टोचणारी सुई लक्षात राहते पण आयुष्यभर जोडणारा धागा दिसत नाही.
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
सुई असेल तर फाटलेले कपडे आपण शिवू शकतो.पण केवळ सुई असून चालत नाही. सुईत धागाच नसेल तर कपडे शिवून होणार नाहीत. काही उसलं तर आपण सुई सुई करत असतो.पण इथेही कपड्याला एकसंध करणारा धागा मात्र आपण सहज विसरून जातो.
‘टोचणारी सुई लक्षात राहते पण आयुष्यभर जोडणारा धागा दिसत नाही…’ हे वाक्य आपण कितीदा ऐकलय. आणि कदाचित हे सगळ्यांना पटतय सुद्धा. आयुष्यही अगदी असच आहे.टोचणारी गोष्ट लक्षात राहते आणि जोडणारी गोष्ट मात्र आपण सहज विसरून जातो. सुई-धागा तर फक्त एक उदाहरण आहे.पण आपल्या आयुष्यात आपण या सुई-धाग्यासारखच वागत असतो.कुणी सुई तर कुणी धागा बनून आपल्या आयुष्यात येतं.पण लक्षात राहते ती मात्र टोचणारी सुई.कितीही नाजूक असली तरी टोचताना अशी टोचते की जखम झाल्याशिवाय राहत नाही. टोचणारी सुई जशी लक्षात राहते तसच जोडणारा धागा का आपल्या लक्षात राहत नाही. फक्त सुईच दिसते.तो जोडणारा धागा दिसत नाही का आपल्याला…??मनामनाला जोडणारा धागाच आपण क्षणात विसरून जातो. पण त्या सुईच किती ते कौतुक…!!
आपल्याला कुणी टोचून बोललं तर ते अगदी डोक्यात नी मनात जेव्हा बघाल तेव्हा ताजंतवानं असतं.सहजासहजी आपण ते अजिबात विसरत नाही. पण प्रेमानं बोललेलं सगळ क्षणात विरघळून जातं.आयुष्याच्या वाटेवर चालताना वाटेत इतक्या ठेचा लागतात की त्या आयुष्यभर लक्षात राहतात. का तर त्या काट्यांनी-निष्ठूर दगडांनी मन ठेचकाळलेलं असतं.पण तनामनात रूंजी घालून गेलेली सुखाची हिरवळ मात्र आपल्या लक्षात येत नाही. गुलाबाच्या बाबतीतही आपण तेच करतो . त्याला काटे असतात असं म्हणत म्हणत त्याला मखमली मऊशार पाकळ्याही असतात हे आपण विसरून जातो.
सतत टोचणाऱ्या सुईला आळविणारे आपण जोडणाऱ्या धाग्याला साधी साद सुद्धा घालत नाही. एखादी गोष्ट टोचते,मनाला सलते म्हणून आपण सारखा तिचाच विचार करत असतो.पण मनामनांना , मनातील हळव्या भावबंधांना जोडणारा प्रेमाचा धागा मात्र कुणाच्या लक्षातही येत नाही. आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी ह्या सुई-धाग्यासारख्याच आहेत.काही टचकन टोचणाऱ्या तर काही एकत्र बांधून ठेवणाऱ्या.सुई टोकदार असते.क्षणात टोचते तशाच अगदी आयुष्यातल्या जखमा या टोकदार असतात. त्यांचा घाव इतका खोल असतो की त्या सहज लक्षात राहतात.पण मायेच्या तरल स्पर्शाचा धागा मात्र एकटाच पडतो.त्याच्याकडे कुणाचच लक्ष नसतं.
एक सहज साध सोपं सांगायच झालं तर शाळेत असताना शिक्षकांनी छडी मारली तर ते इतकं लागायच की डोळ्यातून टचकन पाणी खाली यायचं. बाईंनी मारलं एवढच लक्षात राहायचं पण का मारलं ??हे आपल्या लक्षात येत नाही. किंवा त्यांनी माझ्यासाठीच मारलं हेही समजत नाही. फक्त त्यांनी मला मारलं एवढच लक्षात राहतं.स्पर्श बोलका असतोच पण कदाचित जखमा क्षणाक्षणाला बोलत असाव्यात.कारण जखमा बोचऱ्या असतात सुईसारख्याच…!!
असं म्हणतात, मायेचे धागे आयुष्य जगण्याच्या नव्या आशा पल्लवित करतात तर भळभळणाऱ्या जखमांचे दाह आयुष्य कसं जगायचं हे शिकवतात.त्यामुळे ह्या जखमा प्रकर्षाने अगदी क्षणोक्षणी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची जाणीव करून देत असतात.बोचलेलं ,टोचलेलच आपल्या जास्त लक्षात राहतं.म्हणूनच कदाचित टोचणारी सुई लक्षात राहते ,पण आयुष्यभर जोडणारा धागा आपल्याला या सगळ्यांमध्ये दिसत नसावा.त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असावं.
पण आपण या टोचणाऱ्या सुईला जसं लक्षात ठेवतो अगदी तसच आयुष्यभर जोडणारा धागाही आपण लक्षात ठेवायला हवा. सुईइतकाच तो धागाही खूप महत्त्वाचा असतो.त्यालाही कधीतरी हळवी साद जरूर घाला….कारण सुई आणि धागा एकत्र असतील तरच माळ सुंदर गुंफली जाईल. टोचून का होईना धाग्यात बांधलं गेल्यावर गुंफण सुरेख होते हे मात्र नक्की…!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


