पर्सनल…एकूणच आपल्याला संपूर्ण आयुष्यात तडजोड ही करावीच लागते. तडजोड……!!
तडजोडीशिवाय आपलं हे आयुष्य अपूर्ण आणि जगणं अशक्य आहे. कारण आयुष्य आलं म्हणजे तडजोड आलीच.आणि तडजोड करणं प्रत्येकालाच जमतं असं नाही.तडजोड करणारी माणसं ही खूप कमी प्रमाणात पहायला मिळतात.काहींना तर तडजोड म्हणजे नेमकं काय वाटतं माहीत नाही.तडजोड शब्द ऐकला तरी त्यांची नाकं मुरडतात.
आयुष्यात यांना कधीच तडजोड करायची नसते.नेहमी मी म्हणेल तेच किंवा तसच. ह्या गोष्टीला ते अगदी घट्ट धरून ठेवतात.समोरच्याला ते काही दाद द्यायला तयारच नसतात. कणभर तडजोड करायची झाली तरी त्यांच्या अगदी जीवावर येतं.नाही म्हणजे नाही. मला तडजोड करता येत नाही. आणि मला तडजोड करायला आवडतही नाही. त्यामुळे मी काही तडजोड करणार नाही. असं अगदी बिंधास्तपणे सांगणाऱ्या काही व्यक्ती आपण आपल्या आयुष्यात अनेकदा पाहतो.किंवा तशा व्यक्ती आपल्या आयुष्यात असतातही.
आणि अशा व्यक्तींशी जुळवून घेणं म्हणजे बुद्धी आणि मनाची शक्य होईल तितकी ताकद लावण्यासारखच आहे. यांच्याशी जुळवून घेणं फार अवघड असतं. कधीच तडजोड करायची नाही…. याला काय अर्थ आहे यार……!! आयुष्यात सगळच काही स्वतःच्या मनासारख होईल असं नाही ना..??कधी आपल्या तर कधी समोरच्याच्या मनासारख होत असतं.त्यामुळे तडजोड करणं खूप महत्त्वाचं असतं.
आणि ते प्रत्येकाला जमायला हवं.कारण अशा तडजोड न करणाऱ्या व्यक्तींशी सहसा कुणाचच फारसं पटत नाही.कारण एखादी व्यक्ती सारख सारख कितीदा अशी तडजोड करणार…..?? दोन्ही व्यक्तींनी कधी ना कधी तडजोड करणं गरजेच असतं. तरच गोष्टी टिकतात. आणि पुढे जातात.
एकाच गोष्टीवर अडून राहून चालत नाही. आणि तुम्ही असं एकाच गोष्टीवर अडून राहिलात तर तुमच्या मनासारख काही होणारच नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला शिका. आयुष्यात कुठेतरी तडजोड ही करावी लागते हे बहुधा ही तडजोड न करणारी माणसं विसरत असावी किंवा त्यांना ते समजूनच घेता येत नसावं.तडजोड नाही केली तर अनेकदा गोष्टी अर्धवट राहतात. गोष्टी तुटतात. किंवा कायमच्या संपतात. सामंजस्याने काही तडजोड करणारी माणसं असतातही.
पण नेहमीच त्याच माणसांनी तडजोड करणं कितपत योग्य आहे…??समोरचा करतोय ना तडजोड मग आपल्याला काय….आपण आपल्याला हवं ते करू शकतो.असे म्हणणारे काही कमी नाहीत. ते सवयीचे गुलामच होतात.तुम्ही तडजोड करताय नं…मग झालं…..अशा वृत्तीची माणसं आपण अनुभवतच असतो.पण तडजोड करणाऱ्याने समोरच्याला किती काळ असं झेलायच…??
एखादी व्यक्ती गोष्टी सुरळीत होण्यासाठी मोठ्या मनाने स्वतःचा विचार न करता अगदी हसत हसत तडजोड करते.पण तीच तडजोड न करणारी व्यक्ती मी कधीच कुठलीही तडजोड करत नसतो या रूबाबात वागत असतात. पण अशा लोकांशी , त्यांच्या या वागण्याने फार काळ कोणीच जोडलं जात नाही.लोकं शक्य तितकं लांब रहाता येईल तितक लांब रहायचा प्रयत्न करतात.
आज तु तडजोड करतोय …..तर उद्या मीही तडजोड करेन….किंवा मीही तडजोड करण्याचा प्रयत्न करेन. अशी वृत्ती दिसणं कठीणच…!! कुठेतरी कधीतरी तडजोड करावी लागते.हे ज्यांना समजत नाही. त्यांच्या आयुष्याची गाडी काही पुढे सरकत नाही.कारण कुठेच तडजोड करायची नाही म्हणजे गोष्टी कुठेतरी अडकणार… आणि वादंगाला नवी संधीच याने मिळते.त्यामुळे अशा व्यक्ती कोणाशीही जोडल्या जात नाही.
त्यामुळे लक्षात ठेवा.. , आयुष्य आहे. तडजोड तर करावी लागणारच. आणि मुळात कुठे तडजोड करायची आणि कुठे नाही हे ज्याचं त्याने व्यवस्थित समजून घेतल पाहिजे.
आणि तडजोड न करणाऱ्यांनो….एक लक्षात ठेवा. तडजोड करणं दोघांसाठी गरजेचं असतं. त्यात काही कमीपणा नसतो.तडजोड केली तर आयुष्य पुढे सरकत राहील. एकमेकांना तुम्ही बांधून रहाल.अन्यथा….. तुम्ही इतरांशी जोडले जाणं अशक्य आहे. त्यामुळे थोडी का होईना तडजोड करायला शिका.तडजोडीशिवाय खरं जगणं काय असतं ते समजणार नाही…..!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


