Skip to content

जेव्हा मनातली आई मरते…

जेव्हा मनातील आई मरते ….


सौ. अर्चना पाटील

पुणे.


आई म्हणजे सर्वस्व ,आई म्हणजे जीवनदायिनी , ती आहे तर आयुष्य बघायला मिळालं ..आईचे उपकार …आईच प्रेम ….आईची माया …आई…आई…आई…हे सर्व लहानपणी मोठ्या आणि मोकळ्या मनाने बोलणारी मुलं जस जशी मोठी होतात तस तशी याच मुलांच्या आई बद्दलच्या संकल्पना बदलत जातात …

नेहमी आवडणारी आई आता खटकणारी आई कधी होते आणि का होते कळतंच नाही ….जिच्या गोड आवाजात गायिलेल्या अंगाईने झोपणाऱ्या या मुलांना आता तिच्या आवाजात तक्रारींचा सूर का दिसू लागतो ….शाळेतून आल्यावर आई अशी हाक मारणारी ही मुलं आता तिच्या हाकेला ओ सुद्धा का देत नाही ….मोठी झाल्यावर का इतकी बदलतात ही मुलं ….

प्रत्येक गोष्टीत न बोलता ही मुलांच्या भावना समजून घेणारी ही आई अचानकच आईला अग तुला कळत कसं नाही , मला काय पाहिजे असं मुलं का म्हणतात ….

जिच्या मांडीवर बसण्यासाठी रडणारी हीच मुलं , आम्हाला का बाहेर पडू देत नाही किती दिवस बांधून ठेवणार असे आरोप का करतात….

खरं सांगू का आई ची माया कधीच अटत नाही ….आई कधीच बदलेली नसते …बदलेला असतो तो आपला दृष्टीकोन ….ज्यांच्या मनात आई आहे त्याचीच आई जिवंत आहे …ज्यांच्या मनात आईची जागाच नाही त्या मुलांची आई केव्हाच मेलेली असते …

तेव्हा मुलांनो तुम्ही मुलगी असो की मुलगा असो ,तुम्ही वयाचा कोणत्याही टप्प्यावर जा …तुम्हाला अनेक लोक मिळतील ,अनेक नाते ही तयार होतील … पण जिने जग बघायला शिकवलं तिला जगाचं बघून कसं वागायचं ते शिकवायला जाऊ नका ….आईला गृहीत धरू नका …तुमच्या अशा वागण्याने ती शरीराने तर जिवंत असते पण मनाने मेलेली असते ….

माझ्या आईला कधी मी समाजलोच नाही व समजलेच नाही असं म्हणणाऱ्या मुलांना सांगू इच्छिते तुम्ही कधी तुमच्या आईला समजूनच घेतलंच नाही …

तेव्हा अजून ही वेळ गेलेली नाही ,जर तुम्हाला वाटत असेल की आपली आई मनाने जिवंत असावी तर तिच्या साठी एकच करा …जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा पण तिचा तुमच्यावरचा अधिकार हिरावून घेऊ नका …अजून ही तुम्ही तिचेच आहात या एका भावनेवर ती तिचं सम्पूर्ण आयुष्य आनंदाने जगू शकते …

तिची विचारपूस जरी नाही केली तरी चालेल ,पण तू का विचारतेस असं तरी निदान बोलू नका …तुम्हाला तिची काळजी घ्यायला वेळ नसेल, पण निदान तिला तरी तुमची काळजी घेऊ द्या …तुम्हाला तिच्याशी बोलायला वेळ नसेल , तर निदान तिला तरी तुमच्याशी बोलू द्या …

तिला तुमच्या घरात ठेवता येत नसेल तर निदान तुमच्या मनात तरी तिला राहू द्या …तिच्या डोळ्यातील अश्रू पुसता येत नसतील तर निदान तिच्या डोळ्यातील अश्रुंचे कारण तरी बनू नका….पहा पटतय का ? नाही तर द्या सोडून ,जरा मनात डोकावून पहा तुमच्या मनातील आई जिवंत आहे की नाही ……असेल तर उत्तम नसेल तर वरील लेखाचा जरूर विचार करा ……



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!