Skip to content

जोपर्यंत तुम्ही घाबरत जगाल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय इतर घेत राहतील.

जोपर्यंत तुम्ही घाबरत जगाल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय इतर घेत राहतील.


सोनाली जे.


आयुष्यात आपण बरेचवेळा जगाला घाबरून आपले आयुष्य कसे घालवायचे हे ठरवत असतो. आता हे जग जग म्हणजे कोण हो ? हे खरे तर आपलेच लोक असतात. नात्यातले , जवळचे , आपलेच मित्र मैत्रिणी त्यांना काय वाटेल , ते काय म्हणतील याची चिंता कायम आपल्याला असतें. बाकी जे जग आहे ना त्याला तुमच्याशी काही देणे घेणे ही नसते बरं का !! तुम्ही काय करता , काय करावे , कसे वागावे. कोणाशी बोलावे , काय पेहराव करावा याचा काही संबंध नसतो .

पण आपल्याच लोकांना आपण घाबरून राहत असतो. आणि तुमच्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय इतर घेत राहतात ते समजत ही नाही.

कार्तिक : अग सोनाली , काय ग केवढी जाड झाली आहेस ?
सोनाली : हो का अरेच्चा माझ्या लक्षातच आले नाही रोजच्या धावपळीत. , स्वतः कडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळत.

कार्तिक : माझी मैत्रीण आहे , तिची जिम आहे. हा घे तिचा नंबर आणि बोलून जरा लक्ष दे स्वतः कडे.
सोनाली : बोलते रे.

सोनाली टाळते आहे , वेळ घालवत आहे , कदाचित कसा फोन करू म्हणून संकोच , घाबरत ही असेल की आता काय सांगणार ? आपल्याला जमेल का ? या विचारात दिसते.

कार्तिक : लगेच फोन करतो . प्रिया माझी मैत्रीण सोनाली तिला डाएट प्लॅन , आणि जिम सुरू कर उद्यापासून . कधी येवू देत सकाळी ९ .ठीक सांगतो तिला.

पंधरा दिवसांनी सोनाली चक्क weakness , body pain ने त्रस्त. तिला मुळात rheumatoid arthritis trigger झाला आणि त्याचा त्रास. तरी ही हे सगळे exercise compulsory. याचा त्रासच जास्त झाला. मग परत rheumatologist ची अपॉइंटमेंट त्यावर उपचार सुरू .

सांगायचे काय तर लोक सांगत राहणार . सुचवत राहणार. सोनाली चे वजन वाढले हे वाटणे आणि ते कमी व्हावे म्हणून कार्तिक नेच निर्णय घेणे की तिने जिम लावावी.

असेच आहे. आपण बाळ असताना , लहान असताना सर्व निर्णय आई वडील घेत असतात. आपण शाळेत कधी जायचे , कोणत्या शाळेत , कसे ते सगळे तेच निर्णय घेतात.

pre Primary school मधून primary , secondary ठीक .कारण तेव्हा मुलांना काय चांगले काय वाईट हे माहिती नसते. आणि कोणताच अनुभव ही नसतो. किंवा वय एव्हढे लहान असते की निर्णयक्षमता ही नसते. दुसरे माहितीच नसतात शाळा , procedure त्यामुळे सगळे निर्णय हे आई वडील घेतात.

पण जेव्हा दहावी मधून पुढे काय करायचे ? कोणती शाखा निवडायची ? यात तुम्ही स्वतः जर संभ्रमित असाल . निर्णय घेण्यास घाबरत असाल. अर्थात बरेचदा असे होते निर्णय पक्का असतो पण जर तो चुकला तर काय होईल ? आपल्याला जमले नाही तर काय होईल हे विचार आपल्याला निर्णय घेण्यापासून कायम द्विधा मनस्थितीत ठेवतात. तुमचा निर्णय तुम्ही घेवू शकत नसाल , किंवा तुमचा निर्णय तुम्हाला घरी ठामपणे सांगता येत नसेल , निर्णय घेण्यास घाबरत असाल , तर

तुम्ही कोणती शाखा निवडायची , पुढे काय करायचे हा निर्णय परत परस्पर आई वडील घेवून तुम्हाला तो मान्य आहे का नाही याचा ही विचार करणार नाहीत. त्यांचा निर्णय तुमच्यावर थोपविला जातो. मग तुम्हाला तो अभ्यासक्रम आवडो अगर न आवडो ..ते पूर्ण करणे भागच पडते.

सासू सासरे हे सुनेला घरा बाहेर नोकरी करिता जाण्यास मनाई करतील म्हणून तिने तिचे चांगलं करिअर सोडायचे का ? असे घडते ही बरेचवेळा .

नवऱ्या सोबत पटत नाही तरी त्याच्या सोबतच राहायचे , जुळवून घ्यायचे . तो कसाही वागू देत पडते घ्यायचे. आपण तिथून बाहेर पडून जायचे कुठे हा प्रश्न असतो. मुलांची जबाबदारी एकटीने कशी पेलणार ही भीती असते. आणि आपला निर्णय घेवू शकत नाही. सासरचे काय म्हणतील. लोक काय म्हणतील याची ही भीती असते. मुले मोठी झाल्यावर काय म्हणतील याची भीती असते

आपली जबाबदारी कायमची आई वडील तरी कशी घेणार . कारण त्यांचे आयुष्य किती हे त्यांना माहिती नसते. म्हणून मग तिथेच रहा हा त्यांचा निर्णय असतो. घटस्फोट घ्यायचा नाही हा आईवडिलांचा निर्णय ते थोपवितात.

जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल जगाला तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय इतर घेत राहतील. आणि प्रत्येक वेळी त्यांचे निर्णय बरोबरच असतील असे ही नाही ना ?? त्यांचे निर्णय चुकले तर ते जबाबदारी कुठेच घेणार नाहीत.

परवाची गोष्ट माझी पेशंट म्हणले तरी चालेल. लग्न झाले आहे . नवऱ्या सोबत संबंध नाहीत. पटत नाही. नवराच विरोधात तर सासरचे ही विरोधातच. दोन मुले आहेत. पण आता अलीकडे तिचे पूर्वीचे प्रेम तिच्या आयुष्यात आले आणि संबंध फक्त भावनिक , मानसिक एव्हढे मर्यादित न राहता पुढे गेले शारीरिक . त्याचे ही लग्न झाले आहे. दोन मुले आहेत. त्यामुळे त्याला वेळ मिळेल , सवड मिळेल , तेव्हा भेटण्याचा निर्णय घेणार. ती कुठे त्याची प्रायोरिटी ही नाही . पण ती घाबरते की आहे ही साथ ही कायमची सुटेल.

आणि खरेच काही चांगले क्षण त्याने दिले आहेत , सुख , शांतता दिली आहे वेळ प्रसंगी काळजी ही घेतली आहे. म्हणून त्याच्या विरोधात ही काही बोलण्याचा प्रश्न येत नाही. कोणतेच निर्णय त्यांच्या नात्यात घेवू शकत नाही. एक तर त्याला काय वाटेल , समाज , त्याचे कुटुंब , मुले यांची भीती .

त्यात त्याच्या आई वडिलांना माहिती आहे. मुलगी चांगली आहे , संस्कारी आहे त्यामुळे ते ही या संबंधात काही करू शकले नाहीत. तिच्या सोबत नाते टिकवून आहेत. पण त्यांच्या सूना , नातवंडे येणार असतील तेव्हा फोन करून सांगणार की घरी येवू नको , फोन करू नको , इतर वेळा व्हॉटसॲप वर मनसोक्त बोलणाऱ्या आई मग तुझा व्हॉटसॲप वरचा फोटो ही काढून टाक. तुझे मेसेज कोणी बघेल म्हणुन delete केले.

काही पाठवू नकोस मी सांगेन तेव्हाच पाठव. तेव्हाच मग तुझा फोटो लाव म्हणजे समजेल व्हॉटसॲप सुरू आहे. हा एकतर्फी निर्णय त्या घेवून तिच्यावर सोपवितात .कारण डायरेक्ट भीती तिला नसेल तरी त्याच्या आई बाबांना वाटणारी भीती की त्यांचा मोबाईल कोणी बघेल , मुले ,सूना , नातवंडे बघतील , काय म्हणतील याची त्यांची भीती ही हीची ही भीती झाली आहे. त्यामुळे घाबरून त्या म्हणतील तो निर्णय ही मान्य करते. आणि करावेच लागते.

सुहानी घरी आली आणि सांगितले की मी उद्या राजीनामा देणार आहे ऑफिस मध्ये . तिला का सोडावे वाटते याचे विचार ही न करता तिचा नवरा समीर म्हणाला नाही तू नोकरी सोडायची नाही. माझा ही आता corona मध्ये जॉब गेला तू सोडली नोकरी तर आपले कसे होईल ही भीती वाटते.

खरे तर आपली नोकरी गेली तर पुढे कसे होईल या नवऱ्याच्या भीतीला सुहानी ही घाबरली आणि तिने नवऱ्याने तिच्या नोकरी न सोडण्याचा घेतलेला निर्णय मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध , घाबरून स्वीकारला.

आपले आयुष्य म्हणजे कठ पुतली नाही . कोणी ही आपल्या बाबत कोणतेही निर्णय घ्यावेत. का तर तुम्ही निर्णय घेण्यास घाबरता , निर्णय घेतला आणि चुकला तर काय होईल म्हणून घाबरता , काय परिणाम होतील याचा विचार करून निर्णय डळमळीत होतो. आणि याच तुमच्या भीतीचा , कमकुवपणा चा फायदा किंवा गैरफायदा घेवून
तुमच्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय इतर घेत राहतील.

अगदी मग आईवडील याच मुलीशी / याच मुला सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतात. तर कधी नवरा मुल होवू द्यायचे का नाही आणि कधी हे निर्णय घेतो. तर मुलांच्या आवडीनुसार आज काय खायचे हे निर्णय ही मुले घेतात ..

आणि या सगळ्यात जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल जगाला. आणि हे जग म्हणजे बाहेरचे कोणी नाहीत ..तर हे आपलेच म्हणवणारे लोक. नातेवाईक , मित्र मैत्रिणी असतात. आणि त्यांना घाबरून राहाल , आपल्या उणिवा ,कमतरता यांना घाबरून असाल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे छोटे असोत की महत्त्वाचे निर्णय इतर घेत राहतील.
आणि हे जर टाळायचे असेल तर स्वतः वर विश्वास ठेवा . जे निर्णय घ्याल त्याची जबाबदारी स्वतः ची असेल हे मनाला बजावून सांगा. चुकले तरी ते चॅलेंज स्वीकारून तो अनुभव म्हणून त्यात ज्या चुका झाल्या त्या सुधारून पुढे जात राहाल. आपण बरोबर आलो तरी आपण च सर्वस्वी जबाबदार.

कोणत्या गोष्टीला घाबरून कोणते निर्णय घेण्याचे टाळले तर आहे तिथेच थांबणे होईल. नाही तर तुमच्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय इतर घेत राहतील.

म्हणून स्वत: चे निर्णय स्वतः घ्या. घाबरत असाल तरी निर्णय घ्या. यातून अनुभव ही येत जातील .तुमच्यातला आत्मविश्वास वाढत जाईल . भीती कमी होत जाईल. आणि एक ना एक दिवस संपूर्ण निर्णय तुम्ही घेवून तुमचे निर्णय योग्य आहेत हे सिध्द ही कराल. तुमच्यातल्या क्षमता विकसित आणि प्रदर्शित ही कराल.

Good decisions come from experience .
Experience comes from making bad decisions.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “जोपर्यंत तुम्ही घाबरत जगाल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय इतर घेत राहतील.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!