Skip to content

ज्यांना अद्याप यश मिळाले नाही, त्यांना मूर्ख समजू नका!

ज्यांना अद्याप यश मिळाले नाही, त्यांना मूर्ख समजू नका!


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


ससा आणि कासवाची गोष्ट कोणी ऐकली नाही किंवा कोणाला माहित नाही असे होणार नाही. धीम्या गतीने चालणारे कासव व चपळतेने पुढे जाणारा ससा यांच्यामधील ही शर्यत. जेव्हा यांच्यामध्ये शर्यत लागते तेव्हा कासव तर काय मुळातच हळू चालणारे, ते काय शर्यत जिंकणार, याच्या आधी पण त्याने हळुच चालायचं काम केले असे समजून ससा आळशीपणा करतो, झोपून राहतो व हळू चालणारे पण, सातत्य ठेवणारे कासव पुढे जाते व जिंकते. जरी ते हळू चालत असले तरी ते कुठेही थांबत नाही ते प्रयत्न करत राहते आणि म्हणून ते जिंकते. तिथे ससा यामुळे हरतो कारण तो कासवाला त्याच्या क्षमतेला कुठेतरी कमी लेखतो व गाफील राहतो.

कित्येकदा आपल्याला आजूबाजूला असेच चित्र पाहायला मिळते. प्रत्येक व्यक्ती काही ना काही करण्यासाठी धडपडत असते. काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते. परंतु गरजेचं नाही पहिल्या प्रयत्नात यश मिळेल. अनेकदा सर्व काही नीट ठरवून, त्यासाठी लागणारा जो काही अभ्यास आहे तो करून देखील अपयश येत. त्या गोष्टी मध्ये माणसाला अपेक्षित यश मिळत नाही. ज्याची कारणे अनेक असू शकतात.

स्पर्धा परीक्षा असु दे, पोलिस भरतीच्या किंवा अनेक क्षेत्र आहेत जिथे माणसाला हवे तसे यश मिळत नाही. फक्त परीक्षा नाही तर एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा अश्या अनेक गोष्टी जिथे व्यक्तीला अजून यश मिळालेलं नसत. त्यावेळी लोकांकडून त्यांना वेगवेगळे विशेषण, लेबलं लावली जातात. तुला या गोष्टीत यश नाही, तू अजून पर्यंत काही मिळवू शकला नाही, मूर्ख आहेस तुला काही जमत नाही

अशा पद्धतीने एक ना अनेक गोष्टी बोलल्या जातात. परंतु एखाद्या व्यक्तीला अजून कोणत्या गोष्टीत यश मिळत नसेल तर मिळालं नसेल तर त्याला मूर्ख म्हणणे, मूर्ख असे समजून त्यानुसार वागवणे चुकीचे आहे. तुम्ही जर असं वागत असाल तर तुम्ही चूक करत आहात. आपल्यासमोर अशी अनेक उदाहरण आहेत अशी अनेक माणस आहेत ज्यांनी शालेय जीवनात यश मिळवले नाही, त्यांना शाळेतून, महाविद्यालयातून काढून टाकल गेला आहे.

परंतु त्याच लोकांनी पुढे जाऊन अनपेक्षित यश मिळवून दाखवलेल आहे. त्यांना पण सुरुवातीला बऱ्याच लोकांनी नावे ठेवलेली होती. परंतु त्यांनी खोडून टाकायला जगाला भाग पडलं. Steve jobs, Thomas Edison यांना सुरुवातीला अपयश आलं होतं. त्यांना देखील अनेक लोकांची बोलणी खावी लागली असतील. परंतु याच लोकांनी जगाला बहुमोल अशी देणगी दिली आहे.

कोणतीही गोष्ट मिळवायचे असेल तर त्यात मिळणारे यश किंवा अपयश त्या माणसाच्या हातात नाही. परंतु त्यासाठी प्रयत्न करणे नक्कीच माणसाच्या हातात आहे. जर एखादी व्यक्ती अपयश येऊनही ती गोष्ट मिळवण्यासाठी, त्यासाठी वेगवेगळे प्लॅन करून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करत आहे तर याचा अर्थ ती तेवढी जिद्दी असते.

एखाद्या गोष्टीसाठी धडपडणे, यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे यातून जो एक आंतरिक बदल त्या व्यक्तीमध्ये होतो ते हे एक प्रकारचे यश आहे. जे दुसऱ्या कोणाला लगेच दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना अजून पर्यंत यश मिळाले नाही असं समजून मूर्ख समजणे चुकीचे आहे.

अगदी दहा, बारा प्रयत्न किंवा त्याहूनही जास्त प्रयत्न, अनेक वर्ष त्या गोष्टीत मध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन बरीच जण यश मिळवतात. अस होत की व्यक्तीला यश मिळालेलं नसेल तरी जिद्दीने ते पुढे जाते आणि त्यांना मुर्ख समजणारे लोक कासव व ससाच्या गोष्टीप्रमाणे मागे राहतात.

म्हणून या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्यांना अजून पर्यंत यश मिळत नाहीये, अपेक्षित यश मिळत नाहीये त्यांना कोणत्याही लेबल लावू नये. कारण जेव्हा नाव ठेवले जाते, त्यावेळी हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येकाला हे criticism झेपते असे नाही. म्हणून एखादी व्यक्ती प्रयत्न करत असेल तरी तिला अजून काही साध्य होत नसेल तर त्याला लेबल न लावता, तसे न करता त्याला moral support द्यायला शिका.

त्यांना मूर्ख न समजता त्यांच्या ती गोष्ट मिळवण्याच्या पद्धतीमध्ये कुठे काही चुका होत आहेत का, कुठे काही कमी पडत आहे का हे शोधून काढण्यामध्ये त्यांची मदत करा. त्यांच्या जिद्दीमध्ये सहभागी व्हा. त्यांना ते यश मिळवायला मदत करा. हे खरं माणूसपणाच लक्षण आहे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!