“जे नकोयं किंवा असहनीय होईल, ते वेळीच नाकारलेलं बरं!”
मधुश्री देशपांडे गानू
“NO” is a complete sentence without an explanation….
इंग्रजीतले प्रसिद्ध वाक्य आहे हे! “नाही” हे कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय पूर्ण वाक्य आहे. आणि तुम्हांला योग्य वेळी, योग्य ठिकाणी ते उच्चारायचा पूर्ण अधिकार आहे. पण खरंच किती जण हा हक्क बजावू शकतात? काहीवेळा काही नात्यात तर असं नाही म्हणणं आगाऊपणाचं, स्वार्थीपणाचं वाटू शकतं. म्हणजेच योग्य ठिकाणी, योग्य वेळी, सारासार विचार करूनच कृती करायला हवी.
कुटुंबात, समाजात वावरताना आपण नेहमी समोरच्या व्यक्तीचा, परिस्थितीचा, होणाऱ्या परिणामांचा आधी विचार करतो. लोक काय म्हणतील??? हा तर सर्वात मोठा आजार आहे. इथे आपण स्वतःचा विचार सर्वात शेवटी करतो. आणि बहुतेक वेळा स्वतःचा विचार, स्वतःला महत्त्व, स्वतःला प्राधान्य न दिल्याने आपण स्वतःला मात्र दुःखी बनवतो. कित्येक वेळा समोरच्या व्यक्तीच्या भरीस पडून आपण स्वतःच्या मानसिकतेचा, शारीरिक क्षमतेचा, आर्थिक क्षमतेचा कोणताही विचार न करता त्याच्या मनाप्रमाणे वागतो.
परिस्थितीला शरण गेल्याने, भिडस्त स्वभावाने आपण स्वतःचे नुकसान करून घेतो. आपल्या समाजात होणारी लग्नं हे तर याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणायला हवं. केवळ मुलीचे आई वडील म्हणून आणि समाजाची रीत भात पाळायची म्हणून भरमसाट कर्ज घेऊन, कर्जबाजारी होऊन आई वडील मुलीचे लग्न लावून देतात. मुलाकडच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करतात. कित्येक मुलींचे वडील आत्महत्येस प्रवृत्त होतात. हे असहनीय आहे ना!!
अशी कित्येक उदाहरणे देता येतील. सासू-सून हे नातं तर तसंही वादग्रस्तच आहे. सामाजिक जडणघडण, संस्कार, भीती, भीड यामुळे आणि पूर्वग्रहदूषित समजांमुळे या नात्यात गैरसमज अधिक होतात. अत्यंत अध्यात्मिक आणि दांभिक बाबा बुवा करणाऱ्या सासूबाईंना वास्तववादी विचारसरणीच्या सुनेने असं काही करण्यास स्पष्टपणे वेळीच नकार द्यायला हवा.
नंतर धुसफूस आणि चिडचिड करण्यात काहीच अर्थ नाही. त्याचप्रमाणे अत्यंत करियर ला प्राधान्य देणाऱ्या सुनेला सासूने ही योग्य वेळी हा तिचा संसार आहे त्यामुळे तिला थोडी जबाबदारी घ्यावीच लागेल. हे सांगायला हवं. कारण स्वतःच्या वया पलीकडे आणि तब्येती पलीकडे सासू तिला मदत करू शकणार नाही. इथे तब्येत जास्त महत्त्वाची आहे. खरं तर हे सगळेच सामोपचाराने, नाती सांभाळून, योग्य वेळी व्हायला हवं. नाहीतर वाद, भांडणं विकोपाला जाऊ शकतात. सगळे धार्मिक विधी वेळच्यावेळी करणाऱ्या पण मागून मात्र सतत चिडचिड आणि धुसफूस करणाऱ्या सुना प्रत्यक्षात पाहिल्या आहेत. याने खरंच आनंद मिळतो का???
त्याच प्रमाणे व्यावसायिक पातळीवरही स्वतःला न पटणारा निर्णय किंवा संभाव्य धोके दिसत असतानाही स्पष्टपणे नाही म्हणणं, स्वतःच्या मतावर ठाम राहणंच योग्य ठरतं. यामुळे पुढे येणारी असहनीय परिस्थिती आपण टाळू शकतो.
अगदी जीवाभावाच्या, प्रेमाच्या व्यक्ती बाबतही हे होतं. नवरा-बायको, लिव-इन-रिलेशनशिप, प्रियकर-प्रेयसी आणि हल्ली लाँग डिस्टन्स रिलेशनशिप किती प्रकार आजकाल नात्यांचेही!! सुरुवातीला सगळेच हवंहवसं, गोड गोड वाटतं. पण कालांतराने नात्यात एकसुरीपणा येतो म्हणा किंवा खरे स्वभाव कळून येतात.. पटेनासं होतं. नातं आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्त्वाचे असल्याने नक्कीच सामोपचाराचं, तडजोडीचे धोरण हवं.
