जेवढे वाईट दिवस पाहाल , त्यापेक्षा चांगले दिवस पहायला मिळतील….
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
दिवस……..! जे की आयुष्यातील चांगले नाहीतर वाईट असतात.मुळातच चांगला वाईट हा त्यांचा प्रवास असावा असं वाटतं.कारण कधी चांगले तर कधी वाईट म्हणजेच आज चांगले तर उद्या वाईट अशी दिवसांची मालिका ही चालू असते.देऊ तशी विशेषणं त्या दिवसांना देता येतातही.पण आपण मात्र चांगल्या दिवसाचे भुकेले असतो.
आपल्याला नेहमी चांगले दिवस यावेत असच वाटतं.चांगले दिवस असणं , येणं अगदी मान्य आहे पण वाईट दिवसही असतात , येतात हे अमान्य करून चालणार नाही. कारण आयुष्यात जसे चांगले दिवस येतात तसेच वाईट दिवसही येतात.आपल्याला आयुष्यात वाईट दिवस आले तर अगदी नकोनको स होतं.आलेले वाईट दिवस केव्हा जातील आणि चांगले दिवस केव्हा येतील याची काही खबरबात नसते.पण वाईट दिवस आले तर माणूस रडतो ,रडता रडता लढायलाही शिकतो.
पण चांगले दिवस येतील याची आशा मात्र काहीजण कायमची सोडून देतात. वाईट दिवस आलेत तर ते कायमस्वरूपी येतच राहणार असा समज करून घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. तर त्या सगळ्यांना इतकच सांगण आहे की , तुम्ही जेवढे वाईट दिवस पाहाल , त्यापेक्षा चांगले दिवस पहायला नक्की मिळतील फक्त थोडा संयम ठेवायला शिका.कितीतरी अशी उदाहरणं आपण आपल्या रोजच्या जीवनात पाहतो. कुणी सुखात असतं तर कुणी दुःखात असतं.कुणाचे वाईट दिवस चालू असतात तर कुणाचे अगदी सोन्याहून पिवळे दिवस चालू असतात.
हे एक प्रकारच आयुष्यातील चक्रच आहे. आज वाईट तर उद्या चांगले दिवस असं ते चक्र फिरत असतं. इथे असलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात हे घडत असतं.इतकच नाही तर जेवढे वाईट दिवस पाहतो त्यापेक्षाही नंतर आपण कितीतरी पटीने चांगले दिवस पाहतो.पहा वाईट दिवस कसे येतात…कधी कुणावर आर्थिक संकट कोसळलेल असतं , पैशाची इतकी चणचण असते की काही आणायच म्हंटल तरी शंभर वेळा विचार करावा लागतो.
अशाच या पैशाच्या चणचणीत कितीतरी गोष्टी आपल्या भोवती लोटांगण घालत असतात.सगळ्या गोष्टी एकत्र येतात.घरातल्या अन्नधान्यापासून ते लोकांच्या मानपानापर्यंत पै पै पैसा कसातरी जमवावा लागतो.इतके वाईट दिवस चाललेले असतात न ते की तेव्हा वाटत कुणीतरी यावं नी जादुची कांडी फिरवून जावं. डोक्यावर कितीतरी कर्जांचा डोंगर उभा असतो.त्यासाठी घरी वसुलीला येणारी माणसं , त्यांची भीती…बापरे..! नकोनकोसे वाटतात ते धडकी भरणारे दिवस….
कुणाची शिकण्याची इच्छा असतानाही शिक्षण थांबत , ज्या व्यक्तीवर आपण इतका जीव टाकतो आणि नेमकी तीच व्यक्ती त्रास देते किंवा सोडून जाते तेव्हा होणारा त्रास म्हणजे ते एक वेगळेच वाईट दिवस असतात.खेळायच्या , बागडायच्या दिवसात नको नको ते करावं लागतं , नको त्या वेळी अचानक नोकरी जाते , कुणाचा आधार जातो हे सगळे दिवस म्हणजे कठीण काळच असतो. पण मित्रांनो , ह्या कठीण काळात आपण लढायला , जगायला शिकतो. हा कठीण काळच आपला संयमाची परीक्षा घेत असतो.
या काळात संयम ठेवला तर नक्की पहा चांगले दिवस हे येणारच असतात. ज्यांच शिक्षण अर्ध्यावर थांबलं त्यांना काहीतरी नवीन ‘innovative’ करायची संधी मिळते. जिथे पैशाची चणचण असते तिथे पैसा अगदी भरल्या हाताने यायला लागतो आणि महत्त्वाच म्हणजे तो पैसा टिकून राहतो. आपल्यावरही कुणीतरी आपल्यापेक्षा जास्त जीव लावणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते नी आयुष्यच बदलून टाकते.हळुहळू ते मागचे वाईट दिवस पुसट होत जातात नी चांगल्या दिवसाच्या रेषा आपोआप लख्ख होताना दिसतात.
ज्या माणसाला दोन वेळच अन्न मिळणं कठीण जायच त्याच माणसाला अगदी चांगल चार वेळच भरपेट जेवायला मिळतं.रहायला छप्पर नसलेल्याला छोटस का होईना छप्पर मिळतं.असच वाईट दिवसानंतर कितीतरी चांगले दिवस हे आयुष्यात येतात.त्यामुळे वाईट दिवस आले तर येऊद्या , त्याने गोंधळून जाऊ नका , हताश होऊ नका.चांगले दिवस येतील ही आशा कधी मालवू देऊ नका.
चांगले दिवसही येतील आणि येतात असा विश्वास स्वतःवर ठेवायला मात्र विसरू नका. बाकी चांगलं वाईट ही सुद्धा आयुष्याची काही चाकच आहेत. त्याशिवाय आयुष्य आणि आयुष्यातील मजा समजत नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख आवडला