Skip to content

जे फक्त स्वतःपुरता विचार करतात, ते फार थोड्या काळापुरती प्रगती करतात.

जे फक्त स्वतःपुरता विचार करतात, ते फार थोड्या काळापुरती प्रगती करतात.


गीतांजली जगदाळे


जे फक्त स्वतःपुरता विचार करतात, ते फार थोड्या काळापुरती प्रगती करतात. पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. कारण स्वतःच्या प्रगतीसाठी बऱ्याच वेळा माणसे स्वार्थी वृत्तीने काम करतात भले इतरांचं त्यामुळे नुकसान होत असेल तरी त्यांना काही फरक पडत नाही. पण आपल्या विकासासोबत इतरांचा ही विकास व्हावा अशी भावना ठेवून, असा विचार करून जेव्हा एखादी कृती केली जाते तेव्हा त्यामुळे जी प्रगती होते ती कायम राहते.

फक्त स्वतःचा विचार करणारी माणसे आत्मकेंद्रित असतात. प्रत्येक जण जेव्हा फक्त आपले खिसे भरण्याचा विचार करतात तेव्हा देशाशी, त्यात असणाऱ्या आपल्या बांधवांशी गद्दारी करण्यात ही त्यांना काही वावगं वाटत नाही आणि त्यामुळे तो देश भ्रष्टाचारी देश म्हणून ओळखला जाऊ लागतो. पण त्याच जागी फक्त आपल्या फायद्याचा विचार न करता जेव्हा देशाचा आणि त्यातल्या माणसांचा विचार करून आपण प्रामाणिकपणे आपलं कार्य करण्याचा विचार करतो तेव्हा त्या प्रामाणिक कष्टानेच संपूर्ण देश प्रगतीपथावर येतो.

स्वतः चा विचार करणे यात चुकीचं असं काहीच नाही, पण फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणे हे मात्र चुकीचं असत. आपण स्वतःचा विचार करणार नाही तर कोण करणार हे ही बरोबर च आहे पण तो करत असताना बाकी लोकांचा ही विचार डोक्यात घेणे गरजेचे असते. समाजात काही लोक अशी असतात ज्यांना फक्त स्वतःची काळजी असते, आणि ज्यांना फक्त स्वतःची संकटे आणि स्वतःचा दृष्टिकोन कळतो. आपल्या स्वार्थासाठी ते जे काही करतात त्याने कोणाचं मन दुखावलं गेलं, कोणाचं नुकसान झालं तरी त्यांना त्याच फार काही वाटत नाही, अशाने माणूस माणुसकी विसरून वागू लागतो.

‘ एकीचे बळ’ ही गोष्ट आपण लहान असताना सगळ्यांनी ऐकलेली असेल. एकीच्या बळात जी ताकद असते ती त्या सगळ्या काठ्या एकत्र असतात आणि त्यांची मोळी बनते म्हणून असते. तेच एक काठी तोडणे सोप्पे असते, पण मोळी तोडणे अशक्य होऊन जाते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः सोबत इतरांचा ही विचार केल्यास त्यामुळे होणारी प्रगती थांबवणं कोणाला ही शक्य होणार नाही. सामाजिक कल्याणासाठी संघटित विचार करण्याची गरज असते.

प्रत्येक गोष्टीत आपण दर वेळी इतरांचा विचार करत नसतो पण जिथे आपल्यामुळे कोणाचं वाईट होऊ शकत, नुकसान होऊ शकत तिथे खबरदारी घेणं ही आपली जबाबदारी असते. आणि स्वतःसोबत इतरांचा ही विचार करणे आणि त्यातून झालेल्या कृतीने फक्त त्यांचीच नाही तर आपली ही प्रगती होत असते.

फक्त स्वतःचा विचार न करता दुसऱ्याच्या मनाचा विचार केल्यास नात्यात कधीच दुरावा येत नाही. खूप वेळा नात्यामध्ये दुरावा येण्याचं कारण, किंवा गैरसमज होण्याचं कारण फक्त स्वतःचाच विचार करण्याची सवय असते. नातं निभावणं ही त्या दोन्ही माणसांची जबाबदारी असते त्यातला एक जरी माणूस फक्त स्वतःपुरता विचार करत असेल तर नातं तुटायला, कमकुवत व्हायला वेळ लागत नाही.

निस्वार्थी वृत्ती, आणि सगळ्यांना सामावून घेण्याची इच्छा माणसाला आयुष्यात पुढे घेऊन जाते. स्वतःचा विचार करून आयुष्य जगताना जे सुख,समाधान मिळत नाही ते इतरांचा विचार करून, त्यांना समजून घेऊन आयुष्य जगताना मिळते आणि त्याची मजाच काही और असते. पण कधी कधी अशी परिस्थिती असते कि एक व्यक्ती इतरांचा विचार स्वतः पेक्षा जास्त करून प्रसंगी कधी कधी स्वतःच्या मन मर्जीचा त्याग करून ही काही गोष्टी करतात.

पण मग काही लोक त्याचा गैरफायदा ही घेतात.,आणि जो माणूस निस्वार्थी वृत्तीने काम करतो त्याची कदर करीत नाहीत. त्यामुळे निस्वार्थी माणूस ही कधीतरी कंटाळून जातो, त्याच्याही सहन शक्तीचा अंत होतो आणि मग तो ही स्वतःचाच विचार करून वागावं का काय असा विचार करू लागतो. त्यामुळे स्वतःचा विचार करणे आणि त्याच बरोबर आपल्यामुळे कोणाचं नुकसान तर होत नाहीए ना हे ही बघणे खूप महत्वाचे असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जे फक्त स्वतःपुरता विचार करतात, ते फार थोड्या काळापुरती प्रगती करतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!