Skip to content

जे नाही ते दाखविण्याच्या भ्रामक प्रयत्नात आपण सतत अस्वस्थ राहतो.

जे नाही ते दाखविण्याच्या भ्रामक प्रयत्नात आपण सतत अस्वस्थ राहतो.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


हा माणूस कसा असतो ना…!
हवेहवेसे कधी…कधी नकोनकोसे
कधी कुंपण काटेरी…कधी मऊसूत गालिचे…….!!

खरचं कसा असतो नं हा माणूस..! या माणसाला केव्हा काय होईल नी केव्हा काय नाही… हे मुळीच सांगता येण्यासारखे नाही. माणसाला काटेरी कुंपण कधीच नको असतं तर त्याला नेहमीच मऊसूत गालिचा हवा असतो.पण अनेकदा माणसाच्या वाट्याला काटेरी कुंपणच येतं.मऊसूत गालिचा मात्र फार क्वचितच माणसाच्या वाट्याला येतो.आणि हे केवळ माणसालाच वाटत असतं.

माणसाला त्याचा कमीपणा किंवा जी काही परिस्थिती आहे ती सहसा इतरांना दाखवायला आवडत नाही. इतर लोकं आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगली आहेत.त्यांना ‘ आपला असा कमीपणा कसा दाखवायचा…? हा प्रश्न पडतो.त्यामुळे तो आपल्याकडे मुळातच जे नाही ते दाखवण्याचा एक भ्रामक प्रयत्न करतो.आणि या प्रयत्नामध्येच माणूस अस्वस्थ होताना दिसतो.जे नाही ते दाखविण्याचा भ्रामक प्रयत्न म्हणजे काय तर……

वास्तवात मुळातच जे आपल्याकडे उपलब्ध नाही, आपल्याला सहजासहजी शक्य नाही ते दाखविण्याचा प्रयत्न करणे होय.पहा..या जगात नाना तऱ्हेची लोकं असतात. अगदी तशीच काही लोकं ही(असताना/नसताना) उगाचच दिखावा करणारी असतात तर काही लोकं ही आपल्याकडे इतरांपेक्षा काहीतरी कमी आहे , आपल्या सहवासात/सान्निध्यात वावरताना इतरांना उगाचच कमी भासू नये म्हणून स्वतःकडे जे नाही ते दाखवण्याचा अगदी दमछाक होईपर्यंत प्रयत्न करतात.

इतरांसाठी आणि तेही अशा गोष्टींसाठी स्वतःची उगाचच हेळसांड करण्यात काही अर्थ नाही. कारण यामुळे त्रास हा आपल्या स्वतःला होत असतो.आपण त्या अशा विचारांनी सतत अस्वस्थ , मरगळलेल्या अवस्थेत शिरतो.का आणि कशासाठी जीवाची अशी घालमेल करून घ्यायची….?

जे नाही ते दाखविण्याच्या भ्रामक प्रयत्नात सतत अस्वस्थ राहण्यापेक्षा… जे आपल्याकडे नाही त्याची खरच आपल्याला गरज आहे का हे तपासून पहा.आणि इतकच नाही तर जर खरच त्याची गरज असेल तर त्या गोष्टी कमवण्यामध्ये व्यस्त रहा.आपण काय करतो….तर स्वतः कुठेतरी गुंतून पडतो आणि इतरांना जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो.

या सगळ्यामध्ये स्वतःला किती त्रास होतो ते मात्र आपल्या लक्षात येत नाही किंवा लक्षात येत असुनही आपण त्याकडे मुद्दामून कानाडोळा करतो.आणि होतोय त्रास सहन म्हणून तो सहन करत बसतो.त्रास म्हणण्याच कारण म्हणजे कसं तर…तर अशा प्रकारच्या भ्रामक गोष्टींमध्ये आपण विचारांनी केवळ आणि केवळ अस्वस्थच होणार.

आणि अस्वस्थ मन म्हणजे मानसिक नी शारिरीक रोगाला एक प्रकारे निमंत्रण दिल्यासारखच आहे. सततच्या अशा विचारांमुळे आपल्या मनावर ,शरिरावर खूप वेगवेगळे परिणाम दिसून येतात.आपल्या शरीराची ,मनाची हानी होण्यास कुठेतरी आपणच जबाबदार असतो.

खरचं , उगाचच कशाला असं वागायच…? नाही दाखवलं तर काही बिघडतं का…? अहो , नाही नं आपल्याकडे एखादी गोष्ट तर नसूद्या… नसेल सहजासहजी शक्य तर नसूद्या. जे नाही ते दाखवलच पाहिजे असा काही नियम मुळीच नाही.अरे नाही आपल्याकडे मोठ्ठा L.E.D टिव्ही , पण टिव्ही तर आहे नं…? आपल्या स्वतःसाठी तो “comfortable” आहे नं…? मग झालं तर….इतरांसाठी म्हणून “L.E.D ” हवा होता , त्यांच्याकडे तोच आहे , त्यांना त्याचीच सवय आहे वगैरे वगैरे.

अशा भ्रामक विचारात वेळ घालवून मन का अस्वस्थ करून घ्यायचं…? मान्य आहे की अनेकांना वाटतं की “इतरांना काय वाटेल..?” आणि मग इतरांच्या कल्पनांनुसार काही जणं असा विचार करतात आणि निरस होताना दिसतात. सतत त्याच त्या भ्रामक विचारांभोवती मन घुटमळत राहिलं तर अस्वस्थ नाही होणार तर काय होणार नं…?

इतरांचा विचार करू नका असं नाही पण कमीत कमी आपल्याकडे जे आहे ,जसं आहे ते तसच असूद्या. ते तसचं दिसूद्या. स्वतःला काही त्यात बदल करावासा वाटत असेल तर नक्की करा पण उगाचच जे नाही ते केवळ दाखवण्यासाठी स्वतःला त्रास देऊ नका. अतिविचार करणं तिथेच सोडून द्या.माठातलं पाणी असेल तरी चालेल त्यासाठी फ्रीजच हवा असा विचार करू नका. विचार करून करून अस्वस्थ होण्यात काहीच तथ्य नाही. त्यामुळे हे असं वागणं वेळीच थांबवा अन्यथा त्या विचारांच्या नादात तुम्ही कधी गुरफटून जाल कळणारही नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!