Skip to content

ज्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दलच्या कमी तक्रारी आहेत, तीच व्यक्ती समाधानी आहे.

ज्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दलच्या कमी तक्रारी आहेत, तीच व्यक्ती समाधानी आहे.


गीतांजली जगदाळे


तक्रार करणे हा मानवी संवादाचा एक नैसर्गिक भाग आहे. हा सहसा समस्यांना प्रतिसाद किंवा असंतोष एक्सप्रेस करण्याचा एक मार्ग असतो. पण कधी कधी प्रश्न पडतो, आपण सतत प्रत्येक गोष्टीची तर तक्रार करत नाही ना? जर याच उत्तर हो असं असेल तरी देखील, पुन्हा कधीही तक्रार न करण्याचा निर्णय घेणे कदाचित शक्य होणार नाही, परंतु त्याला मर्यादा निश्चित करणे फायदेशीर ठरू शकते.

सतत तक्रारी करणारा किंवा तक्रारीचा सूर लावणाऱ्या माणसाच्या सहवासात कोणालाच राहायला आवडत नाही. मनातलं फ्रुस्ट्रेशन बोलून दाखवल्यावर/ तक्रार केल्यावर बरं वाटतं, पण तेच सतत करणं म्हणजे प्रत्येक गोष्टी बद्दल नकारात्मक बोलण्याची सवय लागते, त्याने आपलं खूप नुकसान होऊ शकतं.कारण आपण चांगल्या गोष्टींमध्ये देखील काय कमतरता आहे यावर फोकस करून चांगली गोष्ट नकळत इग्नोर करू लागतो. आणि त्याने आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींकडे देखील नेगेटिव्हली बघण्यास सुरुवात होते. प्रत्येक गोष्टीत काही ना काही तक्रार करण्यासाठी मिलन सोप्प आहे. पण त्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीमध्ये चांगलं काय आहे हे बघण्यास सुरुवात केली तर आपल्याला जास्त फायद्याचे ठरते.

सतत तक्रार करण्याच्या सवयीने आपला मूड तर खराब होतोच होतो, पण त्याचबरोबर आपल्या सोबत असणाऱ्यांचा ही मूड आपण खराब करत असतो. अशा स्वभावाने कोणत्याच गोष्टीचा इसिली स्वीकार आपण करू शकत नाही, आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टच त्रासदायक वाटू लागते. चांगल्यातली चांगली गोष्ट घडल्यावर देखील त्यातलं लहान काहीतरी काढून त्याबद्दल आपण तक्रार करत बसतो. तसेच रोजच्या लागणाऱ्या ट्रॅफिक पासून ते अवकाळी पडणाऱ्या पावसापर्यंत काहीही आपल्याला त्रास द्यायला पुरेसं ठरतं. त्याचा तुमच्या मेंदूच्या कार्यावरही मोठा परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या शरीरावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

पण त्यापेक्षा जी लोकं आयुष्यात येणारी परिस्थिती, बदल सहजरित्या स्वीकारतात, किंवा आपल्या सोयीनुसार बदलून घेतात अशी माणसे खूप कमी तक्रार करतात, आणि किंबहुना त्यामुळेच ती जास्त समाधानी, शांत आणि आनंदी आयुष्य जगतात.आयुष्याबद्दल कमी तक्रारी असण्याने त्याचा आनंदात आणि समाधानात वाढ व्हायला कसा फरक पडतो ते जाणून घेण्यासाठी आधी आपण सतत तक्रार का करू लागतो हे पाहुयात, म्हणजे त्या-त्या गोष्टींवर काम केला असता, किंवा त्यावर फोकस केला असता, आपणही समाधानी आयुष्य जगू शकतो.

१. भावनिक नियमन: कधीकधी लोक त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून तक्रार करतात. त्यांच्या भावना व्यक्त करून, त्यांना या त्रासदायक भावनांची तीव्रता कमी होण्याची आशा असते. पण ते नेहमीच उपयोगाचं ठरेल असं नाही. त्यामुळे आपण करत असणाऱ्या गोष्टीबद्दलची तक्रार , ती गोष्ट बदलता येण्यासारखी आहे का? असेल तर ती बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण तक्रार करून ती नक्कीच बदलली जाणार नाही. आणि ज्या गोष्टी बदलता येऊ शकत नाही, त्या देखील तक्रार करण्याने जात नाही त्यामुळे तिथे त्या स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो.

