डिप्रेशनची व्यक्ती विनाउपचार घरी राहत असेल तर पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
वृषाली बनसोडे
डिप्रेशन हा शब्द आपण नेहमी ऐकत असतो.अगदी लहान मुलांच्या तोंडी देखील हा शब्द ऐकायला मिळतो. आशा ( नाव बदलले आहे) २९ वर्षांची, तिला एक ८ वर्षांची मुलगी. अचानक तिच्या नवर्याने तिला माहेरी आणून सोडले. कारण विचारल्यावर कळाले की ती हल्ली विचित्र वागायला लागली आहे मध्येच हसते, मध्येच रडते, जीव देण्याचा देखील प्रयत्न केला होता तिने एक दोन वेळा. आणि मिस्टरांना कामानिमित्त बाहेर जावे लागते त्यावेळी तिने जीवाचे बरेवाईट केले तर… म्हणून तिला माहेरी आणून सोडले होते.
आशा माहेरीही तशीच करायला लागली होती, सारखी उगाचच हसायची,शेतातल्या विहिरीजवळ जावून विहिरीत पाय सोडून बसायची. हे तिचं वागणं जवळ राहणाऱ्यांनाही एक दोन वेळा खटकलं होतं. त्यांनी तसं तिच्या आईला कळवलं देखील होतं.त्यामुळे बिचार्या आईला कामावरही जाता येत नव्हते. आईने एकदिवस मोठा उतारा करून तिच्यावरून टाकला. काही दिवसांनी ती झोपलेली पाहून आई दार लोटून काहीतरी आणायला दुकानात गेली. ती संधी साधून आशाने विहीरीकडे धाव घेतली, आणि पाण्यात उडी मारली ४-५ तासांनी तिचा मृतदेह पाण्यावर तरंगायला लागला तेव्हा सगळीकडे गाजावाजा झाला.
सगळे म्हणतात तिला बाहेरचं लागलं होतं… पण हे खरं नव्हतं. तिच्या वागण्याची सगळी लक्षण डिप्रेशन मध्ये असलेल्या व्यक्तीसारखी वाटत होती.
आशाला वेळीच समुपदेशकांकडे नेले असते तर आशा आज आपल्यात असती….
म्हणून अशी व्यक्ती घरात असणे फार घातक ठरू शकते.
डिप्रेशनमुळे मानसिकच नाही तर शारीरिक नुकसान देखील होऊ शकते. याची लक्षणे प्रत्येक वयात ल्या डिप्रेशनच्या व्यक्ती मध्ये पहायला मिळतात. ती वयपरत्वे वेगवेगळी असू शकतात.
परंतु नैराश्याच्या गर्तेत अडकलेला प्रत्येक व्यक्ती स्वतः ला एकटा समजतो. एका सर्वेक्षणानुसार जगभरात सुमारे २६ कोटी लोक डिप्रेशन मध्ये जगत असल्याचे समोर आले आहे.
नैराश्येत जगण्याची अनेक कारणे असू शकतात. असे की_
१) बालपण
२) मेंदूची रचना
३) जवळपासच्या व्यक्तीचा मृत्यू
४) नोकरीच्या समस्या
५) नात्यातल्या समस्या
६) योग्य गोष्टींचा अभाव
७) इतर
लक्षणे
१) लहान लहान गोष्टींवरून राग येणे-घरात अशी व्यक्ती असेल तर सतत काहीना काही कारणावरून खटके उडत राहतात, डिप्रेशन मध्ये असणाऱ्या व्यक्तीला समजावणे अवघड असते.
२) दु:खी असल्याची जाणीव होत नाही. – आपण दु:खी झालो की रडतो, पण अशा व्यक्ती दुख:तही हसतात किंवा दातखीळी बसल्यासारखे वागतात यांना बोलते करणे कुटुंबातील सदस्यांना अवघड जाते.गैरसमज होण्याची शक्यता असते.
