टोकाच्या निराशेत माणसाला अफाट कल्पना सुचतात..
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
……….आणि एका निवांत ठिकाणी बसलेला , निराश झालेला माणूस अचानक कल्पनांच शहर गाठत होता.आतल्या आत ऊन्हातान्हात,धो-धो कोसळणाऱ्या पावसात फिरत बसला होता. डोक्यात घोळत असलेल्या कल्पनांना वास्तविक जीवनात कसं उतरावायच याच्या शोधात विचार करत बसताना मी त्याला पाहिलं होतं.
त्याच्या आयुष्यात दुःख हे भरभरून वाहताना दिसत होतं. आयुष्यात आलेली काही चांगली माणसंही हातातून निसटून गेली होती.घरात पैशाची चणचणही चांगलीच जाणवत होती. घरात तो..आणि सोबतीला त्याची थकलेली आई होती.ति एकाचवेळी अनेक रोगांनी ग्रासलेली होती. उपचारासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. आणि मदत करणारी चांगली माणसच अनावधानाने आयुष्यातून कधीच बाहेर पडली होती. मग काय………अशा परिस्थितीमध्ये तो पार खचून गेला होता.
आशेची कणभर पालवीही त्याच्या मनात फुटताना दिसत नव्हती. निराशेने त्याला जंग जंग पछाडल होतं. पण इतक्या निराशेत असताना त्याची कल्पनाशक्ती धारदार शस्त्रासारखी काम करत होती. म्हणजे इतक्या टोकाच्या निराशेतही त्याला अफाट अशा विविध कल्पना सुचत होत्या. कशाचीही तोड नव्हतीच त्याला.मग वाटलं…त्याच्या याच अफाट कल्पनांना वास्तविक रूप मिळाल तर…..
सगळच कसं छान जमून जाईल.त्याच्या कल्पनांना वास्तव रूप मिळाल तर त्याच्या आयुष्यातील निराशा कायमची लोप पावेल.उरलेलं आयुष्य कसं तो आनंदात जगेल.आपल्या अमूर्त कल्पनांनासुद्धा मूर्त स्वरूप येऊ शकतं या विचारानेच त्याच्या चेहऱ्यावर हसू आणि एक प्रकारच समाधान दिसून येईल.
तुमच्याही बाबतीत होत असेल नं असं…??? निराशा सगळ्यांच्या आयुष्यात असते.तशीच ती तुमच्याही आयुष्यात असेल. निराशा अगदी कोणत्याही गोष्टीमुळे येऊ शकते.त्याला एखादं ठोस असं कारण मुळीच नाही. कारण आपण जितके कणखर तितकेच हळवेही असतो.अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळेही आपण निराश होऊन जातो.प्रेम , पैसा , प्रतिष्ठा ,कुटुंब , करीअर… अगदी कधीही कुठेही ही निराशा आपल्याला गाठते.
पण ही निराशा जेव्हा आपल्याला मिठी मारून बसते.इतर वेळी आपण कल्पनांचे अनेक तीर मारतो.पण निराशा जवळ असताना आपण कल्पनांच शिखर अगदी न अडखळता पार करतो.हे असं व्हायला हवे , या या गोष्टी आत्ता या क्षणाला माझ्या हातात हव्या होत्या. वगैरे वगैरे आपण अनेक कल्पना करतो.
घर ताऱ्यांच बेट व्हावं ,
नळ वाहती नदी व्हावी ,
साधा तलाव अथांग असा सागर व्हावा…
अश्रुंचेही मोती व्हावे…
पत्त्यांचाही बंगला व्हावा ,वाह् वाह् व्वा…!! अजून काय तर माझ्याकडे एक “magic stick” हवी होती. मी सगळं विश्व कसं जादूई दुनियेपेक्षा सुंदर केलं असतं.पान नसलेल्या झाडानांही बहर आणला असता.एकावर एक अशा अफाट कल्पना या आपल्याला सुचत असतात.या कल्पनांना खरच वास्तव रूप मिळायला हवं…नाहीतर या कल्पना कल्पनाच राहतात.या कल्पनांना खरच वास्तव रूप मिळेल का…???तुम्हाला काय वाटतय…??
मला वाटतं की , या कल्पनांना वास्तव रूप मिळायला हवं.ज्या कल्पना करतो त्या डोळ्यांनी जवळून पाहता याव्या आणि हातांनी त्यांना स्पर्शही करता यावा.इतकं वाटत जरी असलं तरी या कल्पना वास्तवात साकारणं फार काही सोपं नाही. आणि काही कल्पनांना वास्तव रूप मिळेलही पण त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल.
आपल्या कल्पना वास्तवात उतरवण्यासाठी कष्ट आणि प्रयत्न, बुद्धी आणि कौशल्य यांना शरण जावे लागेल हे मात्र नक्की. निराशेत इतक्या कल्पना सुचतात.. मग त्याच कल्पनांसाठी थोडा वेळ खर्च केला तर काही कल्पनांना वास्तव रूप नक्की मिळेल.फक्त प्रयत्न करायला हवे.कारण एक प्रसिद्ध उक्ती आहेच…. ‘प्रयत्न वाळुचे कण रगडता तेलही गळे.’ चला तर मग आपल्या अफाट कल्पनांना आपल्याच प्रयत्नातून वास्तव रूप मिळवून देऊया….!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


