Skip to content

ज्या व्यक्तींना बहिरं केव्हा व्हावं हे समजतं, ते आयुष्यात सुखी होतात.

ज्या व्यक्तींना बहिरं केव्हा व्हावं हे समजतं, ते आयुष्यात सुखी होतात.


सौ. मिनल वरपे


इंद्रिय कशासाठी असतात हे प्रत्येकाला ज्ञात असते डोळ्याने पाहावं, जिभेने चव घ्यावी, नाकाने वास घ्यावा, त्वचेतून स्पर्श ओळखावा आणि कानाने ऐकावं. आपण काय बघावं काय बघू नये हे जस आपल्याला कळते तसच जर आपण काय ऐकावं आणि काय नाही ऐकावं हे कळलं तर एक उत्तम आयुष्य आपण जगणार…

कारण कानाने ऐकल्या गेलेल्या गोष्टी डोळ्याने पाहिलेल्या गोष्टींपेक्षा मेंदूत जास्त काळ राहतात कानाने काय ऐकू नये म्हणजे त्यावेळी आपण स्वतःला बहिर समजल तर चांगलच आहे… मग आपण स्वतःला बहीर कधी समजावं हे आपल्याला कळलं पाहिजेना….

ज्यावेळी आपल्याबद्दल कोणी बोलत असेल

आपल्याबद्दल कोणी काही बोलत असेल तर ते अजिबात लक्ष न देता दुर्लक्षित करावं.कारण कोणी जर चांगल बोलत असेल तर याचा अर्थ असा नाही की ते आपलं मनापासून कौतुक करत असतील काहीवेळेस उगाच आपल्याला दाखवण्यासाठी वरवर कौतुक होत असेल तर आपण ते ओळखून ऐकून सुद्धा न ऐकल्यासारख करावं कारण ऐकून आपण जास्त आनंदी होतो आणि नंतर जेव्हा आपल्याला कळते की ते उगाच आपल्याला दाखवण्यासाठी खोटी तारीफ करत होते तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते आणि त्यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण होतो.. त्यापेक्षा ऐकून न ऐकल्यासारख करावं म्हणजे दुरून डोंगर साजरे.

आपल्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर

आपण आपल्या विश्वात असतो आणि आपल्याबद्दल होणारी कुजबुज आपल्या कानावर येते.. कोणी आपल्या चुका सांगत असते तर कोणी मुद्दाम चुकीच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते ऐकल्यावर आपल्याला दुःख होते. आपण सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहतो. आणि आपलं आपल्या कामात लक्ष केंद्रित होत नाही..

एखाद्या ठिकाणीं आपल्याबद्दल सतत कुजबुज होत असेल, वाईट बोललं जात असेल तर त्याठिकाणी आपलं काम होत नाही.. डोक्यात सतत तेच विचार असतात की माझ्याबद्दल काय चर्चा चालू असेल, माझं काय चुकतेय, हे असेच का विचार करतात वैगेरे आणि मग आपलं काम नीट होत नाही.तिथे जाऊन काम करण्याची इच्छा आपल्याला राहत नाही… आणि शेवटी याचा परिणाम आपल्या नोकरीवर होतो. या सगळ्या परिणामांपेक्षा बहिर असल्याप्रमाणे वागायच..

कोणाबद्दल वाईट बोलणं जितकं चुकीचं तेवढच कोणाबद्दल वाईट ऐकणं सुद्धा तेवढच चुकीचं.. जर कोणी आपल्याला एखाद्याबद्दल वाईट सांगत असेल तर तो त्याचा दृष्टिकोन असतो पण ते ऐकून आपण सुद्धा तेच मत बनवतो आणि इतरांना सांगतो. कोणी कसाही असो उगाच त्याच्याबद्दल परस्पर चर्चा करण्यापेक्षा आपल्याला कोणी सांगत असेल तर ऐकून न ऐकल्यासारख केलेलं उत्तम.