२.मूड: जेव्हा लोक नकारात्मक मनःस्थिती अनुभवत असतात तेव्हा त्यांची तक्रार करण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या तक्रारीमुळे पुढील नकारात्मक मनःस्थिती निर्माण होते, आणि त्या मनःस्थिती मुळे अजून तक्रारी वाढतात असे एक दुष्टचक्र निर्माण होते.

३.व्यक्तिमत्व: संशोधन असे सूचित करते की लोक किती वारंवार तक्रार करतात यात विशिष्ट व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये भूमिका बजावतात. ज्या लोकांमध्ये agreeableness (सहमती हे एक व्यक्तिमत्व वैशिष्ट्य आहे जे इतरांच्या गरजा स्वतःच्या आधी ठेवण्याच्या व्यक्तीच्या क्षमतेचे वर्णन करते. जे अधिक सहमत आहेत ते सहानुभूतीशील असण्याची शक्यता असते आणि त्यांना इतरांना मदत करण्यात आणि ज्यांना अधिक मदतीची आवश्यकता असते अशा लोकांसोबत काम करण्यात आनंद मिळतो.) हे वैशिष्ट्य असतं अशी लोकं फार कमी तक्रार करतात.

४.सामाजिक घटक: लोक किती वेळा तक्रार करतात यावर इतर लोक देखील प्रभाव टाकू शकतात. खूप तक्रार करण्याची प्रवृत्ती असलेल्या लोकांभोवती असल्याने लोकांच्या स्वत:च्या तक्रारी मांडण्याची अधिक शक्यता असते. सामायिक तक्रार देखील सामाजिक बंधनाचे एक प्रकार म्हणून काम करू शकते.

तक्रार करणे कधी कधी फायद्याचे ही ठरते, पण ते आपण कशाबद्दल तक्रार करतोय, ते करून आपलं frustration बाहेर निघाल्यावर आपल्याला बरं वाटतंय, तक्रार करणं म्हणजे आपण नेहमी नकारात्मक विचार करत नाही/ बोलत नाही, आणि आपण सतत तर तक्रार करत नाही ना असं काही गोष्टींवर ते अवलंबून असते.
पण तक्रार न करता आहे तशा आयुष्यात येणाऱ्या गोष्टी स्वीकारणे हे नेहमी समाधान आणि आनंद घेऊन येते.

खूप गोष्टी तक्रार करून ही भोगाव्याच असतात, जसं की टाळता न येणार ट्रॅफिक, किती तक्रार केली तरी ट्रॅफिक मधून आपली काही सुटका होत नसते, त्यामुळे अशा वेळी स्वतःला त्रास करून घेत बसण्यापेक्षा निवांत, शांत बसून राहिलो तर होणारा त्रास टाळता येऊ शकतो.

कारण असा ना तसा वेळ हा जाणारच आहे पण तक्रार करत, कटकट करून स्वतःला त्रास देत बसण्यापेक्षा मस्त गाणी ऐकून आपण तो वेळ नक्कीच काढू शकतो. जिथे तक्रार करून परिस्थिती बदलता येऊ शकते, आपली frustration बाहेर पडून डोकं शांत होऊ शकतं अशा ठिकाणी तक्रार करणं केव्हाही चांगलं. पण जेव्हा ती तक्रार आपला दृष्टिकोन नकारात्मकतेकडे न्यायला लागते, तेव्हा त्यावर नियंत्रण केलेच पाहिजे.

तक्रारी कमी असल्याने आयुष्यात फक्त समाधान आणि आनंदच वाट्याला येते असं नाही, तर बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या वाट्याला येऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात कमी त्रास आपल्याला होतो, आपण सहजरित्या आयुष्यात येणारी आव्हाने स्वीकारून त्यांच्यावर मात कशी करता येईल यावर फोकस करतो, आणि कमी तक्रार केल्याने आपला आयुष्याकडे, परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन ही आशावादी आणि उत्साही राहण्याची शक्यता असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!