३) जवळच्या लोकांपासून दूर राहणे- स्वत:ला इतरांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे कुठेही न्यायची किंवा घरात एकट्याला ठेवायची भीती वाटते.एकटे काय विचार करत असतील किंवा त्यांच्या डोक्यात काय विचार चालू आहे त्या काय करतील याचा अंदाज येत नाही.सतत एक व्यक्ती यांच्या मागे अडकून पडतो.
४) एकाकी समजणे – ह्या व्यक्ती स्वत:ला एकट्या समजतात. कोणावरही विश्वास दाखवत नाहीत, काही खायला प्यायला दिले तरी त्यांना यात काही टाकलं नसेल ना अशी शंका घेतात. पटकन कोणावर विश्वास ठेवत नाहीत त्यामुळे तब्येत खालावली जाते.
५) जास्तीवेळ झोपणं किंवा झोप न लागणे – जास्त वेळ झोप लागत असेल तर कायम भीती वाटत राहते, झोपेत काही झाले तर. आणि तब्येतीवर देखील त्याचा परिणाम होतो आणि झोप लागत नसेल तर डोळ्यांवर ताण येतो. डोळ्याभोवती काळी वर्तुळे होतात अशक्तपणा जाणवतो. शरिर खंगत जाते.घरातील लोकांना याची काळजी वाटायला लागते
६) भूक न लागणे – या व्यक्तींना भुकेची जाणीव होत नाही. किंवा जेवणाकडे लक्ष नसते.दिवसभर जेवण केले नाही तरीही चालते त्यामुळे पित्त, जळजळ, चक्कर येणे हे प्रकार जाणवतात.
७) कोणाशीही बोलण्याची इच्छा न होणे – एखादी व्यक्ती समोरून बोलत असली तरी ह्या व्यक्ती काहीच रिसपाॅन्स देत नाही. किंवा काय चालले आहे याचा काही अंदाज येत नाही.
८) डोक्यात वाईट साईट विचार येणे – सतत विचार करत असल्याने काय विचार करतील याचा अंदाज करता येत नाही.कधी घरातून निघून जाणे, उंचावर जाणे, पाण्याच्या दिशेने जाणे, आगीशी खेळणे असे प्रकार नकळतपणे विचारात चालू असतात. त्यांना स्वत:लाच त्याचा अंदाज नसतो. सतत त्यांना भानावर आणावे लागते.त्यामुळे घरातील व्यक्तींना सतत सजग रहावे लागते.
९) भीती वाटणे – ह्या व्यक्ती सतत भीती बाळगून असतात कोणावरही संशय घेतात, सतत कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवत आहे असे त्यांना वाटते.
१०) कारण नसताना रडू येणे – ज्या व्यक्ती काहीतरी घटनेने त्रस्त असतात त्या ती घटना सतत आठवून रडत असतात, रडण्याचे कारण ही त्यांना सांगता येत नाही.
११) अशक्तपणा जाणवणे – जेवण कमी झाल्याने अशक्तपणा जाणवतो.
१२) सतत डोकेदुखीची समस्या – सतत विचार केल्याने, झोप अर्धवट झाल्याने डोकेदुखी जाणवते.
१३) ह्रदयाची धडपड वाढणे – मला काही तरी होत आहे, किंवा काही वाईट होईल या भीतीने हृदयाची धडधड सतत वाढत असते.
१४) अंगाला घाम सुटणे – भीती, काळजी, चिंता यामुळे बी. पी. वाढून सतत घाम येतो किंवा अचानक थंडी वाजून येते.
उपाय
१) वेळेवर जेवण करा
२) वेळेवर झोप घ्या
३) दररोज व्यायाम करा
४) स्वतः वर विश्वास ठेवा
५) वेळोवेळी व्यक्त व्हा
६) जास्त विचार करू नका
७) कुटुंबासोबत वेळ घालवा
८) सकारात्मक विचार करा
एकंदरीत स्वतः ला सकारात्मक ठेवून सतत कामात व्यस्त रहा वेळ प्रसंगी तज्ञांचा सल्ला घ्या.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Its 100% True.