Skip to content

“जोपर्यंत आपल्या कल्पना वास्तवात येत नाहीत, तोपर्यंत लोक आपल्याला चक्रम समजतील..”

“जोपर्यंत आपल्या कल्पना वास्तवात येत नाहीत, तोपर्यंत लोक आपल्याला चक्रम समजतील..”


मधुश्री देशपांडे गानू


“The best revenge is massive success..”

वरील वाक्य आहे सुप्रसिद्ध अमेरिकन गायक “फ्रांक सिनात्रा” यांचं. गायक म्हणून मान्यता, प्रसिद्धी मिळायला त्यांना संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी त्यांना प्रतिष्ठित गायक मानलं गेलं. समाजात ज्यांचा तुमच्या योग्यतेवर, मेहनतीवर, कल्पनांवर विश्वास नसतो, जे तुम्हांला नावं ठेवतात, दुष्टपणे त्रास देतात, अशा माणसांचा बदला घेण्याचा, त्यांना उत्तर देण्याचा एकच मार्ग आहे. आणि तो म्हणजे “प्रचंड यश मिळवणे”. आणि हेच योग्य आहे.

प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना काही कार्यकारण भाव घेऊन जन्माला येते. कोणाचाही जन्म फुकट नसतो. कोणाला वाटत असला तरीही. सगळे डॉक्टर होऊ शकत नाहीत ना.. आणि पेशंट आहेत म्हणून डॉक्टरांना मान आहे. त्यामुळे कोणालाच कमी लेखू नये. प्रत्येकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रत्येकाच्या कल्पना, स्वप्नं वेगळी असतात. समाजातील काही ठराविक लोकांची मतं ही कोणाच्याही जगण्याची फुटपट्टी असूच शकत नाही. सगळेच यशस्वी होण्याचा, पैसा कमावण्याचा सरधोपट मार्ग स्वीकारत नाहीत.

सरधोपटपणे समाजाने आखून दिलेल्या चौकटीबाहेर जर कोणी प्रयत्न करत असेल तर समाज, लोक त्याला चक्रमच समजतात. फक्त डॉक्टर्स, इंजिनियर्स, सरकारी अधिकारी म्हणजेच फक्त मान… अशी एक समाजाची संकुचित धारणा आहे. एखादा नवतरुण/ नवतरूणी काही वेगळं करू पाहत असेल तर तो मात्र चक्रमपणा.

“थ्री इडीयट्स” चित्रपट आठवतोय? त्यातील आर. माधवन या उत्कृष्ट कलाकाराने साकारलेला फरहान आठवतोय? त्याला “wild life photography” शिकायची मनापासून इच्छा असते. पण आई वडिलांना मात्र तो चक्रमपणा वाटतो. आणि त्याला स्वतःची ईच्छा मारुन इंजीनिअर व्हावं लागतं. नवीन आणि वेगळी वाट शोधणार्या, नवीन कल्पना वास्तवात आणण्यासाठी धडपडणार्‍या प्रत्येकाची हीच कथा आहे.

आपल्या भारतीय सामाजिक मानसिकतेच्या कक्षा अगदीच अरुंद आहेत. आपले अलिखित नियम अगदीच बुरसटलेले आहेत. आपण कोणताही नवा बदल सहज स्वीकारत नाही. कोणी कसे एका चौकटीतच वागायला हवं, ही समाजाची अपेक्षा असते. विशेषतः आजही स्त्रियांना सर्वार्थाने स्वातंत्र्य नाही. एखादी स्त्री कोणत्याही कारणाने एकटी असेल, एकटी पालक असेल तर तिच्याकडे बघायची दृष्टी अगदीच दूषित, संकुचित आहे.

प्रत्येकाला आपला स्वाभिमान सर्वोच्च स्थानी ठेवून स्वतःच्या कल्पना, स्वप्नं वास्तवात उतरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आज तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. करिअरचे, व्यवसायाचे, स्वातंत्र्याचे ही अनेक पर्याय आहेत. अगदी वैयक्तिक आयुष्यातही वेगळ्या कल्पना वास्तवात आणणारे आपण पाहतो आहोत. उदाहरणार्थ, लिव इन रिलेशनशिप, समलैंगिक विवाह इत्यादी. अशा चक्रमपणाच्या वाटणाऱ्या कल्पना आज सत्यात उतरत आहेत. समाजाचा घटक म्हणून कितीही विचित्र वाटलं तरी ही वस्तुस्थिती आहे. असे निर्णय घेणे, ते वास्तवात आणणं याचं धैर्य दाखवणाऱ्या व्यक्ती आज समाजात आहेत.