आपल्याबद्दल कोणी वाईट बोललेल आपल्याला आवडत नाही तसच आपण सुद्धा कोणाबद्दल वाईट बोलू नये आणि ऐकू नये. कामाच्या ठिकाणी, शेजारी एकत्र बसून सगळे नकोत्या विषयावर चर्चा करतात, याच त्याच वागणं बोलणं, कोणी लग्न केलं कस केलं, तिचा नवरा असा, त्याची बायको अशी, ही त्याच्यासोबत इतकी बोलते आणि तो तिच्यासोबत इतका बोलतो.. ज्या चर्चेत कोणाची काळजी नसून भलत्याच विषयावर चर्चा सुरू असेल तर तिथे स्वतःला बहिर समजून तिथून दूर राहायचं…

कोणाबद्दल चुकीच्या गोष्टी आपण ऐकत असू आणि त्याला दुजोरा देत असू तर त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल आदर राहत नाही आपले त्याच्याशी असलेले चांगले संबंध बिघडतात.. म्हणून असलेले नात , संबंध जपायचे असतील तर त्या व्यक्तीबद्दल होणाऱ्या चर्चेत सहभाग सुद्धा घेऊ नये आणि आपली मते सुद्धा मांडू नयेत.

वेळ जात नाही.. काम नाहीत.. किंवा आपली काम आवरून सगळे मिळून चर्चा करतात मग ते शेजारी असो नाहीतर कामाच्या ठिकाणी आणि उगाच नकोत्या विषयावर चर्चा करतात. यापेक्षा आपण कोणाबद्दल काहीच न ऐकता काहीच न बोलता आपलं काम करत राहायचं. जर आपल्याला जास्त मोकळा वेळ मिळत असेल तर त्यावेळेत आपल्याला उत्साह मिळेल अस नविन काही करण्याचा प्रयत्न करायचा.

आपण स्वतःला बहिर समजल की आपल्याला या सगळ्यांचा त्रास होणार नाही. कारण आपल्यावर या सगळ्याचा परिणाम होत असतो. आपलं वागणं बोलणं, आपली मते, आपले विचार या सगळ्यांवर आपण जे ऐकतोय त्याचा परिणाम होत असतो.

आपल्याला काय ऐकायचं नाही हे एकदा कळलं ही तिथे बहिर असल्याप्रमाणे वागल की आपल्यावर त्याचे कोणतेच वाईट परिणाम होणार नाहीत. कारण जर आपल्याला नकोते ऐकण्याची सवय असेल तर त्यामुळे आपण अतिवीचार करतो, आपल्याला एकटेपणा जाणवतो, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होतात. तसेच आर्थिक आणि सामाजिक स्थिती मधे सुद्धा परिणाम आपल्याला जाणवतात.

सुरवातीला आपल्याला कठीण जाईल पण एकदा का आपल्याला योग्य ठिकाणी बहिर होण्याची सवय लागली की फायदे त्याचे आपल्यालाच जाणवतील.आणि आपल्या प्रगतीवर त्याचे परिणाम आपल्या लक्षात येतील. आपलं शारीरिक मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आपली ऊर्जा नको तिथे जाणार नाही आणि आपल लक्ष कामात राहील म्हणजेच आर्थिदृष्ट्या सुद्धा आपण सक्षम राहणार… म्हणून काही ठिकाणी बहिर होऊन बघा…

ते न ऐकून आपण फार मोठा आयुष्याचा भाग गमावतोय, आपलं खूप नुकसान करून घेतोय हे असं कुठे नसतं.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “ज्या व्यक्तींना बहिरं केव्हा व्हावं हे समजतं, ते आयुष्यात सुखी होतात.”

  1. रोहित

    खूप छान लेख आहे, ह्याचा जर खरोखर प्रयोग केला तर नक्कीच आयुष्य बदलून जाईल.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!