Skip to content

टीका करायची असेल तर माणसाच्या त्या वर्तनावर करा, त्याच्या माणूसपणावर नको!!

टीका करायची असेल तर माणसाच्या त्या वर्तनावर करा, त्याच्या माणूसपणावर नको!!


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, म्हणजेच काय तर प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा, प्रत्येकाचं वागणं, बोलणं, विचार वेगळे. आपल्याला कितीही वाटलं तरी आपण दुसऱ्या कोणासारखे अगदी हुबेहूब असू शकतं नाही, आणि दुसऱ्या कोणाकडून तशी अपेक्षा ही करू शकत नाही.

या सर्व गोष्टी वेगळ्या म्हणजेच त्यात विविधता आली, वैचारिक भिन्नता आली आणि सोबतच मतभेद ही आले. त्यामुळे समोरचा माणूस नेहमी आपल्याला हवं तस, आपल्या मनाप्रमाणे वागेल अस होत नाही. अस अनेकदा होत की आपण समोरच्या व्यक्तीला काहीतरी करायला सांगतो पण ती व्यक्ती करतच नाही.

कामाच्या ठिकाणी बॉस त्यांच्या कर्मचाऱ्यांना विविध प्रोजेक्ट्स देत असतात. प्रत्येक वेळी ते वेळेत पूर्ण होतात अस नाही. कधी कधी मागे पुढे होत. आई मुलांना अभ्यास करायला सांगत असते पण लहान मुलांना जास्त करून खेळण्यात रस असतो. त्यांच्या मनात आलं तर ऐकतात नाहीतर मग हट्ट करून खेळायला जातात.

अगदी एखाद्या जोडप्यांमध्ये हे होत. घराचं फर्निचर कसं असावं इथपासून कुठेतरी फिरायला जाताना वेळ केला यावरून खटके उडतात. शिक्षक मुलांना ओरडून ओरडून सांगतात, पण जर मुलांनी ऐकला नाही तर त्यांचा पारा चढतोच. त्यातही प्रत्येक वर्गात अशी काही मुलं असतात ज्यांना ओरडण्याचा काही उपयोग नाही. त्यांची मस्ती चालू असते.

या सर्व गोष्टी जेव्हा होतात तेव्हा एक गोष्ट होताना दिसते ती म्हणजे अस वागल की त्या माणसावर टीका करण. म्हणजेच काय कर्मचाऱ्याने वेळेवर काम पूर्ण नाही केलं तर तो आळशी आहे, त्याला माझा, माझ्या शब्दाचा आदर नाही.

मुलं जेव्हा कमी मार्क्स पाडतात, ऐकत नाहीत तेव्हा एक शब्द असतोच, एक नंबर नालायक कार्ट आहे. आमचं अजिबात ऐकत नाही. शिक्षकही अनेकदा टीकेच्या स्वरूपात अशी विशेषण मुलांवर लावत असतात.

बरं इतकं करून थांबत नाही. अशी विशेषण लावून परत त्याच व्यक्तीकडून नीट वागण्याची अपेक्षा ठेवली जाते आणि ती पूर्ण झाली नाही तर नकारात्मक भावना जाणवतात जसे की राग, चिंता इत्यादी. यालाच “paradox effect” असं म्हणतात.

म्हणजेच “विरोधाभासाचा परिणाम.” म्हणजे काय तर आधी एखाद्या वागण्यावरून बेअक्कल म्हणायचे, आणि मग त्याच्याकडून नीट वागण्याची अपेक्षा करायची तस झालं नाही तर पुन्हा रागवायच. इथे आपण हा विचार करत नाही की आपण समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरून त्या पूर्ण माणसाला नाव ठेवत आहोत. जे चूक आहे. अतार्किक आहे.

माणूस म्हटल्यावर त्याच्याकडून चूक होऊ शकते. पण म्हणून तो माणूस एखाद्या विशिष्ट नावाखाली येऊ शकतं नाही. उदा. समजा कर्मचाऱ्याने नीट काम केलं नाही म्हणून त्याला मूर्ख म्हणणं. पण मग तो मूर्ख माणसाची सर्वच लक्षण दाखवतो का? दर वेळी तो असच चुकीचं काम करतो का? नाही.

कधीतरी त्याने नीट काम केलेलं असू शकत. पण जेव्हा आपण व्यक्तीच्या वर्तनाला नाव न ठेवता त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वाला नाव ठेवतो तेव्हा आपण त्याची सुधारायची संधीच हिरावून घेत असतो. कारण पूर्ण मूर्ख माणसाकडून आपण अपेक्षा करू शकतो का नीट वागण्याची? नाही.

अनेक लोक काम चुकल तर समोरच्याला गाढव म्हणतात. त्यांची टीका करण्याची पद्धतच अशी असते. पण मग गाढवाकडून तुम्ही नीट वागण्याची अपेक्षा करू शकता का? तसच तो माणूस कधीच नीट वागला नसेल का? असणार.

पण आपल्या लक्ष्यातच येत नाही आणि यातून आपण त्याची सुधारण्याची संधी कमी करतो. पण तेच जर आपण अस म्हटल, की आता त्याच्याकडून ही चूक झाली आहे. आताच त्याच हे वागणं चुकीचं आहे. पण याआधी त्याने काम नीट केली आहेत.

आताच्या अश्या वागण्याला काहीतरी कारण असेल, काहीतरी कमी पडलं असेल जे त्याने सुधारल तर काम नीट होतील. इथे आपण फक्त त्याच्या आताच्या वागण्यावर टीका करतो. जे सुधारण्याची शक्यता असते. बरेचदा एखादी गोष्ट चुकते, बिघडते तेव्हा तिथे त्या व्यक्तीचं कौशल्य कमी पडलेले असत. ते पुन्हा मिळवावं लागत जे सरावाने मिळत.

म्हणूनच जर एखाद्यावर टीका करायची असेल तर त्याच्या त्या विशिष्ट वर्तनावर करा, त्या वेळी कोणतं कौशल्य कमी पडलं आहे त्याची त्याला जाणीव करून द्या. कारण कोणत्याही माणसाचं चांगला किंवा वाईट अस मूल्य करता येत नाही.

आपण सर्व चुका करतच शिकत असतो. त्यातूनच आपण काही गोष्टी नीट करतो. त्यामुळे आपण पूर्णपणे चांगले किंवा वाईट असूच शकत नाही. आपण या दोघांच्या मध्ये म्हणजेच चुकू शकणारे, गुंतागुंतीचे आणि गुण न देता येणारे व्यक्ती आहोत. हेच आपलं मूल्य आहे. हे लक्षात ठेवून जर आपण समोरच्यावर टीका केली तर समस्या नीट पद्धतीने सुटू शकतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “टीका करायची असेल तर माणसाच्या त्या वर्तनावर करा, त्याच्या माणूसपणावर नको!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!