टेन्शन घेऊन कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही.
सौ. मिनल वरपे
मानसीने परीक्षेचा इतका ताण घेतला की त्या ताणामुळे तिची तब्येत बिघडली.. केलेला अभ्यास सुद्धा विसरल्यासारख तिला वाटू लागलं.. तिने मन लावून अभ्यास करण्याचा खूप प्रयत्न करूनसुद्धा तिचा अभ्यास काही होत नव्हता..
अमित नविन ठिकाणी कामाला लागला पण नविन माणस, नविन जागा मग अशा ठिकाणी मला काम जमेल की नाही याचा सारखा विचार करून घेतलेल्या टेन्शन मुळे अमित कामावर जायचं टाळत होता..
कोणताही कार्यक्रम असो नाहीतर समारंभ, लहान असो नाहीतर मोठा पण ते कार्य कस होणार, कोण करणार, व्यवस्थित होईल की नाही, वेळेत सगळं पार पडलं पाहिजे, सगळी व्यवस्था नीट झाली पाहिजे याची जेव्हा अतिकाळजी केली जाते, फक्त त्याचा विचार करूनच बसून टेन्शन घेतलं तर ते टेन्शन अजून वाढते.
आता घरातील कामाचं सुद्धा बघा..खूप पसारा पडला आहे कधी सगळं आवरणार,. कितीवेळ लागणार,. जमेल की नाही आता एवढं सगळं आवरायला असा विचार करूनच आपलं टेन्शन वाढत असते..
म्हणजे एकंदरीत पाहता कोणतीही गोष्ट ही फक्त विचार केल्याने साध्य होत नाही तर त्यासाठी गरज असते योग्य कृतीची.. मी हे केलं तर कस होईल.. मी ते केलं तर कस होईल फक्त याचा विचार आपल्याला कधीच पुढे जाऊ देणार नाही.
आपल्याला कोणत्याही कामाची फक्त विचार करून नाही तर कृती करून सुरवात करण्याची गरज असते. पण आपण कृतीला मागे ठेवतो आणि इतका विचार करतो की त्याचा ताण आपली मानसिक तसेच शारीरिक स्थिती बिघडवण्याच काम करते.
जे होईल ते होईल.. पुढचं पुढे बघू.. मी मला जे शक्य आहे तेवढे प्रयत्न तर नक्कीच करेन हा आशावाद जर आपल्यासोबत असेल तर तिथे विचारांना जास्त वेळ न देता एक योग्य नियोजन कस करावं.. पुढे काय करता येईल ज्याने मला माझा उद्देश साध्य करता येईल यासाठी वेळ दिला जातो.
विचार केल्याने वेळ आणि ऊर्जा तर वाया जातेच पण त्यासोबतच आपल्या मनातील अपयशाची भीती वाढत जाते, आपला आत्मविश्वास कमजोर होतो तसेच आपल्याला नविन काही करण्याची इच्छा होत नाही कारण जे आहे त्यामधेच आपण अडकून राहतो.
फक्त विचार केला आणिअभ्यास केला नाही तर पास कस होणार… कामाची सुरवातच केली नाही तर कामाचा शेवट कसा पाहायला मिळेल, कोणत्याही गोष्टीची आपण जेव्हा जबाबदारी घेतो त्यावेळी त्या जबाबदारीचा ओझ म्हणून विचार करण्यापेक्षा घेतलेली जबाबदारी अगदी पद्धतशीर पार कशी पाडता येईल याचं नियोजन केलं तर विचारात वेळ घालवण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.
विचार करणे खरचं गरजेचं आहे.. विचार केल्याशिवाय बोलणे आणि विचाराशिवाय कृती करणे अनेकदा व्यर्थ ठरते.. बऱ्याचवेळेस आपल्याला त्याचे परिणाम सहन करावे लागतात. विचार करून कोणत्याही गोष्टीचं योग्य नियोजन केलं तर त्याला योग्य वेळेत पूर्ण करायला आपल्याला सोप जाते..
पण हा विचार किती असावा.. विचार करण्याची मर्यादा असते आणि त्याच management आपल्याला जमलं पाहिजे.. कारण जास्त विचार केल्याने त्याचा ताण कधी आणि कसा वाढेल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही.फक्त विचार केल्याने, टेन्शन घेतल्याने जागची वस्तू सुद्धा हलणार नाही त्यासाठी आपल्याला हालचाल करावी लागते..
म्हणून टेन्शन न घेता योग्य तितका विचार करून हाती घेतलेलं काम, आपली जबाबदारी, आपले कर्तव्य पूर्ण केले तर त्याचा फायदा आपल्यालाच जाणवेल. आपला आत्मविश्वास वाढून आपल्यातील काम करण्याची उमेद नेहमीच वाढेल.. मनातील भीतीची जागा विश्वासाला मिळेल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


