Skip to content

ज्या अपयशातून आपण काहीच शिकत नाही ते खरे अपयश!

ज्या अपयशातून आपण काहीच शिकत नाही ते खरे अपयश!


मिनल वरपे


आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भीती असते.. कधी अंधाराची..तर कधी माणसं गमावण्याची.. मित्र तुटण्याची.. संकटांची…पडण्याची..तर कधी मरणाची आणि यातीलच एक भीती जी आपल्याला पुढे जाण्यापासून रोखायच काम करते, आपले प्रयत्न थांबवते, आपल्यातील क्षमता कमी करते, जगणं काय असते यश काय असते हे ओलखण्याआधीच जी आपल्याला माघार घ्यायला बळी पाडते आणि ती भीती असते अपयशाची…

प्रयत्न करा फळ हे मिळणारच.. अपयश ही यशाची पहिली पायरी असते.. आज हवं ते नाही मिळालं म्हणून काय झालं येणाऱ्या नव्या क्षणात आपल्याला ते मिळवता येईल हे सर्व विचार आपल्याला कायम पुढे जाण्यासाठी नविन ऊर्जा देतात.

आणि मग आपण आपले प्रयत्न पुन्हा नव्याने सुरू ठेवतो.. आपल्यातील जिद्द वाढवायची असेल तर कुठेच हार मानायची नाही हे आपण कधी ठरवतो जेव्हा आपल्या अपयशात सुद्धा आपण काही शिकत असतो.

अपयशातून शिकत पुढे जायचं हे आपण लहानपणापासूनच कळत नकळतपणे शिकतो. लहान मूल चालताना पडतात रडतात पण पुन्हा चालायचं सोडत नाही, खेळताना तर किती धडपडतात हे विचारूच नका पण तरीसुद्धा पुन्हा हसत हसत खेळायला जातात. म्हणजेच अगदी लहानस का असेना पण अपयशातून पुढे जायचं हे त्यांना बरोबर कळते.. ते एकदा दोनदा अगदी दहा वेळा पडतात पण नंतर तेथून कस जायचं जेणेकरून आपण पडणार नाही हे त्यांना बरोबर कळते म्हणजेच ते त्यांच्या चुकांमधून शिकत असतात आणि पुढे जातात.

पुढे आपल्याला सामोरे जावे लागते ते शालेय परीक्षांना.. कितीही नाही म्हटलं तरी त्या परीक्षा प्रत्येकाला द्याव्याच लागतात कारण आपल्याला जगासोबत चालायचं आहे तर शिक्षण हे घेतलेच पाहिजे.पण या प्रत्येक परीक्षेत आपण नेहमीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो असे नाही कधी कमी गुण मिळतात तर कधी नापास सुद्धा होतो पण पुढच्या परीक्षेला आधी झालेल्या चुका न करता आलेल्या अपयशातून शिकत पुढे जातो.

तसेच आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, संकट, नोकरी मिळवताना येणारे अपयश असो नाहीतर अजून दुसरे काही पण या येणाऱ्या प्रत्येक अडचणी आपल्याला यश अपयश काय असते हे दाखवून देतात आणि आपण यश मिळालं तर आनंदी होतो आणि जगण्यात अपयश आले तर आपण लगेच निराश होतो.

जगात कोणतीही व्यक्ती सर्वगुणसंपन्न कधीच नसते.प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत पुढे जाते. बघाना जेव्हा एखाद नाटकाची प्रॅक्टिस सुरू असते तेव्हा लगेच सगळे डायलॉग्ज लक्षात नाही राहत. बऱ्याच वेळा बोलून बोलून.. चुकत .. हसत खेळत शिकत ते नाटक पूर्ण केलं जाते..

आलेल्या अपयशात काही शिकवण घेऊन पुढे गेलो तर आपण कायम पुढे जाणार पण त्या अपयशात काहीच न शिकता माघार घेतली तर ते खर अपयश…

म्हणून अपयशाची भीती बाळगून कधीच यश मिळणार नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते पण आलेल्या अपयशाला आपल्या यशाची पायरी तेव्हाच करता येईल जेव्हा आलेल्या अपयशात आपण काही शिकवण घेऊ आणि पुढे जाऊ…

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!