आज जरी तुम्हांला लोक चक्रम समजत असले तरीही तुमच्या कल्पना वास्तवात आणण्याचा तुम्हांला पूर्ण अधिकार आहे. एकदा तुम्हीं यशस्वी झालात की हेच तुम्हांला नावं ठेवणारे लोक तुमचं तोंड फाटेस्तोवर कौतुक करतात. हा माझाही स्वानुभव आहे.

आता आपल्या कल्पना वास्तवात आणण्यासाठी आपण नेमकं काय करायचं, कशी मेहनत घ्यायची ते पाहू..

१) फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करून, आपला स्वप्नांचा ध्यास घेऊन मेहनत करण्याचं सातत्य हवं.

२) कोणी कितीही त्रास दिला, पाय ओढले तरीही आपल्या ध्येयापासून परावृत्त व्हायचं नाही.

३) तुम्हांला यशस्वी व्हायचं असेल तर मुख्य दोन गोष्टींची आवश्यकता आहे. १)दुर्लक्ष, २)आत्मविश्वास.

४) तुम्हांला चक्रम म्हणणाऱ्या लोकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं.

५) तुमचा आत्मविश्वास कधीही ढळू द्यायचा नाही.

६) तुमच्या कल्पना वास्तवात आणताना जोखीम घेण्याची तुमची मानसिक आणि शारीरिक तयारी हवी.

७) तुमच्या स्वप्नांसाठी लढा द्यायची तुमची तयारी हवी.

८) तुमच्या कल्पना वास्तवात आणण्यासाठी वयाची मर्यादा नाही. तुमच्या आवडीच्या मार्गावर यशस्वी होण्यासाठी कधीच उशीर होत नसतो. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हीं हे करू शकता.

९) तुमचा बहुमूल्य वेळ आणि ऊर्जा अशा लोकांसाठी कधीच खर्च करू नका, जे तुम्हांला चक्रम समजतात.

ज्यांचा तुमच्या कल्पनांवर, स्वप्नांवर, तुमच्यावर विश्वास नाही अशा लोकांपासून दूर रहा.

१०) हळूहळू का होईना पण दमदारपणे यशस्वीतेच्या मार्गावर चाला.

११) यासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची पुंजी म्हणजे तुम्हीं स्वतःची निर्माण केलेली “शक्तिशाली सकारात्मक प्रतिमा” (strong positive self-image).

१२) या कल्पना वास्तवात आणण्याच्या मार्गावर सातत्य, कृतीशीलता, मेहनत, विचारांचे सुनियोजन हे अत्यावश्यक आहे.

१३) या मार्गावर चालताना येणारे बदल हे सहज स्वीकार करावेत.

१४) जबरदस्त इच्छाशक्ती आणि सकारात्मक वास्तववादी विचार प्रणाली ही हवीच.

१५) रोजनिशी लिहीण्याचा सराव हवा.

अशाच अनेक पायर्‍या चढून तुम्हीं तुमच्या कल्पना नक्कीच वास्तवात आणू शकता. अनेक समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक यांना त्यांच्या काळात लोक चक्रम च समजत होते. आज त्यांचे महान पण आपल्याला प्रखरपणे जाणवत आहे.

त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. आज जे तुम्हांला चक्रम समजतात, त्यांना फक्त आणि फक्त तुमचं “घवघवीत यशच” “सणसणीत उत्तर” आहे. जे आपल्याला नावं ठेवतात, ते नेहमीच आपल्या मागे असतात. आणि आपण त्यांच्या पुढेच असतो हे लक्षात ठेवा. आपल्या स्वप्नांची साथ सोडू नका. आपल्या कल्पना वास्तवात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. आणि लोकांना दाखवण्यासाठी नाहीच, पण स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी, पूर्णत्वासाठी यशस्वी व्हा….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!