ज्या लोकांसोबत आपण जास्त वेळ घालवतो, याचा आपल्या मनस्थितीवर मोठा प्रभाव पडतो.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
एक व्यापारी पाळीव प्राणी आणि पक्षी विकत असे. त्याच्याकडे एकदा खुप हुशार पोपट विकायला होते. व्यापाऱ्याने ग्राहकांना आकर्षित करायला त्या पोपटांना काही लहान वाक्ये बोलायला शिकवली होती. ह्या वैशिष्ट्यामुळे ते पोपट लगेच विकले गेले.
तो व्यापारी अधुन मधुन त्याने विकलेल्या प्राण्यांच्या घरी जात असे. त्यांची काळजी घेण्यात काही अडचण असेल तर मालकांना मार्गदर्शन करत असे. त्यांना प्राण्यांचे खाद्य, देखभालीचे साहित्य इ. विकत असे.
असाच तो हे पोपट विकल्यावर काही दिवसांनी त्यांच्या घरी गेला. पहिल्या पोपटाच्या घरी गेला तेव्हा त्या पोपटाने त्याला खुप शिव्या दिल्या. त्याचा मालक बाहेर आला आणि तोही व्यापाऱ्यांशी तुसडेपणाने बोलला आणि त्याला लवकरच हाकलुन लावले.
तिथुन पुढे तो दुसऱ्या पोपटाच्या घरी गेला. तेव्हा त्याने चांगल्या शब्दात व्यापाऱ्याचे स्वागत केले. मालक आला, त्याने हि मालकाची विचारपूस केली. त्याला प्यायला पाणी आणि दिले आणि काही खायलाही दिले. पोपटाने व्यापाऱ्याला काही श्लोक म्हणुन दाखवले.
प्रसन्न होऊन व्यापारी पुढे निघाला. मनोमन त्याने विचार केला “नुसती पोपटपंची करणाऱ्या पक्ष्यांवर सुद्धा संगतीचा हा परिणाम होत असेल तर माणसांवर आणि अजाणत्या मुलांवर तर काय होत असेल?”
आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर तीन गोष्टींचा प्रभाव पडत असतो. मानसिक, शारिरीक म्हणजेच जैविक आणि सामाजिक. मानसिक म्हणजे आपले विचार आपल्या भावना वर्तन, सर्व बोधनिक क्रिया, शारिरीक म्हणजे आपल्या शरीरातील रसायने, हॉर्मोन्स, शरीरा अंतर्गत होणारे बदल आणि सामाजिक म्हणजे समाज म्हणजेच आजूबाजूची माणसं, आपल्या त्यांच्यासोबत असलेला सहवास, समाजात जे जे काही म्हणून येत ते सर्व. आता याच समाजात राहत असताना ज्याच्या सहवासात राहत असतो त्याचा आपल्यावर तसेच आपल्यावर मनस्थितीवर कश्या प्रकारे प्रभाव पडत असतो हे सांगणारी याहून उत्तम कथा असू शकत नाही. माणूस कधीही एकटा असत नाही. आयुष्यभर कोणाची ना कोणाची संगत, सोबत त्याला लाभत असते आणि याचा प्रभाव देखील पडत असतो.
म्हणूनच लहान पणापासून मुलांना चांगली संगत लावली पाहिजे, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायचे असतील तर त्यांच्या आजूबाजूचे लोक विशेषतः त्या वयात असणारा त्यांचा मित्रपरिवार पाहिलं जातो. कारण आपण ज्या लोकांसोबत जास्त वेळ वावरत असतो नकळत आपल्या विचारांवर त्यांचा प्रभाव पडतो आपली मानसिकता पण तशी होऊ लागते.
आपल्या सहवासातील लोक जर हसरी, आयुष्याला चांगल्या नजरेने, सकारात्मक पद्धतीने पाहत असतील तर शक्यता जास्त असते आपण ही तसाच विचार करू लागतो. कारण त्या माणसांसोबत आपलं जास्त वावरण असत, बोलण असत त्यामुळे कुठेतरी आपल्यावर त्याचा प्रभाव पडतो. तेच जर आपल्यासोबत असणारी व्यक्ती कमालीची निगेटिव्ह, चुकीच्या विचारांची असली तर आपलं पण मन तसच होऊ लागतं, मानसिकता तशी होते.
लहान मुलांच्या बाबतीत हे जास्त होताना दिसत. घरात आपण कितीही चांगलं वागू बोलू, मित्रपरिवार जर नीट नसेल, बरीच सोबतची मुल शिव्या घालणं, मारामारी आरडा ओरड करणारी असतील तर ही पण लगेच ते शिकतात, तसच वागायला लागतात. कारण ते वय घडण्याच असत. हेच मोठ्यांच्या बाबतीत पण होताना दिसत. सतत एका विशिष्ट पद्धतीच्या व्यक्तीसोबत आपण राहिलो आपण तसे वागण्याची शक्यता जास्त असते.
ज्या मुलांचं बालपण अश्या घरात गेलेलं असत जिथे मतभेद, भांडण, क्लेश असतील त्यांच्या मनावर त्याचा प्रभाव पडतो. ज्याचे पडसाद भविष्यावर उमटतात. तेच जर घरी healthy वातावरण असेल, मुल खेळीमेळीच्या वातावरणात वाढली असतील तर पुढे जाऊन त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण तसा बनतो.
म्हणूनच आपण ज्या माणसासोबत राहतो, वेळ घालवतो त्याच व्यक्तिमत्व, विचार, त्याची दृष्टी याचा पण आपण विचार केला पाहिजे आणि तशी संगत ठेवली पाहिजे आणि जरी आजुबाजूच वातावरण चांगलं नसेल, अशी लोक असतील ज्यांच्यावर आपला कंट्रोल नाही तर निदान आपले विचार तितके बळकट पाहिजेत की ज्यामुळे आपल्यावर त्या लोकांचा प्रभाव पडणार नाही.
कारण आपला दुसऱ्यांवर कंट्रोल नाही पण आपण स्वतःला नक्कीच योग्य त्या वेळी कंट्रोल करू शकतो ज्यालाच स्वतःवर चांगल्या गोष्टीतून प्रभाव पाडणे म्हणतात. तो कसा पडणार? तर विचारांना योग्य वळण लावून त्यांना चांगल्या दिशेला वळवून. कारण कोणत्याही गोष्टीचा प्रभाव शेवटी आपल्या विचारांवर येऊन थांबतो म्हणून ते आपल्या ताब्यात पाहिजेत. तर आपण आपल्या ताब्यात राहू. आपलं मन आपल्या ताब्यात राहील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

अप्रतिम अगदी खरं आहे