पण हे दोन्हीही बाजूंनी समान पातळीवर हवं. तरच त्याला अर्थ आहे. तर ते नातं पुढे नेण्यात हशील आहे. पण कित्येकदा असं दिसून येतं की दोघांपैकी एकच समजूतदार असतो. समोरच्या व्यक्तीची नात्यामधली गुंतवणूक संपलेली असते. अशा वेळी खूप मानसिक त्रास होतो. जीवापाड लावलेला जीव काढून घेता घेता दमछाक होते. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपलं आता काही स्थान नाही, हे प्रत्यक्षात समजतं.
पण मन मानायला तयार होत नाही. अशा वेळी त्यांची तुम्हांला मिळणारी वागणूक अपमानास्पद, स्वाभिमान दुखावणारी असते. या ठिकाणी मनावर दगड ठेवून तुम्ही ठाम पणे हे नातं कायमचं संपायलाच हवं. काही नाती ही ठराविक काळच आपली साथ करतात हे वास्तव स्वीकारायला हवं. अगदी कोणत्याही नात्यात हे घडू शकतं. वास्तव जेवढ्या लवकर आपण स्वीकारू, तेवढ्या लवकर आपण त्या प्रसंगातून, घटनेतून, बसलेल्या धक्क्यातून लवकर सावरू.
नोकरी करताना बऱ्याचदा स्त्री कर्मचाऱ्यांना बॉस कडून वाईट वागणूक मिळते. नको त्या मागण्याही केल्या जातात. पण भीड न बाळगता स्पष्ट नाही म्हणायला हवं. योग्य ती पावलं उचलायला हवीत. आज सोशल मीडियावर आभासी नात्यांचा पाऊस पडत आहे. नीट विचार केला तर विवाहबाह्य संबंधच जास्त. अशा नात्यांमध्ये फक्त दुःख, निराशाच पदरी पडणार असते, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असतं. तरीही नाकारणं शक्य असूनही लोक यात सहज अडकतात. मनाची गुंतवणूक ठीक आहे पण त्याचे होणारे परिणाम बरेचदा असहनीय असतात. तरीही लोक सहज वहावत जातात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. पण सांगूनही समजत नाहीच.
तुमच्या जीवनात कोणतंही नातं असो, व्यावसायिक संबंध असो, प्रेमाचं नातं असो काहीही असलं तरीही प्रत्येक निर्णय घेताना परिणामांना सामोरं जाताना मी खरंच आनंदी होणार आहे का?? आणि हा आनंद दीर्घ काळ टिकणार आहे का?? एवढा प्रश्न स्वतःला नक्कीच विचारावा.
स्वतः:चा स्वाभिमान सर्वोच्च स्थानी ठेवावा. स्वतःला प्राधान्य देणे अजिबात चूक नाही. त्याबद्दल अपराधीपणाची भावना बाळगण्याचं काहीच कारण नाही. तुमचं आयुष्य आनंदी असणं ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. तसंच स्वतःला, मनाला, शरीराला कोणताही त्रास, अपाय न होऊ देणे ही पण तुमची जबाबदारी आहे. जेव्हा-जेव्हा गरजेचे असेल तेव्हा स्वतःला प्रथम स्थानी ठेवून मगच निर्णय घ्या. तुमचं मन तुम्हांला सूचना देत असतं.
बरेचदा एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग याबद्दल नकारात्मक भावना तुमच्या मनात येत असतात. अशावेळी फक्त आणि फक्त तुमच्या मनाचा आवाज ऐका. जे नकोय, असहनीय आहे ते वेळीच ठामपणे नाकारा. तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि मन:शांती साठी काही वेळा नाही म्हणणं अत्यंत गरजेचे असते. नंतर पश्चात्ताप आणि दुःख करून काहीच उपयोग नाही. आणि तुमचं दुःख वाटून घ्यायला ही कोणी येत नाही.
मला मनापासून आनंद देणाऱ्या गोष्टीच मी करणार, असं स्वतःच्या मनाशी ठाम ठरवा. नकारात्मक भावना भावना देणाऱ्या गोष्टी, व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर झाल्या की आपोआपच चांगल्या सकारात्मक गोष्टी घडू लागतात. आत्मविश्वासाने, सकारात्मकतेने, स्वतःला केंद्रस्थानी ठेवून तुमचे आयुष्य उज्वल, आनंदी बनवा